सौंदर्यलहरी
कृष्णभक्त राधेच्या रुपात, रामभक्त सीतेच्या रुपात, शैव उमेच्या आणि शाक्त दुर्गा-कालीच्या रुपात शक्ति उपासना करतात. आद्य शंकराचार्यांनी सौंदर्य लहरीमध्ये उमा पार्वतीची प्रार्थना करुन सनातन धर्माच्या अतिरहस्यमय गूढ शक्ती उपासनेच्या साधनाक्रमाची विशद व्याख्या केलेली आहे. जी श्रीविद्या उपासना म्हणून प्रचलित आहे. जी तंत्राची आधारभूत पद्धती आहे. जी योग्यांमध्ये श्री रुपा कुंडलिनी शक्तिला जागवण्यासाठी गुरुपरंपरेद्वारे गुरुंच्या शक्तिपात दीक्षाद्वारा प्राप्त होते. जी वैदिक काळापासून चालू आहे. तैत्तरीय आरण्यकातील एका आख्यायिकेत पृश्नी ऋषींनी श्रीचक्राच्या अर्चनेद्वारे कुंडलिनी शक्तीचा मूलाधारपासून सहस्रारात उत्थान करून योगसिद्धी प्राप्त केली होती.
आद्य शंकराचार्यांना गुरुपरंपरेद्वारे ही दीक्षा प्राप्त झाली होती. आजेगुरु श्रीगौडपादाचार्यांचा सुभगोदय (सुभगेचा उदय अर्थात कुंडलिनी शक्ती जागरण) हा ग्रंथ श्रीविद्येवर आधारीत आहे. कुंडलिनी जागृती होईस्तोवर बहिर्पूजा आणि ती जागृत झाल्यावर अंत:साधना सुरु होते. या नियमानुसार कर्मकांडयुक्त ही बहिर्पूजा श्रीचक्रावर केली जाते. आचार्यांच्या मठातून आजही शक्ति उपासना प्रचलित आहे. कांची मठात श्रीचक्राची तांत्रिक उपासना समयाचार पद्धतीनुसार होते. सौंदर्यलहरीच्या 11 व्या श्लोकात श्रीचक्राचे वर्णन आहे. अंत:उपासनेत शरीराच्या आत श्रीचक्राची भावना केली जाते. अंतर्भावनायुक्त बाह्यपूजेद्वारे शक्ती जागरणात सहाय्यता मिळते. या पूजेचे कर्मकांडरुपी स्थूल अंग तर शक्तीजागरणानंतर षट्चक्र वेध क्रियांमध्ये धारणा-ध्यान- समाधी असा योग साधला जातो. स्थूलातून सूक्ष्म आणि सूक्ष्मातून कारण देहापर्यंत पोहोचता येते.
या सौंदर्यलहरीत असे म्हटले आहे की, ज्यावेळी कुंडलिनी शक्ती जागृत होऊन सुषुप्नेच्या मार्गातील सहाही चक्रांचा भेद करीत करीत शिवसायुज्यपदावर आरूढ होण्यासाठी मार्गस्थ होते त्यावेळी तो प्रतिप्रसवक्रमाने (एकेका तत्त्वाचे त्याच्या उपादानात लय होत जाणे.) सर्व इंद्रियांना अंतर्मुख करते. तिची गती ऊर्ध्व झाली की ती मनाचे सर्व पडदे फाडून टाकते. बुद्धीच्या जगतासंबंधीच्या बाह्य चिंतनाला ती विश्रांती देते. तिच्या वाटचालीमुळे अंतरात्म्यरुपी सूर्याला झाकून टाकणारे ढग एक एक या क्रमाने आपोआप विलीन होऊ लागतात. हृदयाकाश स्वच्छ आणि निर्मळ होते. ज्ञानाचा प्रकाश अंतरात्म्यामध्ये पूर्ण तेजाने भरून जाऊन चमकू लागतो. अविद्येचा दाट अंधार दूर होतो. या अंधारात वास करणारी वासनेची घुबडे यांना राहायला स्थान शिल्लक राहत नाही. इतकेच नव्हे तर बसल्या बसल्याच ज्ञानरुपी सूर्याच्या तेजाने ते नाहीसे होऊन जातात. या अर्थानेच भगवान शंकराचार्य म्हणतात की भगवती कुंडलिनी अविद्या अंधकार नाहीसा करण्यासाठी ज्ञानरुपी सूर्याला उद्दीपित करते. याचा दुसरा अर्थ असा आहे की अधोमुखी सूर्यशक्ती जागृत होऊन उन्मुख झाल्यावर ती सूर्यमंडलात अमृताचा स्राव करु लागते. याचा परिणाम म्हणून बहिर्विषयांकडे धावणार्या वासना आपोआप शांत होतात. याचे फळ असे मिळते की, कर्मानुष्ठांमध्ये निमग्न असलेल्या व अविद्येच्या अंधकारामध्ये बुडून गेलेल्या कर्मकांडी लोकांना बाह्यानुष्ठाचा तिरस्कार वाटू लागून ते अंतर्यागामध्ये निमग्न होतात. भगवती आईच्या चिन्मयी वाटिकेतील पुष्पातून प्रवाहीत झालेल्या मधुर मकरंदाच्या स्रोतांचे झरे जड लोकांच्या जडतेला सुद्धा द्रविभूत करण्यास समर्थ असतात. भगवतीची चिन्मयी सत्ता नाना प्रकारच्या भेदरुपी सृष्टीची स्थूल आणि सूक्ष्म जगताच्या रुपाने कल्पना करुन उभारणी करते आणि संहारणीच्या वेळी सर्व नामरुपांना आपल्यात विलीन करुन शिवाच्या निष्कल रुपाला सायुज्यतेचे आलिंगन देऊन स्वत: शिवस्वरुप होऊन जाते. जीवाचे जडत्व पाणी होऊन वाहून जाते आणि जीव चैतन्य गंगेमध्ये आनंदाने स्नान करु लागतो.
लेखन/संशोधन- दामोदर प्र. रामदासी, पुणे.
(योद्धा संन्यासी-स्वामी विवेकानंद या एकपात्री नाटकाचे राष्ट्रीय नाटककार, व्याख्याते, प्रवचनकार व लेखक)
रामदासी मठ- नवगण राजुरी, जि. बीड (योगीराज सद्गुरु श्रीकल्याणस्वामी शिष्य सद्गुरु दाजीमहाराज परंपरा)