कशी कराल घटस्थापना ? |Navratra marathi | Ghatasthapana vidhi marathi

नवरात्र विधी:- गर्बा, हदगा, रासदांडीया, भोंडला, लळीत, कीर्तन, भजन, पूजन, गोंधळ व महाआरत्यांच्या कार्यक्रमाने मंगलमय वातावरण निर्माण करणारे नवरात्र म्हणजे शक्तिपूजेचा महोत्सव होय. बंगालप्रांतात तर महाराष्ट्रातील श्रीगणेशोत्सवासारखा ‘दुर्गापूजा’ उत्सव संपन्न केला जातो. कोलकात्यात चौकाचौकांत देवीच्या अनेक भुजांच्या सुंदर मूर्तिंची नऊ दिवसांसाठी स्थापना करून उत्सवाची सांगता मिरवणूक व विसर्जनाने केली जाते. गुजराथप्रांतात रंगीत घागरे घातलेल्या आणि गरबा नृत्यावर टिपर्‍या खेळणार्‍या गुर्जर युवती गावागावांत आनंदोत्सव साजरा करतात. देवीला शुक्रवार, मंगळवार, अष्टमी, चतुर्दशी व नवमी हे दिवस अत्यंत प्रिय आहेत. नवरात्र म्हणजे नवदुर्गा पूजन आणि नवरंग.

नवरात्राचा प्रारंभ | Navratra marathi

1.नवरात्राचा प्रारंभ आश्‍विन शुद्ध प्रतिपदेला करतात परंतु कधीकधी दोन प्रतिपदा येतात. अशावेळी पहिली प्रतिपदा सूर्योदय होत असताना असावी परंतु जर प्रतिपदा अमावस्यायुक्त असेल तर ती दुसर्‍या दिवशी घ्यावी तसेच प्रतिपदेचा जर क्षय असेल तर मात्र अमावस्यायुक्त असली तरी तिच प्रतिपदा घटस्थापनेसाठी घ्यावी आणि वृद्धी असेल तर पूर्वदिवसाची प्रतिपदा घ्यावी.

नवरात्रात- घटस्थापना

2.नवरात्रात- घटस्थापना शु. ॥1॥, ललिता पंचमी शु. ॥5 ॥, सरस्वती पूजन शु. ॥7॥, घागरी फुंकणे शु.॥8॥, महालक्ष्मीपूजन व रात्री होम शु.॥8॥, खांडेनवमी (खङ्ग नवमी- शस्त्रपूजन) शु.॥9॥ हे विधी करतात. नवरात्रात जे 9 दिवस उपवास करतात वा देवीच्या मंदिरात घट बसतात ते शु.॥10॥ (विजयादशमी) या दिवशी देवीला नैवेद्य दाखवून घटाचे उत्थापन करून सुवासिन व ब्राह्मण यांना पुरणपोळीचे जेवण घालून उपवासाची सांगता करतात. या काळात कुमारिकांची 9 दिवस पूजा करून वस्त्रदान देण्याची पद्धत आहे.

देवीची अनेक पद्धतीने पूजा करतात

3.देवीची अनेक पद्धतीने पूजा करतात- भोगी- देवीला अभिषेक, साडी-चोळी, सौभाग्याच्या सर्व अलंकारासंह देवीची ओटी भरणे व पुरणाचा नैवेद्य दाखवून तांबूल अर्पण करणे. आपल्या मुलांचे देवीसमोर जावळ काढणे, दंडवत घालणे, परडी भरणे- हळदी-कुंकू लावून ज्वारी, गहू वा बाजरीचे पिठ, खण, नारळ संपूर्ण शिधा व पुरणाचा नैवेद्य देवीस अर्पण करणे. पोत- भोपे पोत खेळतात. (चिंध्याचा मोठा काकडा पेटवितात याला ‘पोत’ असे म्हणतात.) गोंधळ घालणे- गोंधळ हे महाराष्ट्राचे प्राचीन लोकनाट्य आहे. गोंधळात संबळ, तुणतुणे, टाळ इ. वाद्य असतात. नवरात्रात व लग्नासारख्या धार्मिकविधीनंतर गोंधळ घालतात. भूते, आराधी, गोंधळी, नाईक या देवतांची उपासना करणार्‍या लोकनाट्यकारांना ‘गोंधळी’ म्हणतात. गोंधळात रेणुराई व कदमराई असे दोन पंथ आहेत. गोंधळ घालणारे कदमराई शाखेतील लोक असतात. नाईकाला साथीदार म्हणून तुणतुणे व संबळ वाजविणारी व इतर साथीदार असतात. देवीच्या मागे पानांची प्रभावळ काढणे, कुंकवाचा सडा- देवीच्या मंदिराभोवती प्रदक्षिणेच्या रस्त्यावर हळदी-कुंकवाचा सडा टाकणे, पाळणा- खेळणा बांधणे, डोळे-टिळे वाहणे (खरूज, नायटे येऊ नयेत म्हणून वाहतात.)

कशी कराल घटस्थापना ? | Ghatasthapana vidhi marathi

घटस्थापनेची जागा गोमयाने सारवून रांगोळी काढून सुशोभित करावी. देवघरात आंब्याच्या पानांनी सजविलेली मंडपी बांधावी. खाली पळसाची पत्रावळ ठेऊन त्यावर कलश ठेऊन भोवताली माती पसरून त्यात साळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, जवस व मटकी हे नऊ धान्य पेरून त्यावर पुनश्‍च माती टाकावी. देवीला नऊ दिवस नऊ माळा अर्पण केल्या जातात. त्यात प्रामुख्याने विड्याच्या पानाच्या तसेच तरवड या झाडाची फुले व पाने यांच्या माळा करून वाहिल्या जातात. सातव्या दिवशी पापड्यांचा फुलोरा देवीला अर्पण करून तो मंडपीला बांधतात. घटाशेजारी नऊ दिवस अखंड नंदादीप लावतात. याने घरातील वातावरण प्रदूषणमुक्त होते. या काळात चौकाचौकात रात्री रासदांडिया वा गरबा नृत्य करतात. श्रीकृष्णाची नातसून व बाणासुराची मुलगी ‘उषा’ हिला पार्वतीने प्रसन्न होऊन हे नृत्य शिकविले होते. ते तिने सौराष्ट्रातील गोपींना शिकविले. स्त्रि-पुरुष दोघेही या नृत्यात सहभागी होतात. दुर्गासप्तशती, देवीभागवत, देवीपुराण व मार्कंडेय यांचे पठण करावे. दसर्‍याला ईशान्य दिशेला जाऊन शमीवृक्
षाची पूजा करून आपट्याची पाने वाटावीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *