कर्षति आकर्षति इति कृष्ण: । ‘जो सर्वांचे आकर्षण करतो तो कृष्ण.’
(1) अमेरिकेतील काही लोकांनी स्वामी विवेकानंदांना विचारले,‘अनेक बायकांना भुलवून हजारो स्त्रीयांशी लग्न करणार्या श्रीकृष्णास परमेश्वर मानून त्याच्या दर्शनासाठी तुम्ही भारतीय लोक घरदार सोडून का पळता ?’
हा प्रश्न विचारला तेव्हा स्वामीजी एका सभागृहात प्रवचन देत होते. आपले भाषण सोडून स्वामीजी सभागृहाच्या बाहेर आले व रस्त्याने पळत निघाले. सभागृहातील श्रोतेही त्यांच्या मागे पळू लागले. स्वामीजी एका चौकात थांबले. लोकही थांबले. थांबलेल्या लोकांना स्वामीजींनी प्रतिप्रश्न विचारला,‘हे प्रिय श्रोत्यांनो ! आपण रस्त्याने पळू लागलो तर लोक काय म्हणतील ? याचा विचार न करता आपण सर्वजण माझ्यामागे पळत आलात असे काय आहे माझ्यात ? म्हणून तुम्ही माझ्यावर एवढे प्रेम करता?’ तेव्हा श्रोते म्हणाले,‘हे वीरवर ! आमच्या आत्म्याचे उत्थापन करण्याचे सामर्थ्य आपल्या वाणीत आहे. त्या दिव्यवाणीच्या लोभाने आम्ही आपल्यावर प्रेम करतो. ते श्रवण करण्यासाठी आम्ही आपल्या मागे पळत आलो आहोत.’ स्वामीजी आनंदाने सिंहगर्जना करून म्हणाले,‘हेच सामर्थ्य होते आमच्या श्रीकृष्णात ! कौरव-पांडवांच्या घनघोर युद्धासाठी कुरुक्षेत्रावर जमलेल्या अठरा अक्षौहिनी अर्थात 51 लाख सैन्याच्या कोलाहलात आप्तेष्टांच्या मोहाने रडणार्या अर्जुनाचे निमित्त करून सांगितलेल्या 700 लोकांची 18 अध्यायाची गीता वाचा म्हणजे तुम्हाला कळेल की त्या श्रीकृष्णाच्या मागे लोक का पळतात? त्यांच्या दिव्यवाणीचा मोह विश्वातल्या प्रत्येक व्यक्तिला का झाला ? सर्व वेद-उपनिषदांचा सार सांगणार्या भगवद्गीतेने जातीधर्मांचा भेद न करता जन्मलेल्या प्रत्येक माणसास परमेश्वराच्या सर्वोच्च पदावर आरूढ होण्याची पात्रता प्राप्त व्हावी म्हणून प्रयास केले. गीतेला कोणताच भेद मान्य नाही. ती म्हणते- स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रा स्तेऽपि यान्ति परांगतिम् ॥32॥ (गी.अ.9) या विश्वात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तिला परमपदाला जाण्याचा अधिकार आहे. गीता जिव्हाळासंपन्न होण्याचा सल्ला देते. अद्वेष्टा सर्व भुतांनाम् ॥13॥ (गी.अ.12) कोणाचा द्वेष करू नका कारण द्वेषाने कधीच कोणाची प्रगती होत नाही. या दिव्यवाणीचा मोह अनेक विद्वान लोकांना झाला म्हणून तर शेकडो प्रकाशकांनी गीतेचे भाषांतर आपापल्या भाषेत करून तिचे पठण करून आत्मसात केले.
काही अर्धवट लोक अनेक बायकांचा दादला म्हणून श्रीकृष्णाची टीका करतात. |Shri krishna katha in marathi
- परंतु भगवान् श्रीकृष्ण जर व्याभिचारी असते तर त्यांचे वर्णन त्या काळात सर्व श्रेष्ठत्व प्राप्त झालेल्या श्रीव्यासांनी केलेच नसते.
2. श्रीव्यासपुत्र त्यागमूर्ती शुकदेवांनी तर परिक्षितीला सांगितलेल्या भागवतात संपूर्ण दहावा स्कंद प्रभू श्रीकृष्णलीलांच्या वर्णनासाठी खर्च केला आहे. श्रीकृष्ण व्याभिचारी असते तर त्या त्यागमूर्तीने एकही शब्द श्रीकृष्णवर्णनासाठी उच्चारला नसता तर
3. श्रीकृष्णाचा आत्येभाऊ, मेहूणा व त्या काळातला सर्वश्रेष्ठ नरवीर व योद्धा अर्जुन त्यांच्या आज्ञेत वागला नसता.
4. ज्या कर्णाने उपकाराने दबून जाऊन मरेपर्यंत नालायक दुर्योधनास साथ दिली तो अंगराज कर्ण, सूर्यपुत्र कर्ण, महावीर कर्ण कुरुक्षेत्रावर मरणासन्न वेदना भोगताना म्हणाला होता,‘हे कृष्ण प्रभो ! हे शरीर अपवित्र आहे. याने धर्माला विरोध करून अधर्माला साथ दिली त्यामुळे माझी फक्त शेवटची एकच इच्छा आहे की मी मेल्यानंतर माझ्या या मृत शरीराला आपल्याशिवाय कोणीही हात लावू नये. याला चितेवर ठेऊन आपण अग्नी द्यावा कारण आपल्याएवढे पवित्र व शुद्ध आचरण असलेला दुसरा कोणीही महापुरुष या धरतीवर नाही.
5. पांडवांचा निर्वंश करण्याची प्रतिज्ञा करून पांडवांचा निर्वंश करणार्या अश्वत्थाम्याच्या अमोघ शस्त्राने जेव्हा अभिमन्युची पत्नी ‘उत्तरा’ हिचा गर्भ निर्जीव झाला तेव्हा भगवान् श्रीकृष्ण त्या मृत बालकाजवळ जाऊन म्हणाले होते,‘हे मृत्यू देवा ! मी जर शुद्ध आचरणाचा असेल, माझी वाणी जर फक्त सत्य बोलली असेल, मी जर आयुष्यभर सत्याला, धर्माला व न्यायपक्षाला साथ दिली असेल तर या मुलाला तू प्राणदान दे’ आणि आश्चर्य म्हणजे हजारो लोकांच्या देखत ते मुल जिवंत झाले. परब्रह्माने रक्षण केले म्हणून त्या मुलाचे नाव ‘परिक्षिती’ ठेवण्यात आले. तो परिक्षिती पांडवाच्या स्वर्गारोहणानंतर हस्तिनापूरचा राजा व भागवताचा आदर्श श्रोता झाला.
6. भगवान् श्रीकृष्ण जर व्यभिचारी असते तर त्या काळातील महान पतिव्रता स्त्रीया त्यांच्या भक्तीत रमल्या नसत्या. त्यांनी भगवान् श्रीकृष्णास आपल्या संकटात हाक मारली नसती. ‘शीलवान व्यक्तिलाच शीलरक्षणासाठी बोलविले जाते.’ धृतराष्ट्राच्या दरबारात आपले कोणीही रक्षण करू शकत नाही हे लक्षात आल्यावर द्रौपदीने प्रभू श्रीकृष्णास हाक मारली आणि श्रीकृष्णांनी सर्वांदेखत द्रौपदीला वस्त्रे पुरवून तिच्या शीलाचे रक्षण केले.
7. महाभारतकाळातील सर्वात करारी व बुद्धिमान स्त्रि ‘कुंती’ एकदा भगवान् श्रीकृष्णास म्हणाली होती- ‘मला अखंड दु:ख द्या म्हणजे तुमचे सतत स्मरण होईल.’
8. श्रीकृष्णाला जन्मल्यापासून शेवटपर्यंत पाहणारे सर्व लोक त्यांना ‘भगवान्’ मानत होते. 8.गोकुळातील प्रत्येक नागरिक बुद्धिमान होता. आपल्या बायका एका परपुरुषाच्या मागे पळतात आणि ते गप्प बसतात असे होईल का ?
9. भगवान् श्रीकृष्णाला गोकुळातून मथुरेकडे घेऊन जाण्यास अक्रुर जेव्हा निघतो तेव्हा सर्व गोकुळातील स्त्रि-पुरुष रथासमोर आडवे पडून रडतात तर गोकुळातील प्रत्येक तरुण भगवान् श्रीकृष्णाबरोबर कंसाला मारण्यासाठी मथुरेत जातो.
10. इंद्रप्रस्थनगरीत पांडवांनी केलेल्या राजसूययज्ञामध्ये अग्रपूजा कोणाची करावयाची ? हे युधिष्ठिराने जेव्हा भिष्माचार्यांना विचारले तेव्हा त्यांनी भगवान् श्रीकृष्णाच्या चरणाला स्पर्श करून उद्घोषणा केली होती. ‘या सभेत श्रीव्यासांसारखे ऋषी, द्रोणाचार्यांसारखे आचार्य, अनेक राजे, संत व महंत जरी असले तरी त्या सर्वांची श्रद्धा भगवान् श्रीकृष्णावर असल्यामुळे श्रीकृष्णाची अग्रपूजा होणेच इष्ट आहे’ असे सर्वानुमते ठरले व सर्वांनी भीष्माचार्यांच्या उद्घोषणेला सर्वांनी एकमुखाने सहमती दिली.
11. गेली हजारो वर्षे या दिव्य महात्म्याचा भारतीय समाजावर प्रभाव आहे. या सर्व घटनाक्रमातून प्रभू श्रीकृष्णाच्या चारित्र्यावर शंका घेणार्यांनी काहीतरी समज घ्यावी एवढेच आम्ही सांगू. त्या भगवान् श्रीकृष्णाच्या चरित्राचे चिंतन गोकुळाष्टमीच्या निमित्ताने सर्वांनी करावे ही सर्वांची गरज आहे