नवदुर्गा | Navdurga | Nine Durga name |Nine Names of Durga
Nine Names of Durga :- 1)शैलपुत्री 2) ब्रह्मचारिणी 3)चन्द्रघण्टा 4) कूष्मांडा-कूष्मांड 5) स्कंदमाता 6)कात्यायनी 7)कालरात्री (शुभंकरी) 8) महागौरी 9) सिद्धिदात्री
1) शैलपुत्री (हिमालय कन्या व श्रीशंकराची पत्नी-पार्वती म्हणजेच शैलपुत्री होय) | Shailputri
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी (घटस्थापनेचा दिवस) दोन वर्षे वयाच्या बालिकेची शैलपुत्री या रूपात पूजा करतात. तिचे वाहन- वृषभ (बैल), उजव्या हातात त्रिशूळ, डाव्या हातात कमळ, कपाळावर चंद्रकोर आहे. या दिवशी योगी लोक मूलाधार चक्रात स्थिर राहून योगसाधनेस प्रारंभ करततात. यामुळे सर्व मनोइच्छा पूर्ण होतात. शैलपुत्री मातेच्या स्वरुपाला अत्यंत प्रिय असा पिवळा रंग असल्यामुळे महिला नवरात्रीच्या प्रथम दिनी पिवळ्या रंगाची साडी परिधान करणे शुभ मानतात. प्रार्थना-वन्दे वांछित लाभाय चंद्रार्ध कृत शेखराम् ॥ वृषारूढां शूलधरां शैलपुत्री यशस्विनीम् ॥1॥
2) ब्रह्मचारिणी (तपश्चारिणी) | Brahmacharini Mata
वेद व तत्वस्वरूप असलेल्या या देवीच्या उजव्या हातात जपमाळ, डाव्या हातात कमंडलू असून तिने धवलवस्त्र परिधान केलेले आहे. या देवीने श्रीशंकराची पती म्हणून प्राप्ती होण्यासाठी कठोर तप:साधना केली. तिने 1000 वर्षे कंदमुळे, 100 वर्षे शाकभाजी, 3000 वर्षे जमिनीवर पडलेली बिल्वपत्र व त्यानंतर पाणीही न पिता तप:साधना केली. तेव्हा तिला अपर्णा म्हणू लागले. त्यानंतर ब्रह्मदेवाद्वारा आकाशवाणी झाली आणि तिला श्रीशंकर प्राप्ती झाली. या दिवशी साधकाने स्वाधिष्ठान चक्रात ध्यान केले तर त्याला मोक्ष, पराविद्याप्राप्ती, त्याग, तप, वैराग्य, सदाचार व संयम इ. गुणांची प्राप्ती होते. या दिवशी तीन वर्षाच्या मुलीची ब्रह्मचारी रूपात पूजा करावी. ब्रह्मचारिणी मातेच्या स्वरुपाला अत्यंत प्रिय असा हिरवा रंग असल्यामुळे महिला नवरात्रीच्या दुसर्या दिवशी हिरव्या रंगाची साडी परिधान करणे शुभ मानतात. प्रार्थना-दधाना कर-पद्माभ्यां अक्षमाला-कमंडला ॥ देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिणी अनुत्तमा॥2॥
3) चन्द्रघण्टा | Chandraghanta
लाल वस्त्र परिधान केलेल्या या देवीच्या मस्तकावर किंवा हातात चंद्राच्या आकाराच्या घण्टा असल्याने हिला चंद्रघण्टा असे म्हणतात. ही दशभुजा असून हातात खड्गबाणादी शस्त्रे आहेत. ती सिंहवाहिनी (काही ठिकाणी ती वाघावर बसल्याचा उल्लेख आहे.) असून तिची मुद्रा युद्धसिद्धा आहे. या दिवशी साधकाने मणिपूर चक्रात प्रवेश करून ध्यान केल्यास सुगंध, दिव्यध्वनी श्रवण, सिंहपराक्रमवृत्ती, सौम्यता व विनम्रता या सद्गुणांची प्राप्ती होते. या दिवशी चार वर्षाच्या मुलीची पूजा करावी. चंद्रघण्टा मातेच्या स्वरुपाला अत्यंत प्रिय असा करडा रंग असल्यामुळे महिला नवरात्रीच्या तृतीय दिनी करड्या रंगाची साडी परिधान करणे शुभ मानतात. प्रार्थना-पिण्डज प्रवरा रूढा चण्ड कोपास्रकैयुर्ता ॥ प्रसाद तनुते मह्यं चन्द्रघण्टाइति विश्रुत ॥3॥
4) कूष्मांडा-कूष्मांड | Kushmanda
कूष्मांडा-कूष्मांड = कोहळा किंवा कू = वाईट + उष्मा = ताप + अंडा = उदर = वाईट ताप देणारा संसार जिच्यापोटात आहे अर्थात सत्व, रज व तम या त्रिविधतापरूपी संसाराचे जिने भक्षण केले आहे त्या देवीला आठ हात असून तिच्या हातात जपमाला, कमंडलू, धनुष्य, बाण, कमल, अमृतकलश, चक्र व गदा ही आयुधे आहेत. सिंहावर आरूढ झालेल्या या देवीच्या आशीर्वादाने रोग, कष्ट व शोक नाहीसे होतात व आयुष्य, बल, आरोग्य व यश यांची प्राप्ती होते. ही देवी सर्वांना रोजचे अन्न पुरविते. कुष्मांडा मातेच्या स्वरुपाला अत्यंत प्रिय असा नारंगी रंग असल्यामुळे महिला नवरात्रीच्या प्रथम दिनी नारंगी रंगाची साडी परिधान करणे शुभ मानतात.
5) स्कंदमाता | Skandamata
सिंहावर आरूढ असलेल्या या देवीला कमलासनीही म्हणतात. स्कन्दाला (कार्तिकस्वामी) मांडीवर घेऊन बसल्याने या देवीला स्कंदमाता म्हणतात. चार हात असलेल्या या देवीच्या हातात कमलपुष्पे असून एका हाताने स्कंदाला धरले असून दुसर्या हाताने आशीर्वाद देत आहे. या दिवशी साधकाने आपले मन विशुद्धचक्रात एकाग्र करून ध्यान करावे याने परमशांतीची प्राप्ती होऊन मोक्षमार्ग सुलभ होतो. या दिवशी ललिता पंचमी असतेे. या दिवशी सहा वर्षे वयाच्या कुमारिकेची पूजा करावी. प्रार्थना- सिंहासन गता नित्यं पद्माश्रित करद्वया॥ शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी॥5॥
6) कात्यायनी | Katyayani
पहिल्या चार शक्तिपीठात (उडियान येथे हे शक्तिपीठ होते परंतु यवनांच्या काळात हे नष्ट झाले.) समावेश असलेल्या या देवीची जन्मकथा अती सुंदर आहे. महिषासुराच्या त्रासाने त्रस्त झाल्याने देवांनी ब्रह्मा, विष्णू व शिवाची आराधना केली तेव्हा सर्व देवांच्या तेजातून एक देवी प्रकट झाली. तिची पूजा कात्यगोत्रोत्पन्न ऋषी कात्यायन यांनी केली म्हणून या देवीला कात्यायनी हे नाव पडले. काही ठिकाणी कात्यायनऋषिंनी देवीची आराधना करून तिला आपली कन्या होण्यास सांगितले व देवी त्यांचेकडे कन्या म्हणून अवतरली म्हणून तिला लोक कात्यायनी या नावाने ओळखू लागले अशी आख्यायीका आहे. या दिवशी साधकाने आज्ञाचक्रात एकाग्र होऊन ध्यान केल्यास चार पुरूषार्थाची (धर्म, अर्थ, काम, मोक्ष.) प्राप्ती होते. सिंहावर आरूढ असलेली ही देवी शंख, चक्र, खड्ग व त्रिशूळ ही चार आयुधे धारण केलेली चार भुजांची (विद्यार्णव तंत्र) असून त्रिनेत्रा आहे. तर काही ठिकाणी अभय व वर देणारे दोन उजवे हात व डाव्या एका हातात कमळ व दुसर्या हातात खड्ग आहे असे वर्णन आहे. मत्स्यपुराणात ही दशभुजा असल्याचे म्हटले आहे. या दिवशी सात वर्षे वयाच्या कुमारिकेचे पूजन करावे. प्रार्थना- चंद्रहा सोज्वल करा, शार्दूल वर वाहना॥ कात्यायनी शुभंदद्याद देवी दानव घातिनी॥ 6॥
7) कालरात्री (शुभंकरी) | Kalratri
प्रार्थना- एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता। लम्बोष्ठी कर्णिकाकर्णि तैलाभ्यक्त शरीरिणी॥ वामपादो ल्लसल्लोह लता कण्टक भूषणा। वर्धन मूल्य ध्वजा कृष्णा कालरात्रिर् भयकारी॥ 7॥ अंधारासारखा काळा रंग, विस्फारलेले केस, गळ्यात विजेसारखी चमकणारी माला, तीन डोळे, भयंकर ज्वाला निघणारे नाक, गाढवावर बसलेली, चार हात असलेली, अभय व वर मुद्रा असलेले दोन्ही उजवे हात, लोखंडी काटा व कट्यार घेतलेले दोन्ही डावे हात असे भयाण रूप असलेली ही देवी भक्तांना शुभ फल देते म्हणून तिला शुभंकरी असे म्हणतात. रक्तबीजाच्या रक्ताचा थेंब जमिनीवर पडला तर त्यातून नवीन राक्षस जन्म घेईल असे त्याला वरदान होते म्हणून रक्तबीजाच्या रक्ताचा प्रत्येक थेंब जमिनीवर पडण्यापूर्वीच चाटून त्याला संपवणार्या या देवीचे या दिवशी सहस्त्रार चक्रात मन स्थिर करून ध्यान केल्यास सर्व सिद्धिंची प्राप्ती होते. यम-नियमांचे पालन करून या दिवशी आठ वर्षे वयाच्या बालिकेची पूजा करावी.
8) महागौरी | Mahagauri
शिवप्राप्तिसाठी पार्वतीने कठोर तप:श्चर्या केल्याने पार्वतीचा रंग काळा पडला तेव्हा श्रीशंकराने प्रसन्न होऊन तिला गौरवर्ण दिला म्हणून तिला महागौरी म्हणू लागले. वृषभारूढ असलेली ही देवी धवलवस्त्र परिधान केलेली असून चार भूजांची आहे. उजव्या दोन हातातील एका हातात त्रिशूळ व एका हाताने भक्तांना अभय देत आहे. डाव्या एका हातात डमरू व दुसर्या हातात जपमाला आहे. प्रार्थना-श्वेते वृषे समारूढा श्वेतांबरधरा शुचि:॥ महागौरी शुभंदद्यात महादेव प्रमोददा॥ 8॥ दुर्गाष्टमी, महाष्टमीच्या या दिवशी चण्डीपाठाने उपासना करतात. या दिवशी नऊ वर्षाच्या कुमारिकेची पूजा करावी.
9) सिद्धिदात्री | Siddhidatri
मंत्र-तंत्राची अधिष्ठात्री देवी. सिंह किंवा कमलासनावर बसलेली. चक्र, गदा, शंख व कमलपुष्प हे आपल्या चार हातात धारण केलेली, भगवान् शंकरासह (या देवीच्या कृपेमुळेच श्रीशंकरास अर्धनारीनटेश्वर हे नाव मिळाले आहे.) सर्वांना अष्टसिद्धिंचे (अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकास्य, ईशित्व व वशित्व) वरदान देणार्या व परमशांती व अमृतपदप्राप्ती देणार्या देवीची दहा वर्षे वयाच्या कुमारिकेच्या रूपात नवव्या दिवशी पूजा करावी.