दिवाळी ची संपूर्ण माहिती शास्त्र आधारे | Diwali in Marathi

दिवाळी सहा दिवस चालणारा हा सण | 6 days of Diwali in marathi

तमसो मा ज्योतिर्गमय् । अंधारातून उजेडाकडे नेणारा, प्रकाश, आनंद, समृद्धी व ऐक्य देणारा सण म्हणजे दिवाळी होय. अश्‍विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया असा सहा दिवस चालणारा हा सण अनादिकालापासून चालत आला आहे. वसुबारस अश्‍विन व.॥12॥, धनत्रयोदशी अश्‍विन व.॥13॥, नरक चतुर्दशी अश्‍विन व.॥14॥, श्रीलक्ष्मी कुबेर पूजन अश्‍विन व.॥30॥, बलिप्रतिपदा (पाडवा) कार्तिक शु. ॥1॥ व भाऊबीज (यमद्वितीया) कार्तिक शु.॥2॥ या सहा उत्सवांचे मधुर संमेलन म्हणजे ‘दिवाळी’ होय.

दिवाळी चा उल्लेख कुठे आढळतो | diwali in puranas marathi

दीपावलीचे ऋग्वेद, बौद्ध, जैन, चाणक्यनीती यांनीही वर्णन केले आहे. इ.स. 200 ते 600 या गुप्त काळात या सणाला यक्षरात्री असे म्हणत. समकालीन साहित्यात माहितांनी या नावाने या सणाचा उल्लेख आढळतो. इ.स.600 च्या सुमारास या सणाला दीपप्रतिपदुत्सव असे म्हणत. कनोजचा राजा हर्षवर्धन याने लिहिलेल्या नागानंद या नाटकात या सणाला दीपमाला उत्सव असे नाव दिले आहे. 11 व्या शतकात श्रीपती नावाच्या ज्योतिषाचार्याने आपल्या ज्योतिष रत्नमाला या ग्रंथावरील मराठी टीकेत दिवाळी हा शब्द वापरला आहे तर ग्रंथराज ज्ञानेश्‍वरीत श्रीज्ञानेश्‍वर महाराजांनी दिवाळीचा अनेक ठिकाणी अनेक प्रकारे उल्लेख केलेला आहे. तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची। दिवाळी करी ॥12॥ (ज्ञा.अ.15) अकबराने ‘ऐने अकबरी’ मध्ये दिवाळीचे वर्णन केले आहे.

हा सण व्यापार्‍यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे कारण व्यापारीवर्ग धनत्रयोदशीपासून ते बलिप्रतिपदेपर्यंत प्रत्येक दिवसाला शुभ मानतो. वह्या आणणे, त्यांचे पूजन करणे व त्यांच्यात हिशोब लिहिण्यास प्रारंभ करणे या प्रक्रिया ते या कालावधीत करतात. त्याला ते चौघडिया वा शिवालिखित मुहूर्त असे म्हणतात. या मुहूर्तामध्ये शुभ, अमृत, लाभ व चंचल हे मुहूर्त पूजनाला ग्राह्य समजले जातात तर योग, काल आणि उद्वेग यांना ते अशुभ मुहूर्त समजतात. भारतात सगळीकडे हा उत्सव उत्साहाने संपन्न करतात. भविष्योत्तर पुराणात दिवाळीला ‘कौमुदी’ (कु= पृथ्वी + मुद= आनंदित होणेे) असे म्हणतात.

गुजराथमध्ये वसुबारसेच्या दिवशी अंगणात वाघाचे चित्र काढतात व ते भाऊबीजेपर्यंत ठेवतात, याला ते ‘वाघवाराम’ असे म्हणतात तर कार्तिक प्रतिपदेला काळभैरवाची पूजा करतात.

राजस्थानी लोक दिवाळीचा संबंध राम वनवासातून परत आले या घटनेशी जोडतात. ते या काळात लंकादहनाचा देखावा उभा करून शोभेची दारू उडवितात व मांजरीला लक्ष्मी मानून तिची सेवा करतात. ते प्रतिपदेला ‘खेकटा’ म्हणतात. या दिवशी राजस्थानी लोक अन्नकोट करून गरिबांना ते अन्न वाटतात.

पंजाबमध्ये रामाच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने दिवाळी साजरी केली जाते. दिवाळी-पाडव्याच्या दिवशी सुवर्णमंदिराची स्थापना झाल्यामुळे अमृतसर येथे शीख लोक हा सण भव्य प्रमाणात संपन्न करतात तर सिंधी लोक गावाबाहेर रात्री मशाली लावून नृत्य करतात.

दक्षिणभारतात बलिप्रतिपदेला रेड्यांच्या टकरी लावतात व गाय आणि बैल यांच्या मिरवणूका काढतात. गोव्यात शेजार्‍यांना व नातेवाईकांना दूध, गूळ, पोहे व फराळ नेऊन देण्याची पद्धत आहे. यातून परस्परांत स्नेहसंवर्धनाचे कार्य होते. हिंदुराष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये दिवाळी भव्य प्रमाणात संपन्न केली जाते.

दिवाळीबद्दल एक पुराणकथा | Diwali katha in marathi

दिवाळीबद्दल एक पुराणकथा आहे. इंद्रप्रस्थनगरीचा राजा ‘हंस’ एकदा शिकारीला गेला. थकलेला राजा प्रवास करत ‘हैम’ नावाच्या राजाच्या नगरीत गेला. हैम राजाला मुलगा झाला असल्याने नगरीत आनंदोत्सव संपन्न होत होता. या आनंदाप्रीत्यर्थ षष्ठीपूजनाचा कार्यक्रम चालला असताना षष्ठी देवी स्त्रीरूप घेऊन त्या कार्यक्रमास आली व हैम राजास म्हणाली,‘हे राजा! ज्या मुलासाठी तू हा कार्यक्रम करत आहेस तो मुलगा लग्न झाल्यावर चौथ्या दिवशी मरणार आहे.’ हैम व हंस या दोघांना षष्ठी देवीचे वक्तव्य ऐकून दु:ख झाले. हंसराजाने हैमराजाच्या मुलाला आपल्या इंद्रप्रस्थ नगरीत आणले व नगरीजवळच्या एका सरोवरात एक घर बांधून त्यात त्या मुलाला कडक बंदोबस्तात ठेवले. वयाच्या सोळाव्या वर्षी मुलाचे लग्न झाले. नियतीने ठरविल्याप्रमाणे चौथ्या दिवशी तो मुलगा मानवी सुरक्षा असूनही सर्पदंशाने मृत्यू पावला. हैम व हंस या दोनही राजांचे कुटुंबीय व नववधूचा भयाण शोक यमदूतांनाही पाहावला नाही. ते मुलाचे प्राण घेऊन यमाकडे गेले. त्यांच्या डोळ्यात पाणी पाहून यमधर्माला आश्‍चर्य वाटले. त्यांंनी यमधर्माला विनंती केली,‘हे प्रभो ! आपण एवढे भयाण प्रसंग घडू देऊ नयेत’ तेव्हा यमाने दूतांना वचन दिले की,‘अश्‍विन वद्य ॥13॥ ते कार्तिक शुद्ध ॥2॥ या काळात ज्यांच्या घरासमोर दीपमाळा असतील त्या घरात अपमृत्यू होणार नाही’ म्हणून त्या दिवसापासून या काळात प्रत्येक घरावर, दारात व घरात दिवे लावण्याची परंपरा सुरू झाली. दिवे लावले जातात म्हणून या सणाला ‘दिवाळी’ असे म्हणतात. या काळात प्रत्येक घराच्या दारात आकाशकंदील (‘आकाश’ हा संस्कृत तर ‘कंदील’ हा अरबी परंतु मूळ फारशी शब्द आहे. इंग्रजीत ‘लॅटर्न’ असे म्हणतात.) लावला जातो. यमदूतांना आपल्या घराचा दिवा उंचावरून दिसावा म्हणून आकाशात जो कंदील लावला जातो त्याला आकाशकंदील म्हटले जाते. अलिकडे हे कंदिल चांदणी, गोल व झिरमाळ्या लावलेले असतात. त्यासाठी थर्माकॉल वा रंगीत कागदांचा वापर करतात व त्यात विजेचा दिवा लावतात. पूर्वी आर्य लोक उत्तर ध्रुवावर राहत असत. उत्तर ध्रुवावर सहा महिन्यांची रात्र व सहा महिन्यांचा दिवस असतो. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला या परिसरात सूर्याचे पहिले किरण दिसतात. सहा महिन्यांच्या रात्रीनंतर व सूर्यप्रकाशाची प्रतिक्षा केल्यानंतर हे किरण आर्यांना अत्यंत आनंद देत असत म्हणून त्यांनी त्याचेे स्वागत दीपोत्सवाने केले. ती परंपरा आजही भारतामध्ये घराघरांत पाळली जाते.

दिवाळी सण कसा साजरा करतात ? | how to celebrate Diwali in marathi

दिवाळीच्या सणाचा प्रारंभ धनत्रयोदशीपासून केला जातो. अभ्यंग स्नानामध्ये गर्दी होऊ नये म्हणून धनत्रयोदशीला महिलांचे व चतुर्दशीला पुरुषांचे असे दोन दिवस अभ्यंग स्नानाचे आयोजन केले जाते. दिवाळीत सायंकाळी दारासमोर गाईच्या शेणाचा सडा टाकला जातो कारण गाईच्या शेणामध्ये फॉरमल्डीहाईड हे जंतुनाशक आहे. त्या सड्यामुळे घराचे अंगण निर्जंतुक व स्वच्छ होते. दिवाळीपूर्वी अखंड पडणार्‍या पावसामुळे घराचा परिसर घाण झालेला असतो म्हणून दिवाळीत संपूर्ण घर झाडून काढून रंग देतात. घराभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. सडा टाकलेल्या अंगणात रांगोळी काढली जाते. अखिल मानवजातीला आपल्या अंकावर धारण करणार्‍या पृथ्वीला नटविण्यासाठी तिच्यापासून निर्माण झालेल्या शिरगोळ्याच्या पिठाने रांगोळी काढली जाते. रांगोळी, गेरू, काव व तांदळाचे पांढरे शुभ्र पिठ व त्यात अनेक रंग मिसळून किंवा हळद-कुंकू एकत्र करून रंगीत रांगोळी काढली जाते. बंगाल व बिहारमध्ये अल्पना, राजस्थानात मांडना व माळना, उत्तर प्रदेशात चौकपूर्णा, गुजराथमध्ये साशिया, सौराष्ट्रात टोडलो, महाराष्ट्रात रांगोळी, रंगावली, कर्नाटकात रंगोली, आंध्रात मुगुर्लु, तमिळनाडूमध्ये कोलम व केरळात पूविरल अशा अनेक नावांनी रांगोळीचा उल्लेख केला जातो. व्रतवैकल्याच्या निमित्ताने काढल्या जाणार्‍या रेखांकनास सांझी व कजली तर आदिवासींच्या रांगोळ्यांना इत्तल असे म्हणतात. याशिवाय वारली, यारू, मधुबनी इ. चित्रांकने आहेत. रांगोळ्या सर्व धर्मांत काढतात. रांगोळ्या अनादिकालापासून काढतात. सीतास्वयंवरात व रामराज्यारोहणाच्या प्रसंगी जनकपूरी तसेच अयोध्येतील लोकांनी रांगोळ्या काढल्या होत्या असा रामायणात उल्लेख आहे. मोहेंजोदडो व हडप्पा यांच्या उत्खननातसुद्धा रांगोळ्या काढलेल्या आढळल्या तर वेरूळ-अजिंठ्याच्या लेण्यात आजही रांगोळ्यांच्या आकृत्या आहेत. दिवाळीत सडा, रांगोळ्या व कुंभाराकडून आणलेल्या मातीच्या अनेक आकारांच्या पणत्यात गोडे तेल व कापसाच्या दोन वाती ठेऊन लावलेले दिवे तसेच विजेच्या दिव्याच्या रोषणाईबरोबर अनेक पक्वांनाचा आस्वाद घेतला जातो. अष्टक, पार्वण, श्राद्ध, श्रावणे, अग्रयण, चैत्री व अश्‍वयुजी हे सात पाकयज्ञ आहेत. त्यातील पार्वण, अग्रयण व अश्‍वयुजी हे तीन पाकयज्ञ दिवाळीत करतात. दिवाळीत करंज्या, लाडू, कडबोळे, शंकरपाळे इ. पदार्थ करतात. थंडीच्या दिवसात स्निग्ध पदार्थांमुळे प्रकृती पुष्ट होते त्यामुळे दिवाळीत तळीव व तुपट पदार्थांची रेलचेल असते. दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी फटाक्यांची आतषबाजी दररोज स्नानानंतर पहाटे व सूर्यास्तानंतर केली जाते. सुमारे 13 व्या शतकाच्या आधीपासून शोभेच्या दारूचा विकास होत गेला. तोटे, सुतळी बाँब, पेपर मॉटर्स, टिकल्या व आपटबार हे मोठा आवाज करणारे, फुलबाजा, चंद्रदोषी, भुईनळे, नळे, लॅनसेल्स व काडेपेटी हे रंगीबेरंगी ज्योती व चांदण्याप्रमाणे ठिणग्या वा रंगीत धूर निर्माण करतात. हवेत उंच उडणारे बाण (रॉकेट), वेगात पळत जाणारे टॉमपेडो, वेड्यावाकड्या जाणार्‍या चिचूंद्र्या, भुईचक्रे, सुदर्शनचक्रे वा सॅकसॉम्स, मामा-मामी इ. फटाके आहेत. फटाक्यांसाठी ज्वलनशील वा ज्वालाग्राही (हलक्या कोळशाची पूड, गंधक, अँटीमनी सल्फाईड- तांबडा फॉस्फरस इ.) पदार्थ व ज्वलनसाहाय्यक (ऑक्सिजडायझर्स= पोटॅशिअम नायट्रेट उर्फ सोरा (सॉल्ट पीटर) पोटॅशिअम क्लोरेट असे क्षार असून ते उष्णतेमुळे स्वत: विघटन पावून ऑक्सिजनचा पुरवठा ज्वलनशील पदार्थांना करतात.) पदार्थ अशी दोन रसायने लागतात. ज्वलनशील पदार्थांना जळण्यासाठी ऑक्सिजन लागतो तर ज्वलनसहाय्यकपदार्थांकडे ऑक्सिजन रासायनिक स्वरूपात साठवलेला असून ज्वलनक्रिया करणारे पदार्थ ऑक्सिजन उपलब्ध करून देतात. सेंद्रिय पदार्थ अधिक स्फोटक असल्याने ते फटाक्यात वापरत नाहीत. फटाके उडवताना लहानांंबरोबर मोठ्यांनी थांबावे.

दिवाळीचा सण धनत्रयोदशीपासून जरी प्रारंभ होत असला तरी अश्‍विन वद्य द्वादशीपासून या सणाचा खरा प्रारंभ होतो.

वसूबारस | Vasubaras in marathi

(1)वसूबारस:- श्रद्धा व अंधश्रद्धा यांतील अंतर समजावून सांगणारा हा दिवस होय. या सणाला वसूबारस, गोवत्स द्वादशी वा गौबारस असेही म्हणतात. इंद्र पाऊस पाडतो म्हणून इंद्राची पूजा केली पाहिजे अशी गोकुळातील लोकांची अंधश्रद्धा होती परंतु ‘गोवर्धन पर्वतामुळे पाऊस पडतो, आपण त्याची पूजा केली पाहिजे’ असे श्रीकृष्णाने गोकुळातील लोकांना सांगितले. लोकांनी गोवर्धनाची पूजा केली त्यामुळे इंद्र चिडला व त्याने मुसळधार पाऊस पाडला तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन उचलून धरला व त्याखाली गोकुळवासीयांचे रक्षण केले तो दिवस म्हणजे ‘वसूबारस’ होय. ती स्मृती म्हणून वसूबारसेला श्रीकृष्ण, गाय व गोप यांच्या प्रतिकृतीची पूजा करून गाईचे दूध, राळ्याचा भात व गूळ एकत्र करून खातात.

धनत्रयोदशी | Dhantrayodashi in marathi

(2) धनत्रयोदशी:- ‘लक्ष्मीच्या श्रीमंतीबरोबर आरोग्याची श्रीमंती महत्त्वाची आहे’ हा संदेश देणारा हा दिवस धनत्रयोदशी, धनतेरस, धन्वंतरी जयंती, धनपूजन दिवस व यमस्वागत दिन या नावांनी ओळखला जातो. विद्याधरीने दिलेली दिव्य माळ दुर्वासमुनींनी इंद्राला दिली. इंद्राने ती ऐरावतीच्या गळ्यात घातली. ऐरावतीने ती माळ तोडून पायदळी तुडवल्यामुळे आपला अपमान समजून चिडलेल्या दुर्वासाने ‘तुझे ऐश्‍वर्य नष्ट होईल’ असा इंद्राला शाप दिला. इंद्र ऐश्‍वर्यहीन झाला तेव्हा सर्व देव विष्णुकडे यावर उपाय विचारण्यास गेले तेव्हा विष्णुने समुद्रमंथनाचा सल्ला दिला. त्यानंतर देव-दानवांनी ‘मंदराचल’ पर्वताची रवी व ‘वासुकी’ नागाची दोरी करून समुद्रमंथन केले. त्यातून लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्रमा, कामधेनू, ऐरावत, रंभा, उच्चै:श्रवा, शारंग, धनुष्य, शंख व अमृत ही चौदा रत्ने प्रगट झाली. अमृतकलश घेऊन आलेल्या धन्वंतरीच्या हातातील कलश देव-दानवांनी खेचून घेतला. या वादात कलशातील अमृत बारा ठिकाणी पडले. त्यातील आठ ठिकाणे इतर ग्रहावर व चार ठिकाणे पृथ्वीवर आहेत. पृथ्वीवर जिथे अमृत पडले तिथे कुंभमेळे भरतात.

1.प्रयाग- मकरराशीत चंद्र, सूर्य, वृषभराशीत गुरू व अमावस्या ही तिथी असताना 2.हरिद्वार- कुंभराशीत गुरू व मेषराशीत सूर्य असताना 3.नाशिक- सिंहराशीत गुरू व चंद्र तसेच कर्कराशीत सूर्य असताना 4.उज्जैन- तुळराशीत सूर्य व वृश्‍चिकराशीत गुरू असताना कुंभमेळे भरतात. प्रयागमधील कुंभपर्वात मकरसंक्रांत, अमावस्या व वसंतपंचमी ही तीन उपपर्वे आहेत. त्यापैकी अमावस्या हे प्रमुख पर्व असून त्याला ‘पूर्ण कुंभ’ असे म्हणतात. गुरुला राशीचक्र भोगण्यास बारा वर्ष लागत असल्याने दर बारा वर्षांनी कुंभयोग येतो. समुद्रमंथनात सर्वप्रथम निर्माण झालेले विष श्रीशिवाने प्राशन केले. अमृतप्राप्तीसाठी चाललेला वाद मिटावा व दुष्टप्रवृत्ती असलेल्या असुरांना अमृत मिळू नये म्हणून श्रीविष्णुने मोहिनीचे रूप घेऊन असुरांना मोहित करून सूरा पाजली व देवांना अमृत दिले. समुद्रमंथनातून भगवान् ‘धन्वंतरी’ अमृतकलश घेऊन अश्‍विन वद्य त्रयोदशीला प्रकट झाले. त्याची स्मृती म्हणून धनत्रयोदशी संपन्न केली जाते. धन्वंतरी वैद्य व डॉक्टरांचे आराध्य दैवत असल्याने त्या क्षेत्रातील लोक हा उत्सव भव्यतेने संपन्न करतात.

नरकचतुर्दशी | Narak chaturdashi in marathi

नरकचतुर्दशी:- प्राचीन काळी ‘प्राग ज्योतिषपूर’ (आसाम किंवा भूतानच्या पलिकडील पर्वतराई) येथे ‘नरकासुर’ ऊर्फ ‘भौमासुराचे’ राज्य होते. या क्रूर असुराने सोळा हजार शंभर मुलींवर अत्याचार करून त्यांना काळकोठडीत डांबून ठेवले. श्रीकृष्णाला या मुलींनी पत्र पाठवून ‘आम्हाला या नरकयातनेतून मुक्त करा’ अशी विनंती केली तेव्हा श्रीकृष्णाने सत्यभामेबरोबर जाऊन नरकासुराचा आश्‍विन व.॥14॥ ला पहाटे वध केला व सर्व मुलींना मुक्त करून पंडित व समाजाच्या इच्छेने त्या मुलींबरोबर एका मंडपात विवाह करून त्यांना सन्मानित जीवन जगण्याचा अधिकार दिला. विजयी श्रीकृष्णाचे स्वागत सर्व द्वारकावासीयांनी दीपमाळा लावून केले. त्याची स्मृती म्हणून हा दिवस संपन्न केला जातो. मरताना नरकासुराने श्रीकृष्णाला ‘या दिवशी जो माणूस सूर्योदयापूर्वी स्नान करील त्याला नरकवास होऊ नये’ हा वर मागितला म्हणून या दिवशी सूर्योदयापूर्वी नरकासुराचे प्रतीक म्हणून ‘कारिटाचे फळ’ पायाखाली घेऊन अभ्यंग स्नान करून शेणामातीचा नरकासूर करून त्याच्यावर केरकचरा टाकतात.

लक्ष्मीपूजन | Laxmi Pooja in marathi

(4)लक्ष्मीपूजन:- अमावस्येच्या अंधारात संपत्तीच्या ऐश्‍वर्याची पूजा करण्याचा सल्ला भारतीय संस्कृतिने आम्हाला दिला आहे. लक्ष्मीप्राप्तीने उन्मत्त झाले तर माणसाचा अध:पात होतो तर नम्र झाल्यावर विकास होतो हा व्यावहारिक सिद्धांत लक्ष्मीपूजनात आहे. अमावस्या हा दिवस अशुभ व वर्ज्यदिन म्हणून जरी असला तरीही भारतीय संस्कृतितील बरेच सण अमावस्येला साजरे केले जातात.

1.पिठोरी अमावस्या (श्रावण अमावस्या, पोळा सण)

2.दीपावली अमावस्या (अश्‍विन अमावस्या)

3.सोमवती अमावस्या (सोमवारी येणारी)

4.सर्वपित्री अमावस्या (भाद्रपद अमावस्या).

प्रतिपदेपासून सुरू होणार्‍या चंद्राच्या पंधरा कलांपैकी शेवटची कला (दिवस) म्हणजे अमावस्या होय. या दिवशी चंद्र व सूर्य एका नक्षत्रात येऊन त्यांची युती होते. या युतीक्षणात चंद्र व सूर्य यांचे उदयास्त साधारणपणे एकाच वेळी असतात. यावेळी चंद्राचा पृथ्वीकडील भाग अप्रकाशित असल्याने चंद्र दिसत नाही. चंद्राचा भाग प्रकाशाच्या संपर्कात येईपर्यंत अमावस्येचा कालावधी मानला जातो. प्रल्हादाचा मुलगा ‘बळी’ हा दानशूर व सुस्वभावी होता परंतु शुक्राचार्यांवर अंधश्रद्धा असल्यामुळे त्यांचे ऐकून काही चुकीचे निर्णय घेत असे. त्याने बंदिखान्यात लक्ष्मी, कुबेर व काही देवांना डांबून ठेवले तेव्हा श्रीविष्णुने कश्यप व अदिती यांचे उदरी ‘वामना’ च्या रूपात जन्म घेऊन बळीच्या यज्ञामध्ये जाऊन तीन पावले जमीन दान मागितली. संकल्प सोडणार्‍या बळीच्या झारीत शुक्राचार्याने आपला डोळा आडवा घातल्यावर पाणी येण्यासाठी बळीने दर्भाची काडी घातली तेव्हा शुक्राचार्याचा डोळा फुटला व ते बाहेर आले व बळीवर संतापू लागले तेव्हा बळीला शुक्राचार्यांची दया आली. त्याची त्यांच्यावरची अंधश्रद्धा डळमळीत झाली. ‘विश्‍वनियंता भगवान् जर माझ्या दारात येऊन मला भिक्षा मागत असेल तर मी ती का देऊ नये ?’ असा प्रश्‍न शुक्राचार्यांना विचारून बळीने संकल्प सोडला. भगवान् वामनाने विशालरूप धारण करून एका पायामध्ये धरती, दुसर्‍यात ब्रह्मांड व तिसरा पाय त्याचे मस्तकावर ठेऊन त्याला पाताळात घातले व त्याच्या बंदिखान्यातील लक्ष्मी-कुबेर यांना मुक्त केले. हा सण त्याची स्मृती म्हणून संपन्न केला जातो तसेच स्वच्छता करून आरोग्य देणार्‍या ‘केरसुणी’ ची पूजा करण्याचा सल्ला पूर्वजांनी दिला आहे. या दिवशी सोन्या-चांदीचे अलंकार, पैसे, लक्ष्मी, कुबेर यांची प्रतिमा यांची भर तिन्हीसांजा वा त्यानंतर येणार्‍या मुहूर्तावर पूजा करावी. लक्ष्मी पूजन कसे करावे

कार्तिक

पौर्णिमेच्या मागे-पुढे कृतिका नक्षत्र येते म्हणून कार्तिक (उपनावे- उर्ज, बाहुल, कार्तिकी) हे नाव. या महिन्यात काकड आरती, चातुर्मास सांगता, पंढरपूर-आळंदी वारी, दिवाळी पाडवा, भाऊबीज, वैकुंठ चतुर्दशी, तुलसीविवाह, काळभैरव जयंती व कार्तिकस्नान समाप्तीनिमित्त काल्याचे कीर्तन हे सण येतात.

बलिप्रतिपदा | Balipratipada in Marathi

(5) बलिप्रतिपदा:- भगवान् वामनाने बळीच्या दातृत्वाने प्रसन्न होऊन कार्तिक शु. प्रतिपदेला लोक तुझी पूजा करतील असा आशीर्वाद दिला, श्रीरामाला या शुभमुहूर्तावर राज्याभिषेक झाला, ‘गोवर्धन पर्वत’ धारणानंतर सात दिवसाने म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदेला इंद्र श्रीकृष्णास शरण आला. पार्वतीने शंकरास द्यूतात हरविले (म्हणून पाडव्याला द्यूत प्रतिपदा असे म्हणतात.), उज्जैनचा राजा ‘विक्रमादित्य’ याने ‘विक्रमसंवत्सरा’ चा प्रारंभ केला. साडेतीन मुहूर्तातील शुभमुहूर्त, अमृतसरची स्थापना झाली, व्यापारीवर्गाचा वर्षाचा प्रारंभ, पत्नीने पतीला ओवाळावे व पतीने काहीतरी सप्रेम भेट द्यावे. बळीला पाताळात घालून देवांची मुक्तता करणार्‍या भगवान् वामनाच्या पराक्रमाचा स्मृतिदिन म्हणून कार्तिक शुद्ध प्रतिपदेला महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी गोवर्धनपूजा व अन्नकोट केला जातो तर राजस्थानात या दिवशी लंकादहनाचा देखावा उभा करून शोभेची दारू उडवितात. ते पाडव्याला खेंखटा म्हणतात. दक्षिण भारतात पाडव्याच्या दिवशी रेड्यांच्या टकरी लावून गाई-बैलांची मिरवणूक काढून बळी व त्याची पत्नी विंध्यावली यांचीही पूजा करतात.

भाऊबीज | Bhaubeej In Marathi

भाऊबीज:- कार्तिक शुद्ध द्वितीयेच्या दिवशी ‘यम’ आपली बहीण ‘यमी’ हिच्या घरी जेवावयास आला तेव्हा यमीने त्याला स्नान घालून ओवाळले व जेवू घातले. त्याची स्मृती म्हणून आजही प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जातो. बहिण त्याला ओवाळते व जेवू घालते. भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला शक्तिनुसार काहीतरी वस्तू सप्रेम भेट देतो. ‘भाऊबीजेला ओवाळून घेऊन एखादी भेटवस्तू दिली म्हणजे आपले काम संपले’ ही वृत्ती न धरता बहीण ही आपल्या घरातील एक अविभाज्य घटक आहे याची जाणीव ठेऊन तिच्या सुख-दु:खात सदैव सहभागी होण्याची बिनशर्त तयारी ठेऊन भावाने अखंड मदत केली पाहिजे. ही बहिणीला सर्वश्रेष्ठ भाऊबीज ठरेल. असा हा दिवाळीचा सण संपन्न करतात.

One thought on “दिवाळी ची संपूर्ण माहिती शास्त्र आधारे | Diwali in Marathi

  1. तुम्ही दिलेली माहिती खूपचं छान आहे. बराच अभ्यास केला असेल यात शंका नाही. धन्यवाद

    श्री कृष्णाने द्वादशी या तिथीला गोवर्धन उचलला, त्या नंतर सात दिवस म्हणजे तृतीया तिथी. पण तुम्ही प्रतिपदा सांगितले आहे ते कसे, हे कृपया समजवावे..

    धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *