कोजागरी पौर्णिमा ला लक्ष्मी वैकुंठातून धरतीवर येते. ज्या घरात भक्ती, दिव्यांचा प्रकाश व सुसंवाद असतो, माणसे जागी असतात, घराचे दार उघडे असते त्या घरात लक्ष्मी जाते. को-जागरी= कोण जागे आहे? हा प्रश्न ती विचारते व जे जागे आहेत त्यांच्या घरी कायम राहाते म्हणून कोजागरी पौर्णिमेला रात्रभर जागर करतात.
धार्मिक ग्रंथामध्ये वर्णीत एका श्लोकानुसार –
निशीथे वरदा लक्ष्मी: को जागर्तिति भाषिणी।
जगाति भ्रमते तस्यां लोकचेष्टावलोकिनी।।
तस्मै वित्तं प्रयच्छामि यो जागर्ति महीतले।।
चंद्र व पृथ्वी सर्वांत जवळ येण्याचा दिवस म्हणजे कोजागरी पौर्णिमा होय. या पौर्णिमेला कौमुदी वा शरद पौर्णिमा असे म्हणतात. अश्विन शुद्ध त्रयोदशी ते पौर्णिमा असा तीन दिवस उपवास करून श्रीविष्णुव्रत करून त्याची कमळांनी पूजा करतात. चांदण्यात नौकाविहार, फुगड्या, लंगडी, हुतुतू, गाणे, संगीतमैफली आयोजित करून आटविलेले व चंद्रबिंब पडलेले गाईचे दूध सेवन करतात. या दिवशी ऐरावतावर आरूढ झालेला इंद्र, महालक्ष्मी व चंद्र यांची पूजा करतात. तिन्हीसांजा कणकीच्या 5 दिव्यांनी आई मोठ्या मुलास ओवाळते.
श्रीकृष्ण वृंदावनात कोजागरी पौर्णिमा ला रासक्रीडा खेळली
श्रीकृष्णाने वृंदावनात या दिवशी रासक्रीडा खेळली होती. प्रत्येक गोपिकेला हवेहवेसे वाटणारे श्रीकृष्ण अनेक रूपे घेऊन प्रत्येक गोपिकेबरोबर नृत्य करत होते. गोपिका कृष्णमय झाल्या होत्या. हा समारंभ पाहण्यासाठी सर्व देव वृंदावनात येऊन ब्रह्मानंद लुटत होते. गोकुळातल्या गाई अत्यंत आनंदी झाल्या. त्यांच्या स्तनातून दूधांच्या धारा वाहू लागल्या. गोपांनी ते दूध कलशात धरले व त्याच्यात अमृताचा वर्षाव करणार्या चंद्राचे प्रतिबिंब पडले. कृष्णभक्तिने संपन्न असलेले ते दूध चंद्रबिंबाच्या स्पर्शाने अमृतमय झाले. रासक्रीडेचा तो महाप्रसाद सर्वांनी सेवन केला. तो दिवस कोजागरी पौर्णिमेचा होता. ती परंपरा भारतीयांनी अत्यंत श्रद्धेने जोपासली आहे.
नक्षत्राणामहं शशी ॥21॥ (गी.अ.10) नक्षत्रात मी चंद्र आहे. पुष्णामि चौषधी: सर्वा: सोमो भूत्वा रसात्मका: ॥13॥ (गी.अ.15) मी चंद्र होऊन औषधींचे पोषण करतो असे श्रीकृष्ण गीतेत म्हणाले.
या दिवशी रायगडावर दूध विकण्यासाठी आलेल्या हिरकणी या गौळणीला गडावरचे रखवालदार सूर्यास्तानंतर दरवाजे बंद झाल्यामुळे घरी जाऊ देईनात. लहान बाळाच्या आठवणीने ती अवघड कड्यावरून उतरली. पुत्रप्रेमासाठीचे हे धाडस पाहून श्रीशिवरायांनी तिचा साडीचोळी देऊन सत्कार केला. त्या कड्याला हिरकणी कडा हे नाव दिले.