शक्तिपातयोग – लेख क्र. 7 अनंत शक्ती

अनंत शक्ती

अनंत शक्तीला सर्पाकार असे म्हटले आहे कारण अणुस्वरुप धारण करण्याकरता जणु चक्राकार फिरु लागते. हीच नारायणाची शैय्या म्हणजे शेष (अनंत) आहे किंवा हिला उच्छिष्ट ब्रह्म असेही म्हणतात. ब्रह्मांड धारण करण्याकरता हिचा उपयोग होतो म्हणून ती आपला हजार फण्यांवर ब्रह्मांडाला धारण करते असे म्हटले जाते. ही शिल्लक राहिलेली शक्ती पिंड शरीराची रचना झाल्यावर मूलाधारात शरीराला धारण करत पडून राहते. गुरुकृपा होताच प्रतिप्रसवक्रमाने संहारणी करते.

मातीतून क्रमाने मडके बनणे हा अनुप्रसव व मडके तोडून क्रमाने परत माती करणे हा प्रतीप्रसव. कुंडलिनी जागृत झाल्यामुळे ती शक्तीच साधकाचा प्रतीप्रसव करते. एकेका अवस्थेवर संयम आपोआप होत जातो. पूर्व पूर्व अवस्थेचा साक्षात्कार होत जातो. प्रज्ञा जागृत होते. यामुळे भूतजय, इंद्रियजय होतो. स्थूल तत्त्वे सूक्ष्म तत्त्वात (तन्मात्रा), सूक्ष्म त्याच्या उपादान कारणात, आणि ते कारण महाकारणात लय होते. त्रिगुण साम्य स्थितीला जातात. योग्याचा ज्ञानप्रलय होतो.

प्रसव– आकाशातून वायू, वायूपासून अग्नि, अग्निपासून जल, जलापासून पृथ्वी अशा प्रकारे पंचमहाभूते तयार झाली. म्हणजे पुढे उत्पन्न होणार्‍या भूतात स्वत:चा व मागच्या भूताचा गुण असतो. आकाशाचा गुण शब्द, वायूचा स्पर्श, अग्निचा रुप, उदकाचा रस, पृथ्वीचा गंध. आकाशापासून वायू झाला म्हणून वायूत आकाशाचा शब्द व स्वत:चा स्पर्श हे दोन्ही गुण आहेत. वायूपासून अग्नि झाला म्हणून अग्नित शब्द, स्पर्श व स्वत:चा रुप हे गुण आहेत, अग्निपासून उदक झाले म्हणून उदकात शब्द, स्पर्श, रुप व स्वत:चा रस हे गुण आहेत तर पृथ्वीत शब्द, स्पर्श, रुप, रस व स्वत:चा गंध हे गुण आहेत. यापासून सूक्ष्म आणि स्थूल सृष्टि कशी बनली हे मागच्या लेखात बघितले आहेच. प्रतिप्रसव- हीच तत्त्वे त्याच्या मागील कारणात लय पावत जातात. जसा घडा मोडतो आणि तो परत माती बनतो.

या सर्वामागे गुरुकृपा असते. साधकाच्या योग्यतेनुसार कर्म, भक्ती, ज्ञान, जप-तप, यंत्र-मंत्र जे काही गुरु करायला लावतात त्यामागे हा उपसंहार सुलभतेने घडून ज्या मूल अज्ञानामुळे जीव दु:खचक्रात सापडलेला आहे ते अज्ञान नाहिसे व्हावे आणि त्याला त्याचे मूळ स्वरुप कळावे हाच उद्देश असतो. गुरुकृपा हाच सर्वात सुलभ मार्ग यासाठी आहे. शिवसंहितेमध्ये दुसर्‍या पटलात म्हटलंय की जे ब्रह्मांडात आहे ते सर्वच शरीरात आहे.

देहेऽस्मिन्वर्तते मेरु:सप्तद्वीपसमन्वित: ॥
सरित: सागरा: शैला:क्षेत्राणि क्षेत्रपालका: ॥1॥
ऋषयो मुनय: सर्वे नक्षत्राणि ग्रहास्तथा ॥
पुण्यतीर्थानि पीठानि वर्तन्ते पीठदेवता:॥2॥

सर्व तीर्थे, सर्व प्रकारचे पर्वत, नद्या, समुद्र, ऋषीमुनी, क्षेत्रपाल, ग्रह-उपग्रह, नक्षत्र, सिद्धपीठ व त्यांच्या देवता सर्वांचा वास या शरीरातच आहे. माणूस तीर्थात भटकत राहतो पण शरीरातले हे रहस्य जाणत नाही. याशिवाय त्रिलोकातील पंचमहाभूते, सृष्टी स्थितीला व संहाराला साहाय्य करणारे सूर्यचंद्र शरीरातील सुमेरुचा आश्रय घेऊन राहतात. जे जे ब्रह्मांडात आहे ते ते सर्व या शरीरात आहे. जो साधक पिंडब्रह्मांडाची एकरुपता शरीरात बघतो तो निस्संदेह ज्ञानी होतो.

या शरीरातच गंगा, यमुनादि 72 हजार नद्या नाड्यांच्या रुपाने वाहतात. त्यातही प्रधान नाडी साडेतीन लाख आहेत. त्यातही मुख्य चौदा आहेत- सुषुम्ना, इडा, पिंगला, गांधारी, हस्तिजिव्हा, कुहू, सरस्वती, पूषा, शंखिनी, पयस्विनी, वारुणा, अलंबुसा, विश्‍वोदरी आणि यशस्विनी. इडारुपी गंगा, पिंगलारुपी यमुना आणि सरस्वतीरुपी सुषुम्ना या तीन नाड्यांच्या संगमावर मनाने स्नान करतो तो मुक्त होतो. हा संगम शिवतीर्थ आहे.

तिसृष्वेका सुषुम्णैव मुख्या सा योगिवल्लभा ॥
अन्यास्तदाश्रयं कृत्वा नाड्य: सन्ति हि देहिनाम्॥16॥

इडा, पिंगला, सुषुम्ना या तीन नाड्यांमधे एकच सुषुम्ना मुख्य आहे कारण परम पदाची ती दाता आहे. योग्यांना हितकारी आहे. अन्य नाड्या तिचा आश्रयाने शरीरात राहतात. पुढे म्हटलंअ की या तीन नाड्या अधोवदना आहेत म्हणजे खाली मुख कमलतंतु सदृश आहे आणि चंद्र सूर्य अग्नि समान आहेत अर्थात इडा चंद्ररुप आणि पिंगला सूर्यरुप आणि सुषुम्ना अग्निरुप आहे. या तीन नाडी मेरुदंडाच्या आश्रयाने राहतात.

लेखन/संशोधन- दामोदर प्र. रामदासी, पुणे.
(योद्धा संन्यासी-स्वामी विवेकानंद या एकपात्री नाटकाचे राष्ट्रीय नाटककार, व्याख्याते, प्रवचनकार व लेखक)
रामदासी मठ- नवगण राजुरी, जि. बीड (योगीराज सद्गुरु श्रीकल्याणस्वामी शिष्य सद्गुरु दाजीमहाराज परंपरा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *