शक्तिपातयोग – लेख क्र. 3
शक्तिपात शब्दाचा अर्थ भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनावर, वसिष्ठांनी श्रीरामांवर, श्रीरामांनी समर्थांवर शक्तिपात केला असे आपण वाचतो. श्रेष्ठ अशी शक्ती ज्या अधिकारी शिष्यावर पाडली जाते त्यास शक्तिपात म्हणतात. शक्ती याचा अर्थ केवळ अद्वैत चिती म्हणजे चैतन्य असा जर आपण घेतला तर ते शिष्याचे मूळ रुप आहे शिवाय ते अमर्याद असल्यामुळे त्याचा पात म्हणजे खाली पडणे हे कसे शक्य आहे ? हा प्रश्न उपस्थित राहतो. पात याचा अर्थ पडणे वा पाडणे असा येथे होत नाही. श्रीविद्यारण्यस्वामींनी पात या शब्दाचे रहस्य सांगितले आहे. पराशक्ती परमेश्वरी आहे आणि ती आपलेच स्वरुप आहे. ती सर्वव्यापक आहे. जसे आपणच आपल्या खांद्यावर बसु शकत नाही तसे आपणच आपल्यावर पडु शकत नाही. म्हणून पात याचा अर्थ पडणे असा न घेता आच्छादित असा धरला पाहिजे. शिष्याच्या अंतर्गत चैतन्याला कामक्रोधादि मलांनी, पापपुण्यात्मक कर्मांनी अनादिकालापासून आच्छादित केलेले आहे. म्हणून ती शक्ती भस्माने आवृत्त अग्निप्रमाणे असून नसल्यासारखी झाली आहे. सद्गुरुंनी दीक्षा दिल्यावरच शक्तिवरचे आच्छादित मल आणि पापपुण्यादि कर्मे ही नष्ट झाली होतात आणि ती शक्ती भस्मविरहित अग्नीप्रमाणे प्रगट झाली म्हणजे शक्तिपात झाला असा व्यावहारिक अर्थ होतो. अग्नी जसा अरणीत आधीपासूनच आहे तो फक्त अभिव्यक्त झाला असे शक्तीपातासंबंधी समजावे.
शक्तीवर असलेले अज्ञानमूलक आवरण यांचा नाश झाला आणि शिष्याचे खरे शिवस्वरुप सद्गुरुंनी प्रगट केले असे म्हटले पाहिजे. मग यात उपदेशाचा भाग तर दिसत नाही. मग उपदेशाशिवाय केवळ शक्तीपाताद्वारा मी तेच ब्रह्म आहे असे भान शिष्याला कसे बरे येते ? तर त्याचे उत्तर असे की शक्तीपाताद्वारा मी तेच तत्त्व आहे हे ज्ञान होण्याला जे प्रतिबंध आहेत ते त्यांनी दूर केले. वेदांतशास्त्राला योगशास्त्राची जोड येथे दिली आहे. शिष्याच्या विवेकज्ञानाला आच्छादित करणारी मोहरुप जी माया ती अभिव्यक्त झालेल्या पराशक्तीच्या प्रसादाने किंचीत दूर होते व देह पडतो. म्हणजे मायासंबंधामुळे कर्तृत्व भोक्तृत्वादिसंबंध जो आलेला असतो, पापपुण्यात्मक कर्मे घडलेली असतात ती शक्तीपातामुळे ढिले पडतात. देहबुद्धी ढिली पडल्यामुळे देहाचाही पात होतो. शक्तीपाताचे कार्य देहाभिमान ढिला होणे, शरीर कंप सुटणे, परमानंद होणे अष्टसात्त्विक भाव उमटणे हे आहेत. शिष्याचा देह जमिनीवर पडला तर तो प्रभूप्रसाद समजावा.
शक्तीपात होत असतो तो देण्याघेण्याचा विषय नाही.
साधकाने सद्गुरुशरणभाव ठेवून
- 1.निष्काम कर्मानुष्ठान
- 2.शमदमादि अंतरंग साधना व
- 3.श्रवण-मनन-निदिध्यासन करत राहावे.
यामुळेही तोच परिणाम घडतो. शक्तीपात महत्त्वाचा जरी असला तरी तो झालाच पाहिजे असे नाही. हा साधनेमुळे निर्माण झालेल्या विशुद्ध कर्मफळाचा परिणाम आहे. योगायोगाने तसे सद्गुरु एखाद्या जन्मात भेटतात. त्यांचे आपले अनेक जन्मांचे पूर्वऋणानुबंध असतात. त्यांच्या सान्निध्यात शक्तीपात होतो. तो काही गुरुवारी-पौर्णिमेलाच वाटला जाणारा प्रसाद नाही. आजकाल गादीपरंपेने किंवा स्वयंभू अनेक गुरु समाजात दिसून येतात. लोकांना सामुहिक वा वैयक्तिक दीक्षा देतात. मुळात शक्तीपात होण्याचा विषय असल्यामुळे पात्र गुरुद्वारा पात्र शिष्यावर तो होतोच. शक्तीपात देण्याचा दावा करणारे गुरु फार झाले आहेत. शिष्य संख्या वाढवणे, इतर गुरुंशी स्पर्धा आणि गुरुबाजी करणे हा व्यवसाय झालेला असल्यामुळे शरणागत साधकाने सावध होऊनच राहावे. उगाच कोणी प्रसिद्ध आहे म्हणून दीक्षा मागत फिरु नये. जर तेच आपले पात्र दीक्षा गुरु असतील आणि आपणही पात्र असु तर आपोआपच होईल. अन्यथा असे साधक कुपात्र गुरुच्या मागे वेळ वाया घालवतात. आपले व्यक्तिगत अनुष्ठान, तप सोडून देतात आणि आपल्यावर कृपा झाली अशा भ्रमात राहतात. क्रियांच्या नावाखाली काही मानसिक भ्रम बाळगून जगत राहतात. बर्याचदा यात चारचौघात दिखावा आणि प्रभाव टाकण्याचा भाग जास्त असु शकतो. जो भेटेल त्याची पात्रता न बघता त्याला स्वत:चे आध्यात्मिक अनुभव सांगत फिरतात. आता ते मानसिक भ्रमही असु शकतात हे यांना कोण सांगणार ?
श्रीलोकनाथतीर्थ महाराज म्हणत असत की “दीक्षा लेने देने की चीज नही है । ये होने पाने की चीज है !” पूर्व जन्मीच्या साधकाला या जन्मात साधनेला लावून देणे आणि जीवशिवाचे ऐक्य करुन देणे असे दोन प्रकारात शक्तीपात होतो. दुसरा प्रकार तर हजारात एखाद्या साधकालाच मिळतो. कुंडलिनी जागी झाल्यानंतर जेव्हा शेवटी समाधीचा प्रसंग येतो तेव्हा श्रीगुरु शिष्याला कृतार्थ करतात. काही गुरुंचे सामर्थ्य तेवढे नसतेही मग ते एखाद्याची कुंडलिनी थोडी जागी करुन सोडून देतात. त्याची भावधाराच नष्ट करतात. पुढे त्याची गती काय होईल याची चिंता त्यांना असते का ? स्वामी विवेकानंद साधक दशेत असताना त्यांना नुकतीच कुठे ध्यानाची गहन स्थिती लागत होती. अशा वेळी शक्ती खरेच गोळा झाली आहे का हे बघण्यासाठी त्यांनी शेजारी असलेल्या आपल्या गुरुबंधुला हात लावला. त्या क्षणी त्या गुरुबंधुची सगळी भावस्थितीच नष्ट झाली. अनेक देवतांच्या मूर्तींची पुजा करणार्या त्याने ते सगळे देव गोळा करुन गंगेत विसर्जित करण्यासाठी चालला. ठाकूर रामकृष्ण परमहंसांच्या हे लक्षात आल्यावर ते नरेंद्राला रागावले, “आत्ताच कुठे गोळा व्हायला लागले तर खर्चायलाही लागलास ? आणि कालीचा भाव नष्ट करण्याचा तुला अधिकार दिला कोणी ?” या प्रसंगातून आपण हेच शिकावे की दीक्षेच्या नावाखाली कोणी आपल्याशी खेळ तर खेळत नाहीये ? याबाबत सावध असावे. काही कथित गुरु अर्धवट शक्तिजागरणाचे खेळ खेळून दुकानदारी वाढवतात. पूर्णत्व प्राप्त झालेले सद्गुरु भेटणे आणि त्यांनी आपल्यावर कृपा करणे हे आपल्या अनेक जन्मांच्या तपाचेच फळ आहे आणि वेळ आल्यावर हा शक्तीपात त्यांच्याद्वारा आपोआप होतो. आणि ती वेळही सद्गुरुच ठरवतात.
लेखन/संशोधन- दामोदर प्र. रामदासी, पुणे.
(योद्धा संन्यासी-स्वामी विवेकानंद या एकपात्री नाटकाचे राष्ट्रीय नाटककार, व्याख्याते,
प्रवचनकार व लेखक)