शक्तिपात योग रहस्य | Shaktipat yoga Rahasya

शक्तिपातयोगरहस्य( Shaktipat yoga Rahasya ) व श्रीसमर्थ रामदासस्वामींचा स्वरुप संप्रदाय


लेख क्र. 1

श्रीसमर्थांच्या कुंडलिनी जगदंबेच्या आरतीने सुरुवात करुयात.

सौम्यशब्दे ऊर्ध्वोंकार वाचें उच्चारा ।
भक्तिभावें विनवी शांतें चाल मंदिरा ॥धृ॥
नवखणांचा पलंग शांते शोभतो बरा ।
सुमनांचे शयनी शांते शयन करा ॥1॥
अष्टही भोग भोगुनि शांता पहुडली शेजे ।
भक्तजनांची आज्ञा जाहली आतां चलावे सहजे ॥2॥
मानस सुखी दशमस्थाने शांते निद्रा हो केली ।
रामदास म्हणे शांता ध्यानीं राहिली ॥3॥

आता विषयाला सुरुवात करु. सद्गुरुंच्या ओंकार उच्चाराने शिष्याला कशा पद्धतीने शक्तिसंचार होतो हे आपणास सोलीव सुखात वाचायला मिळते. शिष्याचा विशुद्ध शरणागतभाव, नित्य साधना, कर्मे करताना समचित्त अभ्यासाने आलेली सम दर्शिता वा कर्मसाम्य दशा यामुळे सद्गुरु शिष्यावर कृपा करतात. अध्यात्मिक प्रसाद देतात. सद्गुरु शिष्याला शिवत्वाचे दान देतात आणि शिष्यही श्रीगुरुंना आपल्या जीवत्वाचे दान देतो. असे उभयविध दान घडून आल्यामुळे कृपेचा आविष्कार होतो. या कृपेमुळे शिष्याची कुंडलिनी शक्ति जागृत होते. जी मूलाधारात वेटोळे घालून बसलेली आहे. नव चक्रांची संभावना प्रकट करुन जीवाला शिवत्वाचे ऐक्य करवून देते. ही आई विश्‍वाचे बीज आहे. साधकाची माऊली आहे.

तें कुंडलिनी जगदंबा ।

जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा ।

जया विश्‍वबीजाचिया कोंभा ।

साउली केली ॥ज्ञाने.6.272॥

आदिशक्ती कुंडलिनी जगदंबा ही चैतन्याचे चक्रवर्ती सम्राट असलेल्या शिवाची शोभा आहे. अर्थात ती चंद्र आणि त्याचे चांदणे किंवा प्रभा ही ज्याप्रमाणे एकरुप असतात त्याप्रमाणे शिवाशी एकरुप आहे. या शक्तीनेच विश्‍वबीजाच्या कोंभाला म्हणजेच जीवाला सावली केली आहे. अर्थात ही शक्तीच जीवरुप असून ती सद्गुरुकृपेने जागृत झाल्यावर शिवरुप होते. असे माऊली ज्ञानेश्‍वर महाराज म्हणत आहेत.

जे शून्यलिंगाची पिंडी ।

जे परमात्मया शिवाची करंडी ।

जे प्रणवाची उघडी ।

जन्मभूमी ॥ज्ञाने.6.273॥

ही कुंडलिनी शक्ति निराकार परमात्म्याची साकार मूर्तीच आहे. ती परब्रह्मरुपी शिवाचे अखंड निवासाचे स्थान (करंडी) आहे अर्थात शिव आणि शक्ती हे दोघे अखंड सामरस्याने विराजमान झालेले असतात. ही शक्ती ॐ काराची जन्मभूमी आहे म्हणजे ॐ काराच्या साडेतीन मात्रांपैकी अ काररुपी सत्त्वात्मक इच्छाशक्तिरुप ब्रह्मा, उ काररुपी रजात्मक क्रियाशक्तिरुप विष्णु आणि म काररुपी तमात्मक ज्ञानशक्तिरुप शिव असून या दृष्टीनेच ही शक्ती जीव, जगत् आणि ईश्‍वराची निर्मिती, पालन व संहार करणारी आहे. ही शक्ती ॐ काराच्या अर्धमात्रारुपाने नाद, बिंदू व कलारुप असून तीच श्रीगुरुकृपेने जागृत झाल्यावर आपल्या या अर्धमात्रात्मक स्वरुपाला भेदून साधकाला पलीकडे अर्थात अमात्रक स्वरुपाला नेणारी अशा साधनरुप म्हणजे श्रीगुरुरुपच आहे. वरील वर्णनात शक्ती ही नाद, बिंदू व कलारुप आहे असे वर्णन केले आहे. आणि सद्गुरु याच्या पलिकडे आहेत असे म्हटले आहे. श्रीगुरुगीतेमध्ये वर्णन आलेले आहे-

चैतन्यं शाश्‍वतं शान्तं व्योमातीतं निरंजनम् ।
नादबिंदुकलातीतं तस्मै श्रीगुरवे नमः ॥70॥


जो चैतन्यस्वरूप, शाश्‍वत, शांत, आकाशादिपेक्षा सूक्ष्म, निरंजन, नादातीत, बिंदुतीत, कलातीत आहे अशा श्रीगुरुला नमस्कार असो. ॥70॥
नाद, बिंदू व कला याबाबत थोडे जाणून घेऊ. पाचरात्र आगम शास्त्रात परमव्योम पद मोक्षपदवी साठी योजले आहे. पाशुमत मतात सांजन व निरंजन दशा सांगितलेली आहे. शिवभावयुक्त जीवच निरंजन आहे. शिव व शक्तिसाठी नाद व बिंदू शब्द वापरला आहे. भगवंताच्या सकल सगुण रुपाच्या 38 किंवा 5 कला असतात. निवृत्ति, प्रतिष्ठा, विद्या, शांति व शांत्यतीता नावाच्या 5 कलांमधून परत 38 कलांचा विकास झाला आहे. शिवाच्या ईशान, तत्पुरुष, अघोर, वामदेव व सद्योजात मुखाच्या तारा, सुतारा इ. 38 कलांचा परिचय स्वच्छंदतंत्र (1.53-59), मृत्यूंजयभट्टारक (नेत्रतंत्र 22.26-34) इ. तून मिळतो. साधकाच्या शरीरात या कलांच्या न्यासाचे प्रकार सिद्धांतसारावलित सांगितले आहेत.

क्रमश:..

लेखन/संशोधन- दामोदर प्र. रामदासी, पुणे.
(योद्धा संन्यासी-स्वामी विवेकानंद या एकपात्री नाटकाचे राष्ट्रीय नाटककार, व्याख्याते, प्रवचनकार व लेखक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *