About

दिनदर्शिका

दिनदर्शिका या पोर्टल ची सुरुवात 2021 मध्ये झाली.

या पोर्टल चा उद्देश्य हिंदू धर्म ,वेद,उपनिषद, पुराण, ग्रंथ, धर्मातील महान परंपरा,हिंदू धर्मामधील प्रचलित कथा,संतांची जीवन कथा, यांची सखोल ,सत्य ,आणि  सत्यता पडताळून ऑनलाईन माहिती उपलब्ध करून देणे हे आहे.

संतांनी संकलित केलेल्या ज्ञानाचा प्रसार करणे संतांनी केलेल्या कार्याची माहिती देणे त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे आणि जनजागृती करणे हे ध्येय ठेवून आम्ही या पोर्टल ची सुरुवात केली. 

दिनदर्शिका पोर्टल साठी संपूर्ण माहिती लिहिणारे लेखक यांच्याविषयी :-

The story of

लेखक – श्रीप्रकाश गणपत काळे (रामदासी)  यांचा परिचय

जिव्हाळा परिवाराचे प्रणेते (जिव्हाळा परिवाराची स्थापना 1981 चा गुढीपाडवा) व विश्वप्रसिद्ध ‘”आपली संस्कृती”’ या ग्रंथाचे लेखक आदरणीय प. पू. श्रीमाऊलीसुत (श्रीज्ञानेश्वरमहाराजांचा मुलगा ही समाजाने दिलेली पदवी), बालमित्र (शिक्षणक्षेत्राने दिलेली पदवी), वयाच्या 5 व्या वर्षापासून कीर्तन-प्रवचन करणाऱ्या श्रीप्रकाश गणपत काळे (रामदासी) यांचा जन्म 27 जानेवारी 1957 ला पैठणजवळील ‘लाडजळगाव’ (ता. शेवगाव, जि. अ.नगर, महाराष्ट्र) या गावी परंपरेने भक्तिचा वारसा चालत आलेल्या भक्ति संपन्न घराण्यातील प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. श्री गणपत दामोदर काळे (रामदासी) व सौ. मालनबाई या दांपत्याच्या पोटी झाला. स्वामी विवेकानंद हे प्रेरणा तर श्रीज्ञानेश्वर माउली, भगवान् श्रीकृष्ण ही त्यांची श्रद्धास्थाने आहेत. ते इ.स. 1984 पासून पुण्यात राहावयास आले.

त्यांची व्यक्तिमत्त्वविकास, स्वामी विवेकानंद व श्रीज्ञानेश्वर या विषयांवरील व्याख्याने तसेच कीर्तने-प्रवचने, श्रीरामायण, श्रीमद्भागवत व श्रीदुर्गासप्तशतीसप्ताह पारायण सोहळे म्हणजे श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळीच असते. अनेक वर्तमानपत्रांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली. दूरदर्शन (बालचित्रवाणी) वर ‘भारतपुत्रांच्या कथा’ही त्यांची मालिका अत्यंत लोकप्रिय झाली.

त्यात त्यांची पत्नी सौ. प्रमिला त्यांना मोलाचे सहकार्य करीत आहेत. त्यांनी व्यक्तिमत्त्वविकास, मूल्यशिक्षण व परिपाठ यांचे जे संशोधन केले त्याचा प्रत्येक शिक्षणसंस्थेत प्रसार झाला आहे. अग्निपरीक्षेतून तप्त होऊन शुध्द सोन्यासारखे असलेले त्यांचे जीवन सर्वांना आदर्श व प्रेरणादायी आहे. त्यांनी मधुगीत भारत, अमृतकुंभ, अमृताच्या पुत्रांनो, सप्तशतीविवरण, गंगाजल, दिव्यांजन, भगवंत विजय, प्रेरणा विवेकानंदांच्या, वाल्मीकी रामायणातील ‘श्रीराम’, भागवतातील श्रीकृष्ण’, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, पसायदान-एक काळाची गरज, ब्रह्म तुकासी आले, श्रीगजानन बाबांचे चमत्कार आणि उद्देश, श्रीज्ञानेश्वरीतील दृष्टांत व सिद्धांत, नित्यकर्म, आपले नवरात्र, चैत्र, आपली संस्कृती, संस्कार इ. अनेक विषयांवर लिखाण केले. या पोर्टलवर त्यांनी लिहिलेल्या “आपली संस्कृती” या विश्र्व प्रसिद्ध ग्रंथातील विविध विषयावरील लेख प्रसिध्द करत आहोत.

लेखक – श्री दामोदर प्रकाश रामदासी यांचा परिचय

श्री दामोदर प्रकाश रामदासी हे पुणे (महाराष्ट्र) येथील प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते आहेत. पुणे विद्यापीठातून कला शाखेतील पदवी घेतल्यानंतर त्यांनी मास कम्युनिकेशन एण्ड जर्नेलीजम पदविका पूर्ण केली. २००० साली आकाशवाणी पुणे येथे त्यांनी युवावाणी सदरात सूत्र संचालन केले. शिवाय जाहिरातीसाठी रेडिओ जिंगल्स लिहिल्या. त्यांनी 2003 (पुणे) मध्ये प्रोग्रेसिव्ह ड्रामाटिक असोसिएशन या संस्थेत नाट्यप्रशिक्षण घेतले. 2007 मध्ये सत्यानंद योग केंद्र (बिहार स्कूल ऑफ योगा, मुंगेर, पुणे केंद्र) यांच्या आचार्यांकडून योग प्रशिक्षण घेतले. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये त्यांचा जन्म १० मार्च १९७८ रोजी झाला. 1994 पासून ज्ञानेश्वरी, दासबोध, श्रीकृष्ण, आद्य  शंकराचार्य, स्वामी विवेकानंद इत्यादी विविध आध्यात्मिक विषयांवर प्रवचन देत आहेत.

त्यांनी लोकप्रिय सांस्कृतिक मराठी पुस्तके “आपली संस्कृती”, “आरोग्य संपन्न शंभर वर्षे जगा” आणि “श्रीज्ञानेश्वरीतील सिद्धांत आणि दृष्टांत” संपादित केली आहेत. 2002 पासून ते मूल्यशिक्षण, व्यक्तिमत्व विकास, तणाव व्यवस्थापन, आनंदी जीवन आणि ध्यान-धारणा यावर कार्यशाळा, भाषणे आणि चर्चा आयोजित करत आहेत.

 2009 डिसेंबर पासून ते देशभरात हिंदी आणि मराठी भाषेत “योद्धा संन्यासी-स्वामी विवेकानंद” हे एकल नाटक सादर करत आहेत. आणि 2018 पासून “आद्य शंकराचार्य” या नाटकाचे सादरीकरण त्यांनी सुरु केले आहे.

लेख, व्याख्यान, अभिनय, योग अशा विविधांगी अविष्काराचे पैलू लाभलेल्या श्री. दामोदर यांचे लेख या ब्लॉगवर वाचकांसाठी दिले आहेत.