कुंडलिनी जगदंबा विश्वाची उभारणी आणि संहारणी करते. या लेखात उभारणी बघुयात.
1) ब्रह्म व ब्रह्मशक्ती– जगाच्या पूर्वी एकमात्र ब्रह्म होते. त्यास अनेक व्हावे असे वाटले असे उपनिषदांमध्ये सांगितले आहे. तेव्हा त्याची ब्रह्मशक्ती प्रवृत्त होऊन विश्वनिर्मिती झाली. निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी सृष्टीच्या आरंभी मायेच्या तमोमयी मलीनतेचा प्रादुर्भाव होतो. हिला अनादि अविद्या किंवा आकाश असे गौण रीतीने म्हटले जाते. ही शक्ती परमेश्वराच्या स्वाधीन असते. मायेत प्रतिबिंबीत झालेला चिदात्मा तिला आपल्या स्वाधीन ठेवतो व त्यामुळे सर्वज्ञ, सर्वशक्ति इ. गुणांनी युक्त असा ईश्वर होतो. तर अविद्येत प्रतिबिंबीत झालेला जो चिदात्मा तो अविद्येच्या अधीन होतो. ईश्वराप्रमाणे तो तिला स्वाधीन ठेऊ शकत नाही. त्यामुळेच तो जीव होतो. ईश्वराच्या अपेक्षेने जीवाला प्राज्ञ असे म्हणतात. ही अविद्या जीवांच्या स्थूल व सूक्ष्म शरीरादिकांचे कारण असल्यामुळे तिला कारण शरीर म्हणतात.
ही बीजशक्ती अविद्यात्मक आहे. तिला अव्यक्त ही संज्ञा आहे. सर्व संसारी जीव आपले खरे स्वरुप काय आहे हे न समजता स्वस्थपणे घोरत पडून असतात. ही महानिद्रा आहे. या मायेपासून मिथ्या अशा पदार्थांच्या उत्त्पतीचा भास होतो. सत्त्व, रज आणि तम अशी त्रिगुणात्मक अशी ही अविद्या आहे. प्रलयानंतर अविद्या आणि जीवांची पूर्व कर्मे यांच्या सहाय्याने अमुक प्रकारचे जग निर्माण करावे असा परमात्मा संकल्प करतो. जगाचे उपादान कारण तम:प्रधान प्रकृति व निमित्तकारण चैतन्यस्वरुप ब्रह्माची कामना आहे. तम:प्रधान प्रकृतीमध्ये असलेले सत्त्व, रज, तम हे गुण आकाशादि तन्मात्रांतही अनुवृत्त होतात.
2) पंचमहाभूत व तन्मात्रा– ब्रह्मशक्ती प्रथम आकाश बनते. त्यानंतर आकाशातून वायू, वायूपासून अग्नि, अग्निपासून जल, जलापासून पृथ्वी अशा प्रकारे पंचमहाभूते तयार झाली. म्हणजे पुढे उत्पन्न होणार्या भूतात स्वत:चा व मागच्या भूताचा गुण (तन्मात्रा) असतो. आकाशाचा गुण शब्द, वायूचा स्पर्श, अग्निचा रुप, उदकाचा रस, पृथ्वीचा गंध. आकाशापासून वायू झाला म्हणून वायूत आकाशाचा शब्द व स्वत:चा स्पर्श हे दोन्ही गुण आहेत. वायूपासून अग्नि झाला म्हणून अग्नित शब्द, स्पर्श व स्वत:चा रुप हे गुण आहेत, अग्निपासून उदक झाले म्हणून उदकात शब्द, स्पर्श, रुप व स्वत:चा रस हे गुण आहेत तर पृथ्वीत शब्द, स्पर्श, रुप, रस व स्वत:चा गंध हे गुण आहेत.
3) ज्ञानेंद्रिये, अंत:करण व तेथील देवता– आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी यात असलेल्या सात्त्विक अंशापासून क्रमाने श्रोत्र, त्वचा, चक्षु, रसन आणि घ्राण ही पाच ज्ञानेंद्रिये उत्पन्न झाली आणि पाच तन्मात्रांच्या ठिकाणी असलेल्या सत्त्वांशापासून अंत:करण (मन, बुद्धी, अहंकार व चित्त) उत्पन्न झाले. ज्ञानेंद्रियांच्या अनुक्रमे दिशा, वायु, सूर्य, वरुण आणि आश्विनी या आधिष्ठातृ देवता आहेत. तर मन, बुद्धी, अहंकार व चित्त यांच्या अनुक्रमे चंद्र, ब्रह्मा, शिव, विष्णु या देवता आहेत.
4) कर्मेंद्रिये पंचप्राण– पंचमहाभूतांच्या रजो अंशापासून क्रमाने वाक्, हस्त, पाद, गुद आणि मूत्रेंद्रिय ही कर्मेंद्रिये उत्पन्न झाली. शिवाय रजोअंशापासून पंचप्राण देखिल उत्पन्न झाले.
5) लिंग शरीर व आत्म्याची नावे– पंच ज्ञान, कर्म, प्राण व मन-बुद्धी अशा सतरा अवयवांचे सूक्ष्म (लिंग) शरीर बनते. वर सांगितलेला कारणशरीराभिमानी प्राज्ञ (व्यष्टि) हा सूक्ष्म शरीरावर अभिमान ठेवू लागला म्हणजे तो तैजस या संज्ञेस प्राप्त होतो. अंत:करण हे सत्त्वगुणांचे कार्य असल्यामुळे त्याला तेज असे म्हणतात. त्या तेजावरुन उपलक्षित होणार्या लिंग शरीरावर ममत्व ठेवल्यामुळे अविद्येमध्ये प्रतिबिंबीत झालेला प्राज्ञ हा तैजस होतो. त्याचप्रमाणे सर्व लिंगशरीरांच्या समष्टिवर अभिमान ठेवल्यामुळे मायोपाधिक ईश्वर हा हिरण्यगर्भ या नावाला धारण होतो. हिरण्यगर्भास सूत्रात्मा (सर्व सूक्ष्म शरीरांना वस्त्रात जशी सूत्रे व्यापून राहतात तसे हा व्यापून राहतो.) आणि प्राण (क्रियाशक्तीमान प्राण) अशी आणखी दोन नावे आहेत. आकाशादि अपंचीकृत पंचतन्मात्रापासून पंचीकरणाच्या योगाने स्थूल उत्पत्ती ईश्वर जीवांच्या भोगांसाठी उत्पन्न करतो. पंचीकृत भूतांमध्ये अव्यक्त असलेले गुण (तन्मात्रा) व्यक्त होतात. आकाशादिकांपासून अनुक्रमाने उत्पन्न झालेल्या श्रोत्र, त्वक, चक्षु, रसन व घ्राण या पाच ज्ञानेंद्रियांचे विषयही अनुक्रमे श्रोत्राचा शब्द, त्वचेचा स्पर्श, नेत्राचा रुप, जिव्हेचा रस तर नाकाचा गंध असे आहेत.
ब्रह्मांडाची उत्पत्ती
1) सात लोक– तमोगुणापासून पंचीकृत भूतांपासून भूमि, आकाश, स्वर्ग, मह, जन, तप व सत्य हे ऊर्ध्व असलेले सात लोक आणि वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताल हे सात अधोलोक असे ब्रह्मांड निर्माण झाले.
2) स्थूल शरीर– पृथ्वीपासून वनस्पती, वनस्पतीपासून अन्न, अन्नापासून पित्याचे रेत आणि मातेचे शोणित, रेत आणि शोणित मिळून स्थूल शरीर जीवाला प्राप्त झाले. स्थूल शरीर चार प्रकारची आहेत- जरायुज (गर्भातून उत्पन्न), अंडज (अंड्यातून उत्पन्न झालेले), स्वेदज (घामातून उत्पन्न झालेले) आणि उद्भीज (जमिनीतून उत्पन्न झालेले) सर्वस्थूल शरीरांवर अभिमान ठेवणार्या समष्टिला विराट (विविधतेने शोभणारा) किंवा वैश्वानर म्हणतात. प्रत्येक स्थूल शरीरावर अभिमान ठेवणार्या तैजसाला विश्व म्हणतात.
3) पंचकोश– कोळी जसा स्वत:च्या जाळ्यात गुरफटतो तसे पंचकोषांनी आत्मा आच्छादित होतो. स्थूल देहाला अन्नमयकोश, लिंग देहातील कर्मेंद्रिये आणि प्राण असे मिळून प्राणमय, ज्ञानेंद्रिये आणि मन मिळून मनोमय, ज्ञानेंद्रिये आणि बुद्धी हा विज्ञानमय तर तीन सुखांसह (प्रिय- इष्ट वस्तू दर्शनाने, मोद- इष्ट वस्तूचा लाभ झाल्यावर व प्रमोद- इष्ट वस्तूचा भोग घेतल्यावर) असलेले कारण शरीर भूत अविद्येत असणारे जे मलिनसत्त्व त्यास आनंदमयकोश असे म्हणतात. कारण शरीर आनंदमय आहे. सूक्ष्म शरीर हे प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय आहे तर स्थूल शरीर अन्नमय आहे.
4) तीन अवस्था व तुरीय– स्थूल शरीराचा अभिमानी विश्व हा जागृत अवस्थेत असतो. सूक्ष्म शरीराचा अभिमानी तैजस हा स्वप्नावस्थेत असतो. अविद्येमध्ये प्रतिबिंबीत असलेले चैतन्य जे कारणशरीरावर अभिमान ठेवते त्यास प्राज्ञ म्हणतात. हा सुषुप्तिमध्ये (गाढ झोपेत) असतो. व्यष्टीच्या जागृत, स्वप्न आणि सुषुप्ति या अवस्थांच्या अपेक्षेने विश्व, तैजस आणि प्राज्ञ ही नावे अनुक्रमे आत्म्यास मिळतात. समष्टिच्या दृष्टीने (स्थूल, सूक्ष्म, कारण यांच्या अनुरोधाने) विराट वा वैश्वानर, हिरण्यगर्भ, प्राण किंवा सूत्रात्मा आणि ईश्वर अशी नावे आत्म्यास मिळतात. आत्म्याच्या या तीनही अवस्थांहून वेगळा, सर्वांना आधारभूत असा असलेला शुद्ध आत्मा तुरीय म्हटला जातो. तुरीयाला अव्याकृत किंवा शुद्ध ब्रह्म असे म्हणतात. साक्षीचैतन्य तुर्यावस्थेत भासते. झोपेतून जागे झाल्यावर वा झोपण्यापूर्वी एक क्षण असा असतो की ज्यात अहंकारादि विकार मुळीच नसतात. ज्ञाता व ज्ञेय यांचा लय झालेला असतो. आणि ज्ञानस्वरुप अशी स्थिती असते तीच तुरीय अवस्था होय.
5) जीवाच्या चार अवस्था– अज्ञानामुळे सुखदु:खांचा भास होत राहणार्या जीवास बद्ध, या भासमय दु:खातून सुटण्याची इच्छा असणार्या जीवास मुमुक्षु, त्यासाठी तप करणार्या जीवास साधक आणि भास ज्ञानामुळे नष्ट झाला की त्यास मुक्त सिद्ध असे म्हणतात.
कुंडलिनी जगदंबा विश्वाची उभारणी आणि संहारणी करते. या लेखात उभारणी बघुयात.
1) ब्रह्म व ब्रह्मशक्ती- जगाच्या पूर्वी एकमात्र ब्रह्म होते. त्यास अनेक व्हावे असे वाटले असे उपनिषदांमध्ये सांगितले आहे. तेव्हा त्याची ब्रह्मशक्ती प्रवृत्त होऊन विश्वनिर्मिती झाली. निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी सृष्टीच्या आरंभी मायेच्या तमोमयी मलीनतेचा प्रादुर्भाव होतो. हिला अनादि अविद्या किंवा आकाश असे गौण रीतीने म्हटले जाते. ही शक्ती परमेश्वराच्या स्वाधीन असते. मायेत प्रतिबिंबीत झालेला चिदात्मा तिला आपल्या स्वाधीन ठेवतो व त्यामुळे सर्वज्ञ, सर्वशक्ति इ. गुणांनी युक्त असा ईश्वर होतो. तर अविद्येत प्रतिबिंबीत झालेला जो चिदात्मा तो अविद्येच्या अधीन होतो. ईश्वराप्रमाणे तो तिला स्वाधीन ठेऊ शकत नाही. त्यामुळेच तो जीव होतो. ईश्वराच्या अपेक्षेने जीवाला प्राज्ञ असे म्हणतात. ही अविद्या जीवांच्या स्थूल व सूक्ष्म शरीरादिकांचे कारण असल्यामुळे तिला कारण शरीर म्हणतात.
ही बीजशक्ती अविद्यात्मक आहे. तिला अव्यक्त ही संज्ञा आहे. सर्व संसारी जीव आपले खरे स्वरुप काय आहे हे न समजता स्वस्थपणे घोरत पडून असतात. ही महानिद्रा आहे. या मायेपासून मिथ्या अशा पदार्थांच्या उत्त्पतीचा भास होतो. सत्त्व, रज आणि तम अशी त्रिगुणात्मक अशी ही अविद्या आहे. प्रलयानंतर अविद्या आणि जीवांची पूर्व कर्मे यांच्या सहाय्याने अमुक प्रकारचे जग निर्माण करावे असा परमात्मा संकल्प करतो. जगाचे उपादान कारण तम:प्रधान प्रकृति व निमित्तकारण चैतन्यस्वरुप ब्रह्माची कामना आहे. तम:प्रधान प्रकृतीमध्ये असलेले सत्त्व, रज, तम हे गुण आकाशादि तन्मात्रांतही अनुवृत्त होतात.
2) पंचमहाभूत व तन्मात्रा- ब्रह्मशक्ती प्रथम आकाश बनते. त्यानंतर आकाशातून वायू, वायूपासून अग्नि, अग्निपासून जल, जलापासून पृथ्वी अशा प्रकारे पंचमहाभूते तयार झाली. म्हणजे पुढे उत्पन्न होणार्या भूतात स्वत:चा व मागच्या भूताचा गुण (तन्मात्रा) असतो. आकाशाचा गुण शब्द, वायूचा स्पर्श, अग्निचा रुप, उदकाचा रस, पृथ्वीचा गंध.
आकाशापासून वायू झाला म्हणून वायूत आकाशाचा शब्द व स्वत:चा स्पर्श हे दोन्ही गुण आहेत. वायूपासून अग्नि झाला म्हणून अग्नित शब्द, स्पर्श व स्वत:चा रुप हे गुण आहेत, अग्निपासून उदक झाले म्हणून उदकात शब्द, स्पर्श, रुप व स्वत:चा रस हे गुण आहेत तर पृथ्वीत शब्द, स्पर्श, रुप, रस व स्वत:चा गंध हे गुण आहेत.
3) ज्ञानेंद्रिये, अंत:करण व तेथील देवता- आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी यात असलेल्या सात्त्विक अंशापासून क्रमाने श्रोत्र, त्वचा, चक्षु, रसन आणि घ्राण ही पाच ज्ञानेंद्रिये उत्पन्न झाली आणि पाच तन्मात्रांच्या ठिकाणी असलेल्या सत्त्वांशापासून अंत:करण (मन, बुद्धी, अहंकार व चित्त) उत्पन्न झाले. ज्ञानेंद्रियांच्या अनुक्रमे दिशा, वायु, सूर्य, वरुण आणि आश्विनी या आधिष्ठातृ देवता आहेत. तर मन, बुद्धी, अहंकार व चित्त यांच्या अनुक्रमे चंद्र, ब्रह्मा, शिव, विष्णु या देवता आहेत.
4) कर्मेंद्रिये पंचप्राण- पंचमहाभूतांच्या रजो अंशापासून क्रमाने वाक्, हस्त, पाद, गुद आणि मूत्रेंद्रिय ही कर्मेंद्रिये उत्पन्न झाली. शिवाय रजोअंशापासून पंचप्राण देखिल उत्पन्न झाले.
5) लिंग शरीर व आत्म्याची नावे- पंच ज्ञान, कर्म, प्राण व मन-बुद्धी अशा सतरा अवयवांचे सूक्ष्म (लिंग) शरीर बनते.
वर सांगितलेला कारणशरीराभिमानी प्राज्ञ (व्यष्टि) हा सूक्ष्म शरीरावर अभिमान ठेवू लागला म्हणजे तो तैजस या संज्ञेस प्राप्त होतो. अंत:करण हे सत्त्वगुणांचे कार्य असल्यामुळे त्याला तेज असे म्हणतात. त्या तेजावरुन उपलक्षित होणार्या लिंग शरीरावर ममत्व ठेवल्यामुळे अविद्येमध्ये प्रतिबिंबीत झालेला प्राज्ञ हा तैजस होतो. त्याचप्रमाणे सर्व लिंगशरीरांच्या समष्टिवर अभिमान ठेवल्यामुळे मायोपाधिक ईश्वर हा हिरण्यगर्भ या नावाला धारण होतो. हिरण्यगर्भास सूत्रात्मा (सर्व सूक्ष्म शरीरांना वस्त्रात जशी सूत्रे व्यापून राहतात तसे हा व्यापून राहतो.) आणि प्राण (क्रियाशक्तीमान प्राण) अशी आणखी दोन नावे आहेत.
आकाशादि अपंचीकृत पंचतन्मात्रापासून पंचीकरणाच्या योगाने स्थूल उत्पत्ती ईश्वर जीवांच्या भोगांसाठी उत्पन्न करतो. पंचीकृत भूतांमध्ये अव्यक्त असलेले गुण (तन्मात्रा) व्यक्त होतात. आकाशादिकांपासून अनुक्रमाने उत्पन्न झालेल्या श्रोत्र, त्वक, चक्षु, रसन व घ्राण या पाच ज्ञानेंद्रियांचे विषयही अनुक्रमे श्रोत्राचा शब्द, त्वचेचा स्पर्श, नेत्राचा रुप, जिव्हेचा रस तर नाकाचा गंध असे आहेत.
ब्रह्मांडाची उत्पत्ती
1) सात लोक- तमोगुणापासून पंचीकृत भूतांपासून भूमि, आकाश, स्वर्ग, मह, जन, तप व सत्य हे ऊर्ध्व असलेले सात लोक आणि वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताल हे सात अधोलोक असे ब्रह्मांड निर्माण झाले.
2) स्थूल शरीर- पृथ्वीपासून वनस्पती, वनस्पतीपासून अन्न, अन्नापासून पित्याचे रेत आणि मातेचे शोणित, रेत आणि शोणित मिळून स्थूल शरीर जीवाला प्राप्त झाले. स्थूल शरीर चार प्रकारची आहेत- जरायुज (गर्भातून उत्पन्न), अंडज (अंड्यातून उत्पन्न झालेले), स्वेदज (घामातून उत्पन्न झालेले) आणि उद्भीज (जमिनीतून उत्पन्न झालेले)
सर्वस्थूल शरीरांवर अभिमान ठेवणार्या समष्टिला विराट (विविधतेने शोभणारा) किंवा वैश्वानर म्हणतात. प्रत्येक स्थूल शरीरावर अभिमान ठेवणार्या तैजसाला विश्व म्हणतात.
3) पंचकोश- कोळी जसा स्वत:च्या जाळ्यात गुरफटतो तसे पंचकोषांनी आत्मा आच्छादित होतो. स्थूल देहाला अन्नमयकोश, लिंग देहातील कर्मेंद्रिये आणि प्राण असे मिळून प्राणमय, ज्ञानेंद्रिये आणि मन मिळून मनोमय, ज्ञानेंद्रिये आणि बुद्धी हा विज्ञानमय तर तीन सुखांसह (प्रिय- इष्ट वस्तू दर्शनाने, मोद- इष्ट वस्तूचा लाभ झाल्यावर व प्रमोद- इष्ट वस्तूचा भोग घेतल्यावर) असलेले कारण शरीर भूत अविद्येत असणारे जे मलिनसत्त्व त्यास आनंदमयकोश असे म्हणतात. कारण शरीर आनंदमय आहे. सूक्ष्म शरीर हे प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय आहे तर स्थूल शरीर अन्नमय आहे.
4) तीन अवस्था व तुरीय- स्थूल शरीराचा अभिमानी विश्व हा जागृत अवस्थेत असतो. सूक्ष्म शरीराचा अभिमानी तैजस हा स्वप्नावस्थेत असतो. अविद्येमध्ये प्रतिबिंबीत असलेले चैतन्य जे कारणशरीरावर अभिमान ठेवते त्यास प्राज्ञ म्हणतात. हा सुषुप्तिमध्ये (गाढ झोपेत) असतो. व्यष्टीच्या जागृत, स्वप्न आणि सुषुप्ति या अवस्थांच्या अपेक्षेने विश्व, तैजस आणि प्राज्ञ ही नावे अनुक्रमे आत्म्यास मिळतात.
समष्टिच्या दृष्टीने (स्थूल, सूक्ष्म, कारण यांच्या अनुरोधाने) विराट वा वैश्वानर, हिरण्यगर्भ, प्राण किंवा सूत्रात्मा आणि ईश्वर अशी नावे आत्म्यास मिळतात.
आत्म्याच्या या तीनही अवस्थांहून वेगळा, सर्वांना आधारभूत असा असलेला शुद्ध आत्मा तुरीय म्हटला जातो. तुरीयाला अव्याकृत किंवा शुद्ध ब्रह्म असे म्हणतात. साक्षीचैतन्य तुर्यावस्थेत भासते. झोपेतून जागे झाल्यावर वा झोपण्यापूर्वी एक क्षण असा असतो की ज्यात अहंकारादि विकार मुळीच नसतात. ज्ञाता व ज्ञेय यांचा लय झालेला असतो. आणि ज्ञानस्वरुप अशी स्थिती असते तीच तुरीय अवस्था होय.
5) जीवाच्या चार अवस्था- अज्ञानामुळे सुखदु:खांचा भास होत राहणार्या जीवास बद्ध, या भासमय दु:खातून सुटण्याची इच्छा असणार्या जीवास मुमुक्षु, त्यासाठी तप करणार्या जीवास साधक आणि भास ज्ञानामुळे नष्ट झाला की त्यास मुक्त सिद्ध असे म्हणतात.