शक्तिपात योग रहस्य लेख क्र. 2
मूलपद्मे कुंडलिनी यावन्निद्रायिता प्रभो ।
तावत् किंचिन्न सिद्ध्येत मंत्रयंत्रार्चनादिकम् ॥
॥ गौतमी तंत्र॥
गौतमी तंत्रात (32-3-4) असे म्हटले आहे की, जोपर्यंत कुंडलिनी मूलाधारात निद्रिस्त असते तोपर्यंत साधकाने कितीही जप, तप, ध्यान, पाठ, पूजा, मंत्र, यंत्र अशी काहीही साधना केली तरी सिद्धी म्हणजे ज्ञान प्राप्त होत नाही. पण जर पुष्कळ पुण्यसंचयामुळे सद्गुरुप्राप्ति झाली व त्यांनी शक्तिपात केला तर साधकाच्या सर्व उपासना सिद्धीला जातात. सर्व योगांचा आणि तंत्रांचा आधार कुंडलिनी शक्ति आहे.
रुद्रयामलात म्हटलंय- जन्ममृत्युच्या रहाटगाडग्यात फिरणार्या साधकांचा कोणत्या पद्धतीने उद्धार करावा वत्यांना सामरस्याची म्हणजेच मुक्तिची प्राप्ति कशी करुन द्यावी यासाठी उत्तम वेळेची प्रतिक्षा कुंडलिनी करत राहते. ही नित्यतरुण शक्ति वेदादि शास्त्रांची म्हणजेच सारस्वताची (वाङ्गमय) बीजभूत असलेली अशी आदिकारणभूत शक्ती असून बीजाक्षरांची जननी आहे. योगी आपल्या चित्तात या महान शक्तिच्या जागृतीचा बोध प्राप्त करुन देतात. ही महाशक्ती नेहमीच सत्य भाषणाकडे प्रवृत्त करणारी आहे. ही महादेवी स्वत: आदिनाथांची पत्नी आहे. हे माते ! हे धात्री ! हे दाई ! हे आई !! संसारबंधनात अडकलेला मी एक दीनातिदीन पशू म्हणजे जीव असून तू माझे रक्षण कर आणि मी तुझा अत्यंत प्रिय होईल अशी माझ्यावर कृपा कर.
ही श्रीकुलकुंडलिनी महाशक्तीची कांती रक्ताप्रमाणे लाल, चंद्राप्रमाणे शीतल आहे. या शक्तीचे शरीर म्हणजे मातृका किंवा वर्णसमुहयुक्त आहे. आकृती सर्पाप्रमाणे असून ती सर्पाप्रमाणेच निद्रिस्त आहे. हे भगवती देवी ! तू जागेपणी कृर्मदृष्टीने पाहा. निर्मळ अशा कोट्यावधी चंद्राच्या किरणांप्रमाणे उज्ज्वल कांती असलेल्या श्रीकुंडलिनी माते ! मांसाच्या उग्र गंधाने व इतर शारिरीक दुर्गंधीने दूषित झालेले हे माझे शरीर वेदादि कार्याला अनुकूल आणि योग्य असे कर.
सिद्धींची इच्छा असणारा, स्वदोष माहित असलेला, शरीरातील स्थलांचे म्हणजे चक्र व ग्रंथींचे स्थान ज्ञान असणारा साधक या भूतलावर श्रीकुंडलिनी विद्या संपादन करुन विजयी होऊ शकतो. शिवाय मायेच्या फसव्या मार्गापासून सुटका करुन घेत कुंडश्रलिनी विद्येच्या बळावर सर्व व्यवहार करीत कुलमार्गासारख्या अनभिज्ञ मार्गाचा आश्रय करुन मुक्तीच्या नगरात पोहोचतो. याप्रकारे जो साधक दररोज प्राप्त:काळी व मध्यान्हकाळी या श्रीकुलकुंडलिनीच्या जपरुप चरणांचा अर्थात अनाहतनादरुपी मूर्धन्य साधनाचा नियमाने म्हणजे दीर्घकाल, निरंतर व श्रद्धा-भक्ति-सत्कार-भावपूर्वक आश्रय घेईल तो सिद्ध होईल.
ही महाशक्ति आकाशरुप म्हणजे शब्दतत्त्वस्वरुप आणि वायूरुप म्हणजे स्पर्शतत्त्वरूप अर्थात अनुभूति स्वरुप असलेल्या चार पाकळ्यांच्या कमळात म्हणजे मूलाधारचक्रात राहून देहाचा व्यवहार चालविते. तिचेच ध्यान योगी नेहमी करत असतात. ही शक्ती संसारी काामनांचा समूळ नाश करणारी व इच्छित फले देणारी आहे. ही अविनाशी असून ॐ कार स्वरुप, सर्पाकार व साडेतीन वेढे घालून असलेली आहे. साधक ही आपली आई आहे अशी भावना करतात आणि ही महाशक्ति, मायाशक्ति, क्रियाशक्ती आहे हे लक्षात घेऊन तिला शरण जातात. त्यामुळे सिद्धांचे समुदाय त्यांची स्तुती करतात.
साधना करताना ती तीव्रातितीव्र स्वरुपात जागृत होऊन शिवस्वरुप व्हावी म्हणून तिचा मोठा आदर करुन तिच्याविषयी चिंतन इत्यादी करतो. ती शरीरातील वातादि सर्व दोषांना निवृत्त करणारी आणि घोर अज्ञानाचा पडदा फाडून वर जाणारी, ब्रह्मा-शिवालाही मोहित करणारी अशी आहे. संसारी सुखाच्या सर्व कल्पनांना छिन्नभिन्न करणारी योगिनी आहे. ती ब्रह्मा, विष्णु आणि रुद्र या ग्रंथींचा भेद करणारी आहे. ती स्वत:च बलसंपन्न असल्याने स्वत:च सरपटणारी आहे. अतिशय सूक्ष्म अशी ही शक्ती वाणी, मन यांना न दिसणारी व त्यांच्या आटोक्यात न येणारी अशी आहे. सहज ब्रह्मज्ञान करुन देणारी अशी ही कुंडलिनी स्वत:च्याच शक्तीने उत्पन्न व स्थित केलेल्या पिंडब्रह्मांडादि समस्त त्रैलोक्याला नष्ट करणारी म्हणजे आभास, कल्पना किंवा विवर्तरुपाने उत्पन्न झालेल्या जगदाभासाला मावळून टाकणारी आहे.
वलयरुप, परमेश्वराच्या आवडीच्या अशा श्रीकुलकुंडलिनीला मी वंदन करतो. मनोरुप आकाशात म्हणजे सहस्रारात विजेसारखी चपल असणारी, तळपणारी ती तरुण बलवती आपल्या बळाच्या जोरावर विश्वाला आत्मसात करणारी कलारहित म्हणजे अंशहीन आहे. ती वेढा घातलेली म्हणजे संसारान्मुख आहे अर्थात ॐ काराच्या अ-उ-म या तीन मात्रा व चंद्रबिंदूची अर्धी मात्रा मिळून साडेतीन मात्रांनी युक्त अशी चक्राकार गती किंवा रुप धारण करुन मूलाधारात सुप्तवत पडून राहिलेली आहे. ही महाशक्ती दिव्य प्रकाशाने युक्त किंवा महाप्रकाशमान असून वेदवदना म्हणजे ज्ञानमुखी किंवा जिच्यापासून पर-अपर विद्यांचे म्हणजेच भौतिक व पारमार्थिक विद्यांचे ज्ञान होते अशी आहे. शिवस्वरुप प्राप्तिच्या दृष्टिने ती साधनरुप असल्यामुळे तीच देहाला प्रथम आपल्या अग्निस्वरुपाला किंवा सूर्यरुपाने तप्त करणारी व मागाहून आपल्या चंद्रस्वरुपाने किंवा अमृतस्रावाने शांत करणारी आहे. आपल्या अभिष्ट गोष्टी साधण्यासाठी तिची मी अत्यंत श्रेष्ठ म्हणून संभावना करतो.
लेखन/संशोधन- दामोदर प्र. रामदासी, पुणे.
(योद्धा संन्यासी-स्वामी विवेकानंद या एकपात्री नाटकाचे राष्ट्रीय नाटककार, व्याख्याते, प्रवचनकार व लेखक)