हरितालिका महत्व काय आहे? | Hartalika Puja in Marathi 2021.

प्रेम ही पूजा, आराधना, परमेश्‍वराचे रूप व जीवनाचे परमपद आहे. प्रेमात त्याग असतो, देणे असते, समर्पण व स्वत:च्या अस्तित्वाला विसरण्याचा सद्भाव असतो. प्रेमाचा प्रारंभ द्वैतात होत असला तरी परिणती अद्वैतात होते. प्रेम ज्याच्यावर केले जाते त्याच्यात एकरूप होण्याची संकल्पना असते. प्रेमात मरणे वा मारणे या हिंसकवृत्तीला स्थान नसते तर ते अहिंसा, आनंद, शांती, मीलन व समर्पण या मार्गाने जाते. विश्‍वातला कोणताही प्रेमी, प्रेम करताना इतरांनी केलेली बळजबरी खपवून घेत नाही. प्रेम आत्म्यातून, मनातून, बुद्धितून जन्म घेते आणि देहभाव विसरून ज्याच्यावर ते केले जाते त्याच्यात एकरूप होते. प्रेम वरच्या देखाव्यावर केले जात नसून आत्म्याच्या सौंदर्यावर केले जाते. भारतवर्षात अनेक लोकांनी एकमेकांवर प्रेम केले व ते करताना लोक काय म्हणतील याची चिंता केली नाही. नल-दमयंती, सत्यवान-सावित्री, दुष्यंत-शकुंतला, कृष्ण-रूख्मिणी व अर्जुन-सुभद्रा ही याची बोलकी उदाहरणे आहेत.

hartalika 2021

हरितालिका हा सण नसून ‘व्रत’ आहे. | Hartalika Vrat ani Khata kay ahe

पार्वती पूर्वजन्मात दक्षाची कन्या व शंकराची पत्नी ‘सती’ होती. पित्याने श्रीशंकराची निंदा केली म्हणून सतीने प्राणत्याग केला व शिवप्रेमासाठी हिमालय-मेनका यांच्या उदरी जन्म घेतला. श्रीविष्णूने नारदाद्वारे हिमालयाकडे पार्वतीची पत्नी म्हणून मागणी केली. पार्वतीच्या माता-पित्याने त्याला सहमती दर्शविली परंतु पार्वतीचे प्रेम श्रीशिवशंकरावर होते. ‘जर आपला विवाह शंकराबरोबर होत नसेल तर जगण्यात काहीही अर्थ नाही’ असा तिने निर्धार केला परंतु तिच्या सखीने तिला एकांतात जाऊन शिवाची आराधना करण्याचा सल्ला दिला. पार्वती सखीबरोबर एका गुहेत गेली. श्रीशिवाची वाळूची पिंडी तयार करून शिवप्राप्तीसाठी आराधना सुरू केली. आराधना करणार्‍या पार्वतीला एके दिवशी श्रीशंकराने ‘मी तुझ्याशी विवाह करणार आहे’ असे स्वप्नात येऊन सांगितले. पार्वतीला परमानंद झाला. ती नदीवर स्नानास गेली. तिथे तिला एक मगर एका लहान मुलाला गिळत असल्याचे दिसलेे. मुलाचे रडणे ऐकून पार्वती दु:खी झाली. ‘तू मला भक्षण कर परंतु या निरागस मुलाला जीवदान दे’ असे तिने विनविले तेव्हा मगर म्हणाला, ‘माझ्याजवळ आलेल्या प्राण्याचे भक्षण करणे हा माझा हक्क आहे. तुला या मुलाची दया येत असेल तर तू आजपर्यंत केलेल्या तपाचे सर्व पुण्य मला दे.’पार्वती संभ्रमात पडली. ज्याच्यासाठी एवढी कठोर तपश्‍चर्या केली त्या शिवाची प्राप्ती काही वेळात होणार होती. जर तपश्‍[चर्येचे सर्व पुण्य मगराला अर्पण केले तर प्रभूची प्राप्ती होणार नाही व जर सर्व पुण्य या मगराला दिले नाही तर एका निष्पाप मुलाचा अंत होईल. स्वभावाने प्रेमळ व दयाळू असलेल्या पार्वतीने पुन: तपश्‍चर्या करण्याचा निर्धार करून केलेल्या तपश्‍चर्येचे सर्व पुण्य मुलाचे प्राण वाचविण्यासाठी मगराला दिले. तोच तिच्यासमोर श्रीशिवशंकर प्रगट झाले. हा चमत्कार पाहून पार्वती आनंदी झाली. तो दिवस ‘भाद्रपद शुद्ध तृतीयेचा’ होता. श्रीशिव म्हणाले,‘हे पार्वती ! जो भक्त सर्वांना दु:खमुक्त करण्यासाठी आपले सर्वस्व समर्पण करतो व सर्व चराचरांत माझ्या स्वरूपाचे दर्शन करतो तो भक्त मला प्रिय आहे. आज पत्नी व सद्भक्त म्हणून तू माझ्या परीक्षेत पास झालीस म्हणून मी तुझ्याशी विवाह करत आहे.’ माता-पित्याच्या सहमतीने पार्वतीचा विवाह शिवाशी झाला. या घटनाक्रमात पार्वतीला मैत्रिणीचे अनमोल सहकार्य झाले म्हणून हरितालिकेच्या दिवशी शिवपार्वती व पार्वतीची सखी यांची पूजा करतात. ‘हरितालिका’ या शब्दात हरित= हरण करणे व आलिका= मैत्रीण, सखी. मैत्रिणीचे हरण करणे= हरितालिका होय. उत्तम पतिप्राप्ती व प्राप्तपतिच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया वयाच्या पाचव्या वर्षापासून हे व्रत करतात. 

हरितालिका पूजन कशे करावे | hartalika puja vidhi

‘आहारविहारात आरोग्यासाठी शिस्त आणणे याला व्रत वा व्रतस्थ राहणे असे म्हणतात. या दिवशी उपवास करून एका पाटावर शिव-पार्वती व सखी यांच्या वाळूच्या प्रतिमा काढून, पांढर्‍या रंगाची व तांबड्या काठाची साडी परीधान करून बेल, पुष्प व पत्री वाहून पूजा करावी. मक्याचे कणीस, मुळा, काकडी व डाळिंब इ. वस्तू अर्पण कराव्यात. भाद्रपद शुद्ध तृतीयेला हस्तनक्षत्र व सोमवार असेल तर उमामहेश्‍वराची रात्री स्थापना करून पूजा करावी तसेच तीळ व तूप यांची अग्निकुंडात आहुती देऊन महिलांना हळदी-कुंकवाला बोलावून त्यांची ओटी भरावी. रात्री ॐ नम: शिवाय मंत्र जपावा भजन व जागरण करावे. दुसर्‍या दिवशी सकाळी शिव-पार्वतीला तांदूळ व मूग यांच्या खिचडीचा नैवेद्य दाखवून सोबत पूजेतील मक्याचे कणीस खाऊन उपवास सोडावा. दुसर्‍या दिवशी पाटावरील पूजा व सर्व साहित्य नदीमध्ये विसर्जित करावे. या दिवशी बंगालप्रांतात त्रिवेणी नदीकिनारी वराहतीर्थात ‘वराहजयंती’ संपन्न करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *