गोकुळाष्टमी | Gokulashtami in marathi

गोकुळाष्टमी ( Gokulashtami ) म्हणजे कृष्णभक्तांना चालून आलेली पर्वणी ! हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या श्रावणात प्रभू श्रीकृष्ण जन्मले. मुखी श्रीकृष्णनाम, हाती श्रीकृष्णकाम, हृदयात श्रीकृष्णप्रेम जर असेल तर त्या श्रीकृष्णभक्तास जिवंतपणी सुख व मेल्यावर श्रीकृष्णधाम निश्‍चित मिळेल. गीतेचा आचार व बासरी होण्याचा विचार जर प्रत्येकाच्या मनात आला तर त्याला श्रीकृष्णदर्शन होण्यास विलंब लागणार नाही. 

गोकुळाष्टमी तारीख | Gokulashtami date 2021

 सोमवार, 30 ऑगस्ट 2021 , शके 1943, विक्रम संवत्सर ,श्रावण मासे, कृष्ण अष्टमी , रोहिणी नक्षत्र.

पाच हजार वर्षांपूर्वी श्रावणमासाची संपन्नता होती परंतु वद्य अष्टमीची काळकभिन्न रात्र होती. कंसाचे राज्य म्हणजे अन्यायाची अष्टमी होती. त्याच्या राज्यात अन्यायाचे ढग, शिक्षेची कडाडणारी वीज, दु:खाचा प्रचंड पाऊस असल्यामुळे सामान्य माणसाला फार त्रास सहन करावा लागत होता आणि त्याचवेळी भक्तिप्रेमाच्या हृदयरूपी कैदखान्यात भगवान् श्रीविष्णूने कृष्णरूपातजन्म घेतला व सर्वांचे दु:ख हरण केले. गोपांचा कुत्न्या, यशोदेचा लल्ला, गोपींचा कान्हा तर विश्‍वरक्षणकर्ता श्रीकृष्ण कधीच स्वैराचारी तरुण व चिंताग्रस्त वृद्ध झाले नाहीत. ते सदैव निरागस बालक होते. त्यांनी नृत्य केले, गायीले, बासरीचे स्वर काढले व विश्‍वप्रसिद्ध गीतेचे तत्वज्ञान विश्‍वाला सांगितले. ते मोकळेपणाने म्हणाले- जन्म कर्म च मे दिव्यम् ॥गीता॥ माझा जन्म व कर्म सारेच अद्भुत आहे. मी सर्वात आहे परंतु कोणातही नाही किंवा कुणाच्या कर्मात वा प्रारब्धात ढवळाढवळ करत नाही तर सर्वांना स्वातंत्र्य देतो. मला हाक मारणार्‍या द्रौपदीसाठी मी वस्त्र घेऊन धावत येतो तर मला न विचारता द्यूत खेळणार्‍या युधिष्ठिराचे दु:ख मी निवारण करण्याच्या भानगडीत पडत नाही कारण ते कर्म त्यांनी केले. त्याचे प्रायश्‍चित त्यांनी भोगले पाहिजे. अनन्यभावाने शरण येणार्‍या भक्ताला मी कधीही उपवासी वा उपेक्षित ठेवत नाही. 

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर् भवति भारत॥7॥ तर परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्॥ धर्म संस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे॥8॥

धर्माला ग्लानी आली, सज्जनांना त्रास होऊ लागला तर मी जन्म घेतो व सज्जनांचे रक्षण करून दुर्जनांचा वध करतो- 

(गी.अ.4) असे ते म्हणाले अर्थात ही त्यांनी स्वत:ची आत्मस्तुती केलेली नाही.

कृष्णप्रभूचा जन्म | Shree krushnacha janma

कृष्णप्रभूचा जन्म मथुरा नगरीत | Shree krishna janma in Mathura Nagari

अशा या कृष्णप्रभूचा जन्म मधुपघ्न, मधुपूरी, मधुरा, मथुरा, मधुवन या नावांनी प्रसिद्ध असलेल्या नगरीत कंसाच्या बंदीगृहात झाला. उत्तानपादाचा पुत्र ‘ध्रुव’ याने याच ‘मधुवनात’ कठोर तपश्‍चर्या करून अढळपद प्राप्त करून घेतले होते. ‘मधु’ नावाच्या राक्षसाने या परिसरात नगर वसवून आपले वास्तव्य केले. त्याचा मुलगा ‘लवणासूर’ याचा प्रभू श्रीरामांचे बंधू शत्रुघ्न यांनी वध करून आपले साम्राज्य स्थापन केले. इ.स. 1017 साली गझनीच्या महंमदाने मथुरेवर अखंड 20 दिवस हल्ला करून नगरी उध्वस्त केली. इ.स.1500 साली सुलतान सिकंदर लोधीने मथुरेचा नाश केला. 17 व्या शतकात औरंगजेबाने मथुरेचा विध्वंस करून मशिद बांधून ठेवली अर्थात् ‘मथुरेचा पेठा’ प्रसिद्ध असलेल्या या नगरीचा विकास श्रीकृष्णकृपेने कधीच थांबला नाही. काळाच्या ओघात सूर्यवंशाची सत्ता गेली व यादव, अंधक, भोज, भौम, कुकर, दाशार्ह आणि वृष्ण या सात चंद्रवंशी कुलांनी या प्रदेशात वसाहती केल्या. ‘उग्रसेन’ हा मथुरेचा राजा होता. उग्रसेन व राणी पद्मावती यांना ‘कंस’ नावाचा अत्यंत क्रूर पुत्र झाला. त्याने आपल्या पित्याला कैदेत टाकून सत्ता बळकावली. भगवान् श्रीकृष्णाचे पिता वसुदेव हे यमुनेच्या उत्तरेकडील गोवर्धन परिसराचे जहागिरदार होते. मथुरमंडळ व शूरसेन देशाचा राजा आणि वसुदेवाचा पिता ‘शूरसेन’ आपली सत्ता गमावून एक सामान्य जहागिरदार म्हणून मथुरेत राहत होते. वसुदेवाचे पिता शूरसेन यांना ‘वसुदेव’ व ‘पृथा’ (पांडवांची माता ‘कुंती’) ही दोन अपत्ये होती. भोजपूरीचा राजा ‘कुंतीभोज’ हा शूरसेनाचा मित्र व आत्येभाऊ होता. त्याला संतान नसल्याने शूरसेनाने आपली मुलगी ‘पृथा’ त्याला दत्तक दिली त्यामुळे पृथेला ‘कुंती’ या नावाने प्रसिद्धी मिळाली. उग्रसेनाचा बंधू देवकीचा पिता ‘देवक’ यांची मुलगी ‘देवकी’  हिचा विवाह वसुदेवाशी झाला. 

कंसास आकाशवाणी झाली

विवाहात वरातीच्या रथाचे सारथ्य कंस करत होता. मिरवणूक चालू असताना ‘हे कंसा ! देवकीचा आठवा मुलगा तुझा वध करेल’ अशी आकाशवाणी झाली.(काहींच्या मते एक ऋषी वरातीला आडवा आला तेव्हा उन्मत्त कंसाने त्या ऋषीला चाबकाचे फटके मारले तेव्हा त्या महात्म्याने ‘ज्या बहिणीच्या वरातीत तू मला चाबकाचे फटके मारलेस त्या बहिणीचा आठवा मुलगा तुझा वध करील’ असा कंसास शाप दिला.) ती आकाशवाणी ऐकून कंस चिडला व तो देवकीचा वध करण्यासाठी धावला तोच वसुदेवाने त्याला थांबवून सांगितले, हे कंसा ! ‘तुझ्या बहिणीला होणारा आठवा मुलगा तुझा वध करणार आहे यात तुझ्या बहिणीचा काय दोष ?’ आणि आता ती माझी पत्नी आहे व तिचे प्राणरक्षण करणे हा माझा धर्म असल्यामुळे आधी मला मार व नंतर तिला मार’ तसेच आम्हा उभयतांना होणारे प्रत्येक मुल मी तुझ्याजवळ आणून देईन. तू त्यांचा वध केलास म्हणजे तुला आमच्या मुलांच्या हातून मृत्यू येण्याचा प्रश्‍नच उद्भवणार नाही’ तेव्हा कंस थांबला. कंसाने देवकी व वसुदेवाला कैदखान्यात टाकले. वसुदेव-देवकीला कीर्तिमान, सुशेन, भद्रसेन, ऋजु, संमर्दन व भद्र ही सहा मुले झाली. या मुलांना कंसाने अत्यंत क्रौर्याने मारले. पुत्रवियोगाने देवकीला वेड लागून आठवा मुलगा होण्यापूर्वीच तिचा मृत्यू व्हावा ही  कंसाची इच्छा होती म्हणून तो तिच्या देखत तिची मुले मारून रक्ताचे डाग भिंतीवर ठेवत असे परंतु वसुदेवासारखा अध्यात्मवादी पती मिळाल्यामुळे त्याच्या उपदेशाने देवकी शांत राहिली व ती भगवान् श्रीकृष्णाला जन्म देऊ शकली. देवकीचा सातवा गर्भ योगशक्तीद्वारा वसुदेवाने गोकुळात राहणारी आपली दुसरी पत्नी ‘रोहिणी’ हिच्या गर्भात ठेवला त्यामुळे तिला ‘बलराम’ झाला. कैदेत असताना रोहिणी वसुदेवास भेटावयास येत असे. तिला  गद, सारण, दुमर्द, विपुल, ध्रुव व कृत ही मुले झाली होती. बलरामाचा जन्म श्रीकृष्णाच्या पूर्वी दोन दिवस श्रावण व.॥6॥ ला दुपारी स्वाती नक्षत्रावर गोकुळात झाला. 

श्रावण वद्य अष्टमीला, रोहिणी नक्षत्र, बुधवार, चंद्र वृषभ राशीला असताना रात्री बारा वाजता भगवान् श्रीकृष्णाचा जन्म झाला.

कृष्ण गेले गोकुळात | Gokulat Shree Krishna

जन्मत:च मोठे होऊन त्यांनी ‘मला गोकुळात नंदाकडे नेऊन घाला’ असे वसुदेवास सांगितले. पूर्वी वसुश्रेष्ठ ‘द्रोण’ पत्नी ‘धरा’ यांनी अनुष्ठान केले. भगवान् श्रीविष्णू प्रसन्न झाले तेव्हा या उभयतांनी ‘आम्हाला आपली सेवा करावयास मिळो’ असा वर मागितला. द्रोण ‘नंद’ घराण्यात जन्मले. मथुरेत वृष्णीवंशात राजा ‘देवमिढजी’ यांना दोन राण्या होत्या. त्यातील क्षेत्रीय कुळातील पत्नीला ‘शूरसेन’ हा मुलगा झाला. कृष्णपिता वसुदेव हे त्यांचे सत्पुत्र तर देवमिढजींची दुसरी पत्नी वैश्य कुलोत्पन्न होती तिला ‘पर्जन्यजी’ हा मुलगा झाला. त्याने यमुनेच्या उत्तरतीरावर वास्तव्य करून गायींचा व्यवसाय सुरू केला. त्यांना उपनंद, अभिनंद, नंद, सनंद व नंदन ही पाच मुले झाली. या मुलातील ‘नंद’ हा बुद्धिमान असल्यामुळे त्यांच्याकडे गोकुळपरिसराचे प्रमुख पद देण्यात आले. नात्याने नंद व वसुदेव हे बंधू होते म्हणून वसुदेवाने आपली पत्नी रोहिणी हिला नंदाकडे ठेवले होते. द्रोणपत्नी ‘धरा’ व्रजमंडळात राहणार्‍या ‘सुमुख’ व ‘पाटला’ यांच्या उदरी ‘यशोदा’ या नावाने जन्मली. यथासमयी यशोदा व नंद यांचा विवाह झाला. भगवान् श्रीविष्णुच्या आज्ञेने योगमायेने यशोदेच्या उदरी जन्म घेतला. वसुदेवाने गोकुळात येऊन भगवान् श्रीकृष्णास नंदाच्या स्वाधीन केले व नंदाला झालेली मुलगी घेऊन ते पुनश्‍च बंदी शाळेत आले. श्रीकृष्णाला घेऊन जाताना यमुनेला महापूर आला होता. श्रीकृष्णाने पदस्पर्श करताक्षणी यमुनेचा पूर ओसरला.

यमुनानदी भाग्यशाली आहे | Yamuna Bhagyashali

यमुनानदी भाग्यशाली आहे. हिमालयाच्या कालिंदनामक उपपर्वतातून तिचा उगम झाला असून तिला ‘कालिंदी’ असेही म्हणतात. हिमालयातील यमुनोत्रीतून उगम पावल्यावर 80 मैलाचा प्रवास करत ती उत्तर प्रदेशातील फैजाबादला मैदानी प्रदेशात येते. हिमालयात तिला टॉस, गिरी व असत या नद्या मिळतात. यमुनेचे पाणी काळ्या रंगाचे आहे. यमुनेची लांबी सुमारे 1000 कि.मी. असून तिच्या जलप्रवाहाचे क्षेत्रफळ दिड लाख चौ.कि.मी. आहे. यमुना ‘प्रयाग क्षेत्री’ गंगेला मिळते. यमुनेकिनारी दिल्ली, मथुरा, गोकुळ ही शहरे आहेत. श्रीकृष्णाच्या बासरीचे स्वर, रासक्रीडा, कालियामर्दन व विटी-दांडूचा खेळ यमुनेने अनुभवले आहे. भगवान् श्रीकृष्ण कित्येक वेळा यमुनानदीत पोहलेले आहेत.

दिव्यकन्या | अष्टभुजादेवी

कृष्णास गोकुळात ठेऊन नंद-यशोदेची मुलगी ते घेऊन आले ती मुलगी रडू लागली. श्रीकृष्णमायेने झोपलेले रक्षक जागे झाले व त्यांनी मुलगी झाल्याची वार्ता कंसाला सांगितली. कंस बंदिखान्यात आला व त्याने त्या मुलीला मारण्यासाठी पकडले तोच ती दिव्यकन्या कंसाच्या हातातून निसटली व अष्टभुजादेवीचे रूप धारण करून म्हणाली,‘हे नराधमा! तुझा वध करणारा या धरतीवर वाढत आहे व लवकरच तो तुझा वध करणार आहे.’ किम् मया ह्रतया मन्द जात: खलु तवान्तकृत् ॥ यत्र क्क वा पूर्व शत्रुर् मा हिंसी: कृपणान् वृथा ॥12॥ (भागवत स्कं.10,अं.4) देवी अदृश्य झाली.

पुतना वध | Putana vadh

प्राणमोहाने कंसाने मथुरेच्या परिसरात जन्मलेल्या प्रत्येक बालकाचा वध करण्यासाठी ‘पुतना’ नावाच्या राक्षसिणीची नियुक्ती केली. पुतना ही पूर्वजन्मातली बळीची कन्या ‘रत्नमाला’ होय. बळीच्या यज्ञात तीन पाऊले जमिनीची भिक्षा मागण्यास आलेल्या श्रीविष्णू अवतार बटू वामनास पाहून या सुंदर मुलाची माता होण्याचे भाग्य आपणास लाभावे असे तिला वाटू लागले परंतु दुसर्‍याच क्षणी वामनाने महाकाय रूप घेऊन बळीला पाताळात नेऊन घातले त्यामुळे रत्नमालेच्या प्रेमभावनेचे रूपांतर द्वेषात झाले व तिने वामनास मारण्याचा निर्धार केला. रत्नमाला ‘पुतना’ हे नाव धारण करून मथुरेत आली. श्रीकृष्ण हा वामनाचा अवतार आहे हे तिला कळाले तेव्हा ती कृष्णाला मारण्यासाठी सुंदर रूप घेऊन गोकुळात आली. पूर्वजन्मातली तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मावशीचे रूप घेऊन आलेल्या पुतनेचा भगवान् श्रीकृष्णाने स्तनपान करून वध केला. श्रीकृष्णाच्या स्पर्शाने तिचा देह सुगंधी झाला. मरताना महाकाय झालेल्या पुतनीचा अंत्यविधी गोकुळातील लोकांनी केला व यशोदेचा हा मुलगा सामान्य नाही याची जाणीव त्यांना झाली.

उत्कच, तृणावर्त, वत्सासूर, बकासूर, अधासूर, धेनुकासूर, प्रलंबासूर, अरिष्टासूर, केसी, व्योमासूर आदी राक्षसांचा वध प्रभू श्रीकृष्णाने लहानपणीच केला.

गोकुळाष्टमीचा उत्सव | Gokulashtami utsav 2021

उन्मत्त दुर्योधनाच्या श्रीमंती स्वागताचा त्याग करून सात्त्विक विदूराच्या घरी जाऊन त्याच्या विदेही पत्नीच्या हातून केळांची साले आनंदाने भक्षण करणारा श्रीकृष्ण भक्तिप्रेमाने प्रसन्न होतो. हे समजून घेण्यासाठी श्रावण वद्य ॥1॥ ते ॥8॥ असा कृष्णजन्माष्टमीचा / गोकुळाष्टमीचा उत्सव करून कृष्णलीला श्रवण करावी. नवमीला दहीहंडीचा गोपाळकाला प्रसाद घेऊन श्रीकृष्णमय व्हावे. बासरीचे स्वर, गोपीप्रेम, गीताज्ञान व निरपेक्षवृत्ती असलेले पुर्णपुरुष भगवान् श्रीकृष्ण पंढरपूरक्षेत्री श्रीविठ्ठलरूपात भक्तांची वाट पाहत उभे आहेत.

लेखक – श्री. प्रकाश ग. रामदासी (काळे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *