खंडोबाचे टांक | khandobache tak
सर्वसाधारणतः टांक हे चांदीचे, पितळेचे आणि तांब्याचे असतात,परंतु क्वचित प्रसंगी जुने पाषाणातील टाक सुद्धा आढळतात. देवघरात पूजेमध्ये असणा-या टांकांची संख्या विषम असते. तांब्यावर चांदीचा पातळ तुकडा ठेवून बनविलेले टांक विशेष प्रचलित आहेत. चांदीच्या तुकड्यावर साच्याच्या सहाय्याने देवतेच्या मूर्तीचा ठसा उमटविला जातो आणि मग हा चांदीचा तुकडा तांब्याच्या तुकड्यावर बसविला जातो आणि सर्व बाजूने तो तांब्याच्या तुकड्यात सांधला जातो. त्यामुळे त्याला भक्कमपणा येतो.
टांकांवरील बारीकसारिक तपशील हे तर या कलेचा उत्कृष्ट आविष्कार आहेत. देवाचा आपल्यावरील अनुग्रह व्हावा, या भावनेतूनही भाविक टांक तयार करवून आपल्या देव्हार्यात ठेवतात. जेजुरीच्या खंडोबाचे टांक दोन-तीन प्रकारचे मिळतात. खंडोबा हा घोड्यावर असून त्याच्या मागे त्याची पत्नी म्हाळसा बसली आहे आणि खंडोबाच्या हातात शस्त्रे असून घोड्याच्या खालच्या बाजूला एक श्वान आहे. खंडोबा या दैवताची पारंपरिक कथा या टांकात चित्रित झाली आहे.
घरामध्ये शुभकार्य उदा. लग्न,मौजीबंधन ई. प्रसंगी नविन टांक बनविले जातात, अथवा उजळले जातात. टांक बनवून घेताना माहितगार कारागिरांकडून बनवून घेणे उत्तम. ब-याचदा अमराठी अथवा अकुशल कारागीर टांक बनवून देतात परंतु आपल्याकडील उपलब्ध असणारे टांक भाविकांच्या माथी मारतात. अशा वेळी जेजुरी, तुळजापूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी टांक बनवून घेऊन विधिवत पूजा करून घेणे सोयीस्कर पडते.
खंडोबाची मूर्ती | khandobachi Murti
श्रीमल्हारी म्हाळसाकांत हे वीर योद्ध्यांचे दैवत असल्याने सदैव युद्धासाठी सज्ज असलेल्या स्वरूपामध्ये दिसते. त्याबरोबरच सोबत पत्नी म्हाळसा देवी असल्याने कौटुंबिक सुख समृद्धी आणि सुबत्ता देणारे दैवत म्हणूनही बहुजन याला देवघरामध्ये पूजतात. मल्हारभक्तांच्या देवघरामध्ये पितळ, चांदी किंवा पंचधातू पैकी एका धातूमध्ये घडविलेली, उभ्या किंवा अश्वारूढ स्वरूपामध्ये श्रीखंडेरायाची मूर्ती आढळते. उभ्या असलेल्या मूर्तीमध्ये वामांगी म्हाळसा सहित श्रीखंडोबा असतात, तर पाठीमागे प्रभावळ असते. अश्वारूढश्रीखंडोबाच्या मूर्ती द्विभुज किंवा चतुर्भुज असतात, द्विभुज मूर्तीच्या हातामध्ये खड्ग आणि पानपात्र आढळते तर चतुर्भुज मूर्तीच्या हातामध्ये खड्ग,त्रिशूळ, डमरू आणि पानपात्र असते. बहुतांश वेळा घोड्यावर बसलेल्या श्रीखंडेराया सोबत म्हाळसादेवीही असते आणि घोड्याच्या पायाजवळ श्वान आढळतो. अलीकडे घडविलेल्या मूर्तींमध्ये श्रीखंडोबाच्या शिरावर शिंदेशाही पगडी असते, जुन्या मूर्तींचे शिरस्त्राण हे टोपासारखे असते.
संकलन :- अशोककाका कुलकर्णी