अर्जुन व श्रीकृष्ण यांचे अद्वितीय प्रेम | Krishna with arjun

पांडव, अर्जुन व श्रीकृष्ण यांचे अद्वितीय प्रेम जगप्रसिद्ध आहे. 1.माणसाच्या जीवनात माणसाने एकदा तरी अर्जुन व्हावे म्हणजे त्याला गीताश्रवणाबरोबर श्रीकृष्णदर्शन होईल. एकदा अर्जुन द्वारकेत आला व प्रवासाने थकून झोपला. प्रभू श्रीकृष्ण त्याचे पाय चेपू लागल्यावर रूख्मिणीला आश्‍चर्य वाटले. अर्जुन हा श्रीकृष्णापेक्षा वयाने लहान होता. तो त्यांचा मेव्हणा, सखा, शिष्य, भक्त व आत्येभाऊ होता. श्रीकृष्णाने रूख्मिणीच्या मनातील शंका ओळखली व त्यांनी ‘अर्जुनाच्या शरीराला कान लाव’ असे रूख्मिणीला सांगितले तेव्हा अर्जुनाच्या रोमरोमातून ‘श्रीकृष्ण’ हा शब्द ऐकू आला. 

दुर्योधन व अर्जुन श्रीकृष्णाला आमंत्रण देण्यासाठी गेले.

कौरव-पांडवांच्या कुरुक्षेत्रावरच्या युद्धापूर्वी दुर्योधन व अर्जुन श्रीकृष्णाला आमंत्रण देण्यासाठी गेले. अर्जुन श्रीकृष्णाच्या चरणाजवळ तर दुर्योधन उशाजवळ बसला. प्रभू श्रीकृष्ण झोपेतून जागे झाल्यावर त्यांनी अर्जुनाला प्रथम पाहून येण्याचे कारण विचारले व युद्धाला आमंत्रण देण्यासाठी आलेल्या अर्जुनाला सांगितले,‘युद्ध न करणारा मी व युद्ध करणारी माझी नारायणी सेना या दोहोंपैकी तुला जे हवे ते माग’ तेव्हा अर्जुनाने ‘मला सेना नको आपण हवे आहात’ असे स्पष्ट सांगितले. यातून त्याची कृष्णभक्ती जाणवते. 

अर्जुनाची प्रत्येक इच्छा श्रीकृष्णाने पूर्ण केली

अर्जुनाची प्रत्येक इच्छा श्रीकृष्णाने पूर्ण केली. बागेत बसलेल्या अर्जुनाला एकदा  द्रौपदीची आठवण झाली तेव्हा श्रीकृष्ण द्रौपदीचे रूप घेऊन अर्जुनाजवळ आले व त्याच्या हातातील अंगठी आपल्या हातात घातली. लांबून युधिष्ठिर येत असलेला पाहून श्रीकृष्णरूपी द्रौपदी अदृश्य झाली. घरी गेल्यावर आपल्या हातातील मुद्रिका द्रौपदीच्या हातात नसून श्रीकृष्णाच्या हातात आहे हे पाहून प्रभू श्रीकृष्ण आपल्यासाठी द्रौपदी झाले हे अर्जुनाच्या लक्षात आले.

मारूती व अर्जुन यांचे मनोमीलन | hanuman and arjun

अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर मारुतीला स्थानापन्न करून मारूती व अर्जुन यांचे मनोमीलन करणारे भगवान् श्रीकृष्ण हे ‘नारायण’ व अर्जुन ‘नराचे’ अवतार होते म्हणून गीतेने स्पष्ट उल्लेख केला आहे- यत्र योगेश्‍वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: । तत्र श्रीर् विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर् मतिर् मम॥78॥ (गीता अ.18)

जयद्रथाचा वध | jarasandha cha vadh

5.दु:षलेचा पती, दुर्योधनाचा मेव्हणा, धृतराष्ट्राचा जावई व वृद्धक्षत्राचा मुलगा सिंधुनरेश जयद्रथाने मरण्यापूर्वी अभिमन्युला लाथ मारली असे अर्जुनाला कळाले तेव्हा ‘उद्या सूर्यास्तापूर्वी मी जयद्रथाचा वध करील अन्यथा स्वत: आत्मदहन करील’ अशी त्याने प्रतिज्ञा केली. जयद्रथाचा जन्म झाल्यावर ‘या मुलाचे शीर एक नरवीर उडविल’ अशी आकाशवाणी झाली तेव्हा वृद्धक्षत्राने ‘जो याचे शीर जमिनीवर पाडील त्याच्या डोक्याचे एक हजार तुकडे होतील’ असा शाप दिला होता. दुसर्‍या दिवशी भगवान् श्रीकृष्णाने सूर्यास्तापूर्वी सूर्यास्त झाल्याचा भास निर्माण केला व ‘जयद्रथाचे शीर त्याच्या वडिलांच्या मांडीवर जाऊन पडेल असे शरसंधान कर’ असे अर्जुनास सांगितले. अर्जुनाच्या प्रेमापोटी सूर्याची गती थांबवणार्‍या भगवान् श्रीकृष्णाची आज्ञा अर्जुनाने ऐकली व जयद्रथाचे शीर त्याच्या पित्याच्या मांडीवर पडेल असे शरसंधान केले. जयद्रथाचे वडील संध्या करत होते. जप आटोपून ते उभे राहिले आणि त्यांच्या मांडीवरून जयद्रथाचे शीर जमिनीवर पडल्यामुळे त्यांच्या डोक्याचे शंभर तुकडे झाले. पिता-पुत्राचा अंत एकाच वेळी झाला. पित्याचे वरदान पित्यालाच महाग पडले. नियतीचा विजय झाला. मृत्युने बुद्धिवर, विजय मिळवून ‘काळासमोर माणूस दुर्बळ आहे’ हे सिद्ध करून दिले. 

सुभद्रेने अर्जुनाला पळविले | subhadra arjun vivah

आपली बहीण अर्जुनाला द्यावी ही भगवान् श्रीकृष्णाची इच्छा. सुभद्रेचा विवाह बलरामाने दुर्योधनाशी ठरवला हे प्रभू श्रीकृष्णास आवडले नाही. त्रिदंडी संन्यास घेतलेल्या व रैवतक पर्वतावर आलेल्या अर्जुनाला त्यांनी बलरामाद्वारे द्वारकेत आणले व अर्जुनाला ‘तू सुभद्रेला पळवून घेऊन जा’ असा सल्ला दिला तसेच सुभद्रेला ‘तू अर्जुनाबरोबर पळून जा’ असे सांगून त्यांनी तिला देवदर्शनासाठी मंदिराकडे पाठविले व  बजाविले,‘जेव्हा अर्जुन रथ घेऊन येईल तेव्हा अर्जुनाच्या हातातून घोड्याचे पाश तू घे व अर्जुनाला मागे बसवून रथाचे सारथ्य तू कर.’ सुभद्रेने कृष्णाने सांगितल्याप्रमाणे केले त्यामुळे सुभद्रेबरोबर गेलेल्या दासदासींनी बलरामाला येऊन सांगितले,‘सुभद्रेने अर्जुनाला पळविले’ त्यामुळे बलरामाला अर्जुनाबद्दल कोणताही गैरसमज झाला नाही व त्याने या दोघांचा विवाह सन्मानाने लावून दिला. श्रीकृष्णाचे बोट कापले तेव्हा द्रौपदीने भरजरी शालू फाडून ती चिंधी कृष्णाच्या जखमेला बांधली त्याची परतफेड त्यांनी दु:शासन जेव्हा तिचे वस्त्रहरण करू लागला तेव्हा वस्त्र पुरवून केली. 

अर्जुन व श्रीकृष्ण यांनी जरासंधाचा वध केला | jarasandha ka vadh

कुंती आपल्या मुलांना ‘श्रीकृष्णाला विचारल्याशिवाय काहीही करू नका’ असा नेहमी सल्ला देत असे. अश्‍वमेध यज्ञ करण्यापूर्वी जरासंधाला मारणे अत्यावश्यक असल्यामुळे भगवान् श्रीकृष्णअर्जुन व भीम ब्राह्मणाचे रूप घेऊन जरासंधाच्या गिरीव्राजक नगरीमध्ये गेले. भीम व जरासंध यांचे द्वंद्व युद्ध चालू असताना भीमाला भगवान् श्रीकृष्णाने ‘एक काडी घेऊन उभी फाडून दोन दिशेला फेकून दिली’ भीमाने तसे केले परंतु जरासंधाचे दोन छकले परत एकत्र झाले तेव्हा श्रीकृष्णाने परत काडी दुभंग केली व विरूद्ध दिशेला दोन तुकडे फेकून दिले. भीमाने जरासंधाचे शरीर फाडले व विरूद्ध दिशेने फेकून दिल्यावर तो गत:प्राण झाला. 

भीमचे धृतराष्ट्राला आलिंगन

कुरुक्षेत्रावरच्या युद्धानंतर पांडव धृतराष्ट्राला भेटून सांत्वन करण्यासाठी राजप्रासादात गेले. धृतराष्ट्राला आलिंगन देण्यासाठी भीम पुढे आला तेव्हा श्रीकृष्णाने थांबण्याचा इशारा करून भीमाचा एक लोखंडी पुतळा अंध धृतराष्टाच्या बाहूपाशात दिला. आपल्या मुलाला मारले याचा धृतराष्ट्राला एवढा संताप होता की त्याने आपल्या बाहूपाशात आलेल्या लोखंडाच्या पुतळ्याला इतके जोरात दाबले की तो पुतळा चपटा झाला. हे दृश्य पाहून पांडव अवाक् झाले व त्यांनी भगवान् श्रीकृष्णाच्या चरणी वंदन केले. 

सत्यभामेने प्रभू श्रीकृष्णाला दान दिले | satyabhama

तेरा वर्षांचा वनवास भोगत असताना दुर्योधनाने पांडवांकडे दुर्वास ऋषिंना पाठविले. दुर्वासांनी ‘मला भुक लागली आहे, काहीतरी जेवावयास वाढा’ असे युधिष्ठिरास सांगितले. द्रौपदीने श्रीकृष्णाचा धावा केला. प्रभू श्रीकृष्ण आले व त्यांनी द्रौपदीच्या ‘अक्षय पात्रा’ ला चिकटलेले भाजीचे पान खाल्ले त्यामुळे दुर्वासांना आपणहून तृप्ती मिळाली. अशा अनेक युक्त्या करून श्रीकृष्णाने पांडवांना वेळोवेळी संकटातून वाचविले. गोकुळातील रासक्रिडा, स्वर्गातून आणलेला पारिजातक वृक्ष अशा अनेक लिला करणार्‍या श्रीकृष्णाला एकदा रूख्मिणीने विचारले, ‘भगवन् ! मी आपल्याला कशी आवडते?’ तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले,‘तू मला मीठासारखी आवडतेस.’ प्रभू श्रीकृष्ण जीवनामध्ये निरागस, संगीतमय, सुरेल व विनोदी जगले. त्यांच्या शब्दांची उंची रूख्मिणीला समजली नाही. दुसर्‍या दिवशी श्रीकृष्णाने आचार्‍याला मीठ न टाकता स्वयंपाक करावयास सांगितला. जेवावयास बसलेले सगळेजण मीठाची मागणी करू लागल्यावर रूख्मिणीला ‘मीठाशिवाय जेवण जसे व्यर्थ तसे आपल्याशिवाय प्रभूला आपले जीवन व्यर्थ वाटते’ याची जाणीव झाली. ‘या जन्मात आवडणारी वस्तू पुढच्या जन्मातही मिळावी यासाठी काय कारावे ?’ असा प्रश्‍न सत्यभामेने नारदांना विचारल्यावर,‘ती वस्तू दान करावी’ असे नारदांनी सांगितले. सत्यभामेने प्रभू श्रीकृष्णाला दान दिले तेव्हा संपूर्ण द्वारकेत एकच कोलाहल माजला. ‘श्रीकृष्ण फक्त सत्यभामेचे नाहीत तर ते आमचेही आहेत’ असे म्हणत सर्व श्रीकृष्णपत्न्या एकत्र झाल्या. ‘कृष्णाच्या वजनाइतके सोने मला द्या, मी तुमचा श्रीकृष्ण तुम्हाला परत देतो’ असे नारदाने सांगताच एका पारड्यात श्रीकृष्णाला बसवून दुसर्‍या पारड्यात महिलांनी सुवर्णालंकार टाकले तरीही कृष्णाची पारडे हलेना. ही वार्ता रूख्मिणीला कळाली. माता रूख्मिणी श्रद्धेने आल्या. एका तुलसीपत्रावर ‘श्रीकृष्ण’ हा शब्द लिहिला व ते तुलसीपत्र दुसर्‍या पारड्यात टाकताक्षणी श्रीकृष्णाचे पारडे वर गेले. उन्मत्त दुर्योधनाच्या श्रीमंती स्वागताचा त्याग करून सात्त्विक विदूराच्या घरी जाऊन त्याच्या विदेही पत्नीच्या हातून केळांची साले आनंदाने भक्षण करणारा श्रीकृष्ण भक्तिप्रेमाने प्रसन्न होतो. हे समजून घेण्यासाठी श्रावण वद्य ॥1॥ ते ॥8॥ असा कृष्णजन्माष्टमीचा उत्सव करून कृष्णलीला श्रवण करावी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *