श्रीगणेशोत्सव | श्री गणेश चतुर्थी | Ganesh Chaturthi 2021 in Marathi

श्रीगणेशोत्सव | Ganesh Chaturthi 2021 Date and Tithi marathi

श्री गणेश चतुर्थी | Ganesh Chaturthi 2021 Tarikh or date :- शुक्रवार १० सप्टेंबर २०२१ येणारा श्रीगणेशोत्सव हा भाद्रपद महिन्यत शुक्ल पक्षात १० सप्टेंबर २०२१ ला शुक्रवारी तिथी चतुर्थीं, चित्रा नक्षत्र वरती उदित होत आहे.

श्री गणेश चतुर्थी मूहूर्त | Ganesh Chaturthi 2021 Muhurat and Tithi

गणपतीची प्राणप्रतिष्ठा ( बसवणायचा ) चा मुहुर्त ९ सप्टेंबर २०२१ रात्री १२:५८ ते १० सप्टेंबर २०२१ रात्री ९:१९ पर्यंत आहे.

शके : १९४३ ,प्लव नाम संवत्सरे, दक्षिणायाने ,वर्षा ऋथु ,भाद्रपद मासे ,शुक्ल पक्षे, चतुर्थ्याम शुभ पुण्य थिथो, भ्रगु वासरे, चित्रा दिवस नक्षत्रे, ब्रह्म: योगे, वनीज करणे ,तुला राशी स्तीतें चंद्रे

  1. तिथी : चतुर्थीं
  2. मास : भाद्रपद
  3. वारं : शुक्रवार
  4. पक्ष : शुक्ल
  5. नक्षत्र : चित्रा
  6. योग : ब्रह्म:
  7. करण : वनीज
  8. राशी : तुला
  9. शके : १९४३
  10. संवत्सरे : प्लव

श्रीगणेशोत्सवाची संकल्पना | Ganesh Utsav 2021

जगद्गुरू आद्य शंकराचार्यांच्या आज्ञेने प्रत्येक हिंदुच्या घरातील देवघरात श्रीगणेश, श्रीविष्णू, श्रीशिव, श्रीजगदंबा व श्रीसूर्य या पंचदेवतांची (पंचायतन) पूजा करण्याची प्रथा आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्रीगणेशाचा जन्म झाल्यामुळे या उत्सवाचे आयोजन प्रत्येक घरात केले जाते. ‘सुखकर्ता दु:खहर्ता श्रीगणेश’ चतुर्थीव्रताने प्रसन्न होतो अशी श्रद्धा आहे. शुक्लपक्षातील चतुर्थीला विनायकी, वद्यपक्षातील चतुर्थीला संकष्टी व चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी या नावाने ओळखतात. अंगारक म्हणजे ‘मंगळ’ म्हणून श्रीगणरायाला ‘मंगलमूर्ती’ असे म्हणतात. विश्‍वामध्ये जेवढे पदार्थ आहेत त्या सर्वांना गणामध्ये मोजले जाते. उदा- पशुगण, पक्षीगण, मानवगण, देवगण या सर्व गणांचा जो अधिपती तो गणपती होय. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ ही सिंहगर्जना करणार्‍या लोकमान्य टिळकांनी इ.स. 1893 ला सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाचा प्रारंभ केला. इ.स. 1893 ला मुंबईसह महाराष्ट्रामध्ये हिंदू-मुसलमानांचे दंगे झाले तेव्हा पुण्यात ऐक्यासाठी एका सभेचे आयोजन केले होते. घराघरांत संपन्न केला जाणारा श्रीगणेशोत्सव समाजाच्या ऐक्यासाठी सार्वजनिक स्वरूपात केला पाहिजे असा ठराव लो. टिळकांनी मांडला. हिंदू धर्मात कितीही पंथ व संप्रदाय असले तरी सर्व लोक श्रीगणेशाची प्रत्येक कार्यात प्रथम पूजा करतात तसेच श्रीगणेश हा श्रीविष्णूचा अवतार असल्यामुळे ‘वैष्णव’ व तो भगवान् श्रीशंकराचा पुत्र असल्यामुळे ‘शैव’ असे दोन्हीही पंथाचे लोक श्रीगणेशाची पूजा करतात म्हणून श्रीगणेशाचा सार्वजनिक उत्सव करताना कोणाचेही मतभेद होणार नाहीत तसेच श्रीगणेशोत्सव हा धार्मिक उत्सव असल्यामुळे इंग्रजांना त्यावर बंदी आणता येणार नाही व या उत्सवामुळे सर्व हिंदुंचे ऐक्य होऊन स्वातंत्र्याचा लढा अधिक तीव्र करता येईल या कल्पनेतून या उत्सवाचा जन्म झाला.

Table Of Contents
  1. श्रीगणेशोत्सव | Ganesh Chaturthi 2021 Date and Tithi marathi
  2. श्रीगणेशोत्सवाच्या पौराणिक कथा | Ganesh Chaturthi chi katha
  3. अग्रपूजेचा सन्मान | Ganpati chi pooja Adhi ka kartat ? 
  4. श्रीगणेशाच्या जन्मकथा | Ganesh Janma Katha
  5. श्रीगणेशाचे साडेतीन पीठ | Ganesha che sadetin pith
  6. श्रीगणेशमूर्ती | Ganesh Murti Mahatva
  7. श्रीगणेशाचे वाहन उंदीर | Ganeshache Vahan Mushak
  8. श्रीगणेशाचा परिवार | Ganeshacha Parivar
  9. श्रीगणेश चतुर्थी व्रत | Ganesh Chaturthi 2021 Vrat 
  10. श्रीगणेशाचे अवतार | Ganesha che avatar
  11. श्रीगणेशला आवडणार्‍या गोष्टी | Ganapati la Avdnarya Goshti
  12. श्रीगणेश आराधना | Shree Ganesh Aradhana
  13. श्रीगणेशोत्सवातील उपासना | Ganesh Upasana
  14. श्रीगणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा | Ganpati pran pratishtha

श्रीगणेशोत्सवाच्या पौराणिक कथा | Ganesh Chaturthi chi katha

  1. त्रेतायुगात उन्मत्त सिंदुरासूराने देवांना कैदेत टाकले तेव्हा त्र्यंबकेश्‍वरच्या गुहेत शंकराच्या आज्ञेने पार्वतीने आद्य गणपतीची आराधना केली. तिने श्रावण शु. ॥1॥ ते ॥5॥ व भाद्रपद शु. ॥1॥ ते ॥5॥ या काळात मातीचा गणपती करून पूजा अर्चा करून विसर्जन करणे असे व्रत केले. एके दिवशी मूर्तीतून श्रीगणराज प्रकट झाले व पार्वतीच्या विनंतीला मान देण्यासाठी गणरायाने पार्वतीच्या पोटी भाद्रपद शु. चतुर्थीला मयुरेश्‍वर नावाने जन्म घेतला व सिंदुरासूराचा वध केला. त्याची स्मृती म्हणून माती वा शाडुच्या गणरायाच्या मूर्ती करून त्याची पूजा केली जाते व भाद्रपद शु. ॥4॥ ते ॥14॥ असा श्रीगणेशोत्सव संपन्न केला जातो.
  2. गणासूराच्या त्रासाला कंटाळलेल्या देव व माणसे यांनी भगवान् श्रीविष्णूची आराधना केली त्यामुळे शंकर व पार्वती यांचा पुत्र म्हणून श्रीविष्णूने जन्म घेऊन गणासूराचा वध केला. तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा होता म्हणून यादिवशी गणेश आराधना करतात.
  3. शंकराकडून तप:श्‍चर्येने वरदान मिळवून उन्मत्त झालेल्या त्रिपुरासुराचा नाश करण्यासाठी शंकर व गणपती युद्ध करत होते तेव्हा पार्वती माहेरी हिमालयात होती. पार्वतीने गणेशविरहाने व्याकूळ होऊन गणपतीची मातीची मूर्ती तयार केली. तो दिवस श्रावण शुद्ध चतुर्थीचा होता. इकडे गणपती व शिवाने त्रिपूरासुराचा वध केला. त्यानंतर गणेश पार्वतीला भेटण्यासाठी हिमाचल पर्वतावर गेला. तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा होता. म्हणून या दिवशी गणेशचतुर्थी संपन्न केली जाते. या दिवशी श्रीगणेशाची मूर्ती घरी घेऊन येतात व श्रीगणेशोत्सव संपन्न करतात.

अग्रपूजेचा सन्मान | Ganpati chi pooja Adhi ka kartat ? 

सृष्टीनिर्मितीनंतर अग्रपूजेचा मान कोणाला देणार ? हा प्रश्‍न सर्वांनी ब्रह्मदेवाला विचारला तेव्हा ‘जो पृथ्वीला सर्वप्रथम प्रदक्षिणा घालील त्याला अग्रपूजेचा मान देण्यात येईल’ असे ब्रह्मदेव म्हणाले. सर्व देव पृथ्वीप्रदक्षिणा करण्यासाठी निघाले परंतु श्रीगणेशाने आपल्या मात्या-पित्यांना आसनावर बसवून प्रदक्षिणा घातली. (काही ठिकाणी पाटावर ‘श्रीराम’ हे अक्षर काढून त्याला प्रदक्षिणा घातल्याचा उल्लेख आहे.) माता-पित्याचे स्थान पृथ्वीमोलाचे असल्याने ब्रह्मदेवाने श्रीगणेशाला अग्रपूजेचा सन्मान दिला.

श्रीगणेशाच्या जन्मकथा | Ganesh Janma Katha

श्रीगणेशाच्या जन्मकथा | Ganesh Janma Katha

  1. एकदा पार्वतीने आपल्या अंगाच्या मळापासून एक मुल तयार केले व त्याला दारात बसवून सांगितले,‘हे बाळा ! मी स्नान करीत आहे. तू कोणालाही आत येऊ देऊ नकोस.’ पार्वती स्नानाला गेल्यावर भगवान् शंकर आले परंतु दारात बसलेला हा मुलगा त्यांना आत जाऊ देईना तेव्हा भगवान् शंकराने त्या मुलाचे शीर धडापासून वेगळे केले त्यामुळे पार्वतीला दु:ख झाले. पत्नीचे दु:ख दूर करण्यासाठी भगवान् श्रीशंकराने गजासुरास ठार मारून त्याचे शीर मुलाला बसविले तेव्हापासून या मुलाला ‘गजवदन’ म्हणू लागले (स्कंदपुराण)
  2. गंडकी नगरीच्या ‘चक्रपाणी’ राजाला सूर्यकृपेने ‘सिंधू’ नावाचा मुलगा झाला. सिंधूने उग्र तपश्‍चर्या केल्यावर भगवान् सूर्य प्रसन्न झाले व त्याला अमृताचे जेवण दिले. हे अमृत जोपर्यंत तुझ्या शरीरात आहे तोपर्यंत तुला मृत्यू येणार नाही असाही आशीर्वाद दिला. उन्मत्त झालेल्या सिंधूने कैलासावर आक्रमण केले तेव्हा पार्वतीने भगवान् श्रीविष्णूचा धावा केला.‘मी आपल्या उदरी जन्म घेऊन सिंधूचा अंत करील’ असे पार्वतीला वचन दिले. आपला वध करणारा आपला शत्रू पार्वतीच्या उदरामध्ये वाढत आहे असे कळाल्यावर सिंधूने सूक्ष्म रूप घेऊन पार्वतीच्या गर्भातील मुलाचे शीर धडावेगळे केले. पार्वतीला मस्तकविरहित मुल झाले तेव्हा भगवान् शंकराने गजासुराला मारून त्याचे शीर मुलाच्या धडाला जोडले. भगवान् गजाननाने भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सिंधूसुराचा वध केला व सर्व देवांना संकटमुक्त केले. त्या आनंदाप्रीत्यर्थ सर्वांनी श्रीगजाननाची घराघरांत प्राणप्रतिष्ठा करून उत्सव संपन्न केला.
  3. एकदा भगवान् श्रीकृष्ण वृद्धाचे रूप घेऊन पार्वतीकडे आले व पार्वतीस म्हणाले,‘हे देवी ! भगवान् श्रीविष्णू आपले उदरी जन्म घेऊन जगाचा उद्धार करणार आहेत.’ हे सांगून श्रीकृष्ण अदृश्य झाले व त्याचवेळेस पार्वतीच्या शय्येवर एक अतिसुंदर बालक प्रगट झाले. ते बालक पाहण्यासाठी सर्व देव आले. त्यात शनिमहाराजही आले होते. ‘माझ्या मुलाला आपण पहा’ असा आग्रह पार्वतीने शनिला केल्यावर शनिमहाराज म्हणाले,‘माताजी ! मी ज्याच्याकडे पाहिल त्याचे शीर धडावेगळे होईल असा मला शाप आहे त्यामुळे कृपया मला आपण आग्रह करू नये’ परंतु पार्वतीने हट्ट धरल्यामुळे शनिने श्रीगणरायाकडे पाहिले व श्रीगणरायाचे शिर धडापासून वेगळे झाले त्यामुळे पार्वती दु:खी झाली तेव्हा भगवान् श्रीविष्णूने ‘पुष्पभद्रा’ नदीच्या खोर्‍यातील एका हत्तीच्या बाळाचे शीर कापून आणून त्या बालकास बसविले. मुलाचे नाव ‘गजानन’ ठेवले.
  4. ‘गजासुर’ हा महिषासुराचा मुलगा. आपल्या पित्याचा वध पार्वतीचा अवतार असलेल्या ‘देवी’ने केला म्हणून त्याला पार्वतीबद्दल राग होता. त्याने भगवान् श्रीशिवशंकराला प्रसन्न करून घेतल्यावर अखिल ब्रह्मांडाची सत्ता हस्तगत केली. सर्व देव गजासूराला घाबरू लागले तेव्हा त्यांनी श्रीगजाननाची स्तुती केली. श्रीगजाननाने पार्वतीच्या उदरी जन्म घेऊन गजासुराचा अंत केला.
  5. भगवान् शंकराचा कमंडलू गजासुराने लाथाडून शिवाचा अपमान केला व गजासुर निघून गेला. ध्यानभंग झालेल्या शंकराला दारात बसलेल्या पार्वतीनंदनाने आपला कमंडलू सांडला असे वाटले म्हणून त्यांनी त्या मुलाचा शिरच्छेद केला परंतु सत्य लक्षात आल्यावर शिवाने गजासुराचा पाठलाग करुन  त्याचा शिरच्छेद केला व त्याचे शीर पार्वतीनंदनाला जोडले.
  6. एकदा पार्वती व शिव वनविहारास गेले असता तिथे त्यांना एक गजदांपत्य रतिक्रीडा करताना दिसले तेव्हा शिव-पार्वतीने गजरूप घेऊन विहार केला. त्यांना ‘गजानन’ हा मुलगा झाला.
  7. श्रीशिवाने आपल्या तप:तेजाने एक मुलगा निर्माण केला. आपल्याशिवाय मुलगा निर्माण केला म्हणून पार्वतीला राग आला व तिने ‘हा मुलगा बेडौल होईल’ असा शाप दिला. नंतर श्रीशंकराने अनेक शस्त्रधारी विनायक निर्माण केले व श्रीगणपतीला त्यांचा नायक बनविले म्हणून या मुलाला ‘श्रीगणनायक’ असे म्हणू लागले. श्रीगणेशजन्माच्या जरी अनेक कथा असल्या तरी तो ‘शिव-पार्वतीनंदन’ आहे यात शंका नाही. या सर्व घटना भाद्रपद शुद्ध ॥4॥ ला घडल्या अशी श्रीगणेश भक्तांची श्रद्धा असल्यामुळे या तिथीला श्रीगणेशपूजन केले जाते.

श्रीगणेशाचे साडेतीन पीठ | Ganesha che sadetin pith

  1. मोरगावचा मयुरेश्‍वर 
  2. जालन्याजवळील ‘राजूर’ येथील महागणपती– युद्धानंतर खिन्न झालेल्या ‘वरेण्य’ राजाला श्रीगणेशाने ‘राजूर’ या गावी ‘श्रीगणेशगीता’ सांगितली. येथे श्रीगणेशाचे अतिभव्य मंदिर असून मंदिरात हजारो समयांचा अखंड नंदादीप तेवत असतो.
  3. चिंचवडचा मंगलमूर्ती– कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील ‘शाली’ नावाच्या गावचे वामनभट व पार्वतीबाई हे दांपत्य मोरगावला आले. या दोघांनी पुत्रप्राप्तीसाठी 48 वर्षे अनुष्ठान केले. त्यांना माघ वद्य चतुर्थी शके 1297 (इ.स. 1375) रोजी मोरगावला श्रीगणेशकृपेने मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी ‘मोरया गोसावी’ ठेवले. नयनभारती यांच्याकडून अनुग्रह घेतलेले मोरया गोसावी थेऊरला अनुष्ठानासाठी आले. तिथे त्यांना मुळा-मुठेच्या नदीत स्नान करताना श्रीगणेशाचा साक्षात्कार होऊन श्रीगणेशमूर्तीचा प्रसाद मिळाला. नंतर ते चिंचवडजवळ थेरगावला किवंजाईदेवीच्या मंदिरात आले व तेथून लोकाग्रहाने चिंचवडला आले. त्यांच्यामुळे चिंचवड हे श्रीगणेशक्षेत्र प्रसिद्धीला आले. आजही तिथे त्यांची संजीवनी समाधी आहे. हे तीन पूर्ण पीठ असून 
  4. पद्मालय येथील प्रवाळ गणेश हे अर्धपीठ आहे– जळगावपासून 15 कि.मी. एरंडोलजवळ ‘पद्मालय’ हे तीर्थ आहे. मंदिरात उजव्या व डाव्या सोंडेच्या दोन मूर्ती आहेत. 1.हात-पाय नसलेल्या ‘कार्तवीर्य’ नावाच्या गणेशभक्ताने श्रीगणेशाची आराधना केली तेव्हा त्याला उजव्या सोंडेच्या श्रीगणेशाने दर्शन दिले. गणेशकृपेने कार्तवीर्याचे अपंगत्व नाहीसे झाले. 2.‘माझ्यामुळे भगवान् शंकराला शांती लाभली’ असा शंकराच्या गळ्यातल्या नागाला गर्व झाला तेव्हा शंकराने तो नाग गळ्यातून फेकून दिला. नागाने शंकरप्राप्तीसाठी श्रीगणेशाची आराधना केली तेव्हा डाव्या सोंडेच्या गणपतीने त्याला दर्शन दिले. श्रीगणेशकृपेने शंकराने नागाचा स्वीकार केला. या दोन घटना पद्मालय येथे घडल्या. येथील तळ्यात कमळाची फुले असल्याने याला ‘पद्मालय’ असे म्हणतात. हे अर्धपीठ आहे. वरील स्थानांबरोबरच गणपतीपुळे, मुंबईचासिद्धिविनायक, टिटवाळ्याचा श्रीगणेश इ. प्रसिद्ध आहेत.
Ganesh Murti Mahatva

श्रीगणेशमूर्ती | Ganesh Murti Mahatva

अकार चरण युगुल। उकार उदर विशाल॥ मकार महामंडल । मस्तकाकारें ॥19॥ (ज्ञा.अ.1) श्रीज्ञानेश्‍वर महाराजांनी श्रीगणेशाला ॐ कार स्वरूप व शब्दब्रह्मरूप म्हटले आहे.

1) श्रीगणेशाची सोंड – 

जमिनीवर पडलेली बारीक सुईसुद्धा हत्तीची सोंड उचलून घेते. ‘जे चांगले आहे ते आत्मसात केले पाहिजे. गणपती उजव्या व डाव्या सोंडेचे असतात. उजवी सोंड म्हणजे दक्षिण दिशा,‘यमाची’ दिशा आहे. उजवी बाजू ‘सूर्य’ नाडीची आहे. यमलोकाच्या दिशेला जो तोंड देऊ शकतो तो शक्तिशाली असतो तसेच सूर्यनाडी चालू असलेला तेजस्वी असतो. या दोन्ही अर्थी उजव्या सोंडेचा गणपती जागृत असतो. या गणेशाची पूजा कडक सोवळ्यात केली जाते. डावी सोंड वाममुखी म्हणजे उत्तर दिशा, ही शुभ व अध्यात्माला पुरक आहे, आनंददायी आहे म्हणून वाममुखी गणपतीपूजेमध्ये ठेवतात.

2) श्रीगणेशाचे डोके – 

धडापासून वेगळे केलेले तेच डोके परत त्या धडाला लावून भगवान् शंकर गणेशाला जिवंत करू शकले असते परंतु त्यांनी तसे न करता हत्तीचे डोके लावले कारण हत्ती सर्व प्राण्यांत बुद्धिमान आहे. भगवान् शंकराने आपल्या मुलाला बुद्धिमान केले.

3) श्रीगणेशाचे कान – 

श्रीगजाननाचे कान सुपासारखे मोठे आहेत. सुपातून धान्य पाखडल्यावर फोलपट बाहेर फेकले जाते व उपयुक्त धान्य सुपात राहते. माणसानेही जे ऐकावयास योग्य आहे तेवढेच ऐकावे व बाकीचे ऐकून न ऐकल्यासारखे करावे 

4) श्रीगणेशाचे दात – 

श्रीगणेशाचा संपूर्ण दात ‘श्रद्धा’ तर तुटलेला दात ‘संयम असावा’ हा संदेश देतो.

  1. शिवाने रागावून श्रीगणेशाचा एक दात मोडला.
  2. एकदा परशुराम शंकरास भेटण्यास आले. दारात असलेल्या गणेशाने परशुरामास आत जाण्यास मनाई केली त्यामुळे त्यांच्यात युद्ध झाले. परशुरामाने शिवस्मरण करून आपला परशू गणेशाकडे फेकला. पित्याचा सन्मान करण्यासाठी त्याने तो आपल्या दाताने अडविला त्यामुळे त्यांचा एक दात तुटला.
  3. देवांतकाबरोबर युद्ध करताना विनायकाचा दात तुटला. तुटलेल्या दाताने श्रीगणेशाने देवांतकाचा अंत केला. अशा काही पुराणकथा आहेत.

5) श्रीगणेशाचे हात – 

श्रीगणेशाला चार वा सहा हात असतात. देखा षड्दर्शनें म्हणिपती । तेचि भुजांची आकृती ॥10॥ (ज्ञा.अ.1) श्रीगणेशाचे सहा हात म्हणजे सहा शास्त्र होत. त्यांच्या सहा हातांमध्ये सहा आयुधे आहेत.

  1. परशु– शौर्य 
  2. अंकुश– वासना व विकार यांचा नाश करण्याचे सामर्थ्य 
  3. पाश– शिस्त 
  4. गणेशाला प्रिय मोदक (आनंद)– गणेशोमोदकप्रिय:। खोबरे, खसखस व पिठीसाखर घालून साजूक तूपात तळलेले मोदक वा पुरणाचे मोदक करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे गणेशाला पाच ‘ख’कार- खडीसाखर, खारीक, खोबरे, खिसमिस, खसखस, किंवा खजूर व खवा हे पंचखाद्य आवडतात.
  5. हातात तुटलेला एक दात– संयम 
  6. वर देणारा हात– आशीर्वाद 

6) श्रीगणेशाचे मोठे पोट –

जे ऐकले ते बोलून दाखविण्याची सवय हानिकारक असते. श्रीगणेशासारखे मोठे पोट असावे म्हणजे जे ऐकले ते जवळ ठेवता येईल. श्रीगणेशाच्या पोटावर नागाचा करगोटा असतो. नागात विष असते. टीकाकारातही टीका करण्याचे विष असते म्हणून श्रीगणेशासारखे टीकाकारांना अलंकार म्हणून स्वीकारले पाहिजे.

7) श्रीगणेशाची बैठक – 

अकारण फिरतो तो दु:खी होतो म्हणून श्रीगणेशाची बैठक स्थिर आहे.

Ganeshache Vahan Mushak

श्रीगणेशाचे वाहन उंदीर | Ganeshache Vahan Mushak

  1. इंद्रसभेत वावरताना ‘क्रौंच’ गंधर्वाची वामदेवाला लाथ लागली तेव्हा ‘तू उंदीर होशील’ असा त्यांनी त्याला शाप दिला. उंदीर झालेला क्रौंच पराशरऋषिंच्या आश्रमात राहू लागला. ऋषिंच्या आश्रमातही तो उन्मत्तासारखा वागू लागल्यावर पराशरांनी श्रीगणेशाचे स्मरण केले. श्रीगणेशाने त्या उंदरास आपल्या पायाखाली दाबून धरले तेव्हा तो श्रीगणेशास शरण आला. ‘तुला पाहिजे तो वर माग’ असे श्रीगणेश म्हणाल्यावर स्वभावात परिवर्तन न करता उन्मत्त उंदीर म्हणाला, ‘मी तुम्हाला काही मागण्याऐवजी तुम्हीच मला वर मागा’ तेव्हा श्रीगणराज म्हणाले,‘तू माझे वाहन हो.’ क्रौंचाने ते मान्य केले व तो श्रीगणेशाचे वाहन झाला. कोणत्याही मोठ्या माणसाने लहान वृत्तीच्या माणसाला भांडत बसण्याऐवजी त्याच्या कलेने घेऊन त्याचा उपद्रव थांबवावा हेच या घटनेतून सिद्ध होते.
  2. वसुंधरा ददौ तस्मै वाहनाय च मुषकम् । (ब्रह्मवैवर्तकपुराण 13/11) गजासुराला मारण्यासाठी श्रीगणराज धावले. गजासुर उंदराचे रूप घेऊन पळून जाऊ लागला परंतु श्रीगणरायाने त्याला पकडून आपले वाहन केले.

श्रीगणेशाचा परिवार | Ganeshacha Parivar

कुटुंबसौख्यासाठी ऐक्य व तडजोड अत्यंत महत्त्वाची आहे. शिवाचे वाहन नंदी, पार्वतीचे सिंह, बंधू कार्तिकस्वामींचे मोर, शंकराच्या अंगावर साप, श्रीगणेशाचा उंदीर या सर्वांची वृत्ती व विचार जरी भिन्न असले तरी त्यांनी परस्परावर कधीही आक्रमण केले नाही. गणेशाला सिद्धी व बुद्धी (ऋद्धी-सिद्धी)या दोन पत्नी असून ‘क्षेम’ व ‘लाभ’ हे दोन पुत्र आहेत.

श्रीगणेश चतुर्थी व्रत | Ganesh Chaturthi 2021 Vrat 

मंगळवारी येणार्‍या अंगारकी चतुर्थीपासून चतुर्थी उपवासाचा प्रारंभ करावा. वद्यपक्षातील संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रोदयानंतर सोडतात. चंद्र ही मनाची तर श्रीगणेश बुद्धीदेवता आहे. जर सद्बुद्धी मनाच्या सहवासात आली तर आपले मन अचंचल होऊन ‘सायुज्जता’ मुक्ती प्राप्त होते. चतुर्थी रविवारी आल्यास शुभ मानली जाते. चतुर्थीला पृथ्वीभोवती Zero-G-Belt आकर्षणरहितकडे निर्माण होते त्यामुळे पचनक्रिया मंदावते म्हणून आरोग्याच्या दृष्टीने चतुर्थीला उपवास करणे गरजेचे आहे. शुद्धपक्षातील विनायकी चतुर्थीचा उपवास दुसर्‍या दिवशी सूर्योदयानंतर सोडतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला ‘महासिद्धी विनायकी चतुर्थी’ या नावाने ओळखतात. या चतुर्थीचा चंद्र पाहिल्यास आळ येतो अशी भावना आहे. श्रीकृष्णाने हा चंद्र पाहिला तेव्हा त्यांच्यावर शमंतकाचा आळ आला. एकदा नारद एक दिव्य फळ घेऊन कैलास पर्वतावर आले. ते फळ श्रीगणपती व कार्तिकस्वामीने (षडाननाने) एकदम मागितले. ‘हे फळ मी कोणाला देऊ ?’ असा प्रश्‍न भगवान् शंकराने ब्रह्मदेवाला विचारल्यावर लहान असल्यामुळे ‘कार्तिकस्वामीला द्या’ असे ते म्हणाले. गणेश ब्रह्मदेवावर चिडले व अक्राळविक्राळ रूप धारण करून प्रकट झाले तेव्हा जवळ बसलेल्या चंद्राला हसू आले म्हणून श्रीगणेशाने ‘तुला जे पाहतील ते पापी होतील’ असा चंद्राला शाप दिला तेव्हा देवांच्या विनंतीवरून श्रीगणेशाने चंद्राच्या शापात बदल करून ‘भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे चंद्राला पाहतील त्यांच्यावर आळ येईल’ असा शाप दिला. सिंह प्रसेनम् जांबवता हत: । सुकुमारक मा रोदीस् तव ह्येष: स्यमंतक:॥ हा श्र्लोक 28 वेळा म्हणावा म्हणजे चंद्रदर्शनाचा दोष जातो वा या दिवशी भागवतातील (स्कंद 10, अ. 57) श्यमंतक मण्याचा इतिहास वाचावा म्हणजे दोष जातो. या दिवशी रानडुक्कर जमिनीत खड्डा खणून आपले तोंड खड्ड्यात लपवून बसते असे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. अंधश्रद्धाळू लोक आळ येऊ नये म्हणून या दिवशी शेजार्‍याच्या घरावर दगड फेकणे किंवा घाण टाकणे असा खोडसाळपणा करतात. ‘दुसर्‍याने शिव्या दिल्या तर चंद्रदर्शनाचा दोष जातो ही अंधश्रद्धा आहे. ‘तुझे दर्शन घेतल्याशिवाय लोक चतुर्थीचा उपवास सोडणार नाहीत’ असा आशीर्वाद देऊन गणेशाने चंद्राला मस्तकावर धारण केले.

श्रीगणेशाचे अवतार | Ganesha che avatar

श्रीगणेशाने चार युगात चार अवतार घेतले.

  1. कृतयुग– आदिती व कश्यप यांच्या उदरी ‘विनायक’ या नावाने जन्म घेऊन देवांतक व नरांतक यांचा वध केला. हा अवतार दशभुजा होता.
  2. त्रेतायुग– पार्वतीच्या उदरी जन्म घेऊन सिंधूसुराचा वध केला.
  3. द्वापारयुग– ब्रह्मदेवाच्या जांभईतून निर्माण झालेल्या सिंधूरासुराचा नाश करण्यासाठी श्रीगणेशाने सहा भुजांचा ‘वरेण्य’ रूपात अवतार घेतला. त्यांच्या युद्धात असुराने श्रीगणेशाला नर्मदा नदीत फेकून दिल्यामुळे नर्मदेचे पाणी तांबडे झाले. आजही नर्मदेत ‘गणपती’ सापडतात. श्रीगणेशाने सिंधूरासुराचा वध करून त्याचे रक्त अंगाला लावले तेव्हापासून श्रीगणेशाला शेंदूर लावतात.
  4. कलियुग– दोन भुजा व धुम्रकेतू नाव असलेला हा अवतार झाला तसेच श्रीगणेशाने 1.मत्सरासुरासाठी- वक्रतुंड 2.मद राक्षसासाठी- एकदंत 3.तारकासुरासाठी- महोदय 4.लोभासुरासाठी- गजानन 5.क्रोधासुरासाठी- लंबोदर 6.कामासुरासाठी- विकट 7.ममासुरासाठी- विघ्नराज व 8.अहमसुरासाठी- धुम्रवर्ण असे आठ अवतार घेतले.

श्रीगणेशला आवडणार्‍या गोष्टी | Ganapati la Avdnarya Goshti

1. श्रीगणेशाचे शस्त्र | Ganesha che Shastra 

शूळ, त्रिशूळ, अंकुश, परशू, पाश, मुद्गल, एकदंत, खट्वांग, खेटक व नागबंद.

2. श्रीगणेशाचे वहान | Ganesha che vahan

उंदीर, मोर, सिंह, वाघ.

3. श्रीगणेशला आवडणारी फुले व पत्री

गणपतीला जास्वंद व तांबडी फुले आवडतात तसेच मालती, भृंगराज, बिल्व, श्‍वेतदूर्वा, बद्रीपत्र, धत्तूरपत्र, तुळशीपत्र, शमीपत्र, अपामार्ग (आघाडा), बृहती, करवीरपत्र, अर्कपत्र, अर्जुनपत्र, विष्णुक्रांत, दाडिमी (डाळिंब), देवदारू, मरुबक, अश्‍वत्थ (पिंपळ), केतकी (केवडा), जाती (जाई-जुई), अगस्ति या 21 पत्री आवडतात.

4. श्रीगणेशला आवडणार दूर्वा 

यमधर्माच्या सभेत नृत्य करताना ‘तिलोत्तमेचा’ पदर खाली पडला. कामातूर झालेला यम लाजून दरबारातून उठून चालला असता त्याचे वीर्यस्खलन झाले व ते जमिनीवर पडले. त्या वीर्यातून अग्निचा लोळ उसळला व त्यातून ‘अनल’ नावाचा एक राक्षस निर्माण झाला. त्या राक्षसाच्या त्रासातून वाचण्यासाठी देव श्रीगणेशाकडे गेले. गणेशाने बालरूप धारण केले व ‘मला अनलासुरापुढे नेऊन सोडा’ असे सांगितले. श्रीगणेशाच्या इच्छेप्रमाणे देवांनी बालगणेशास असुरापुढे नेऊन सोडले. छोटा गणेश एकदम पर्वताएवढा महाकाय झाला व त्याने अनलासुराला गिळून टाकले त्यामुळे श्रीगणरायाच्या पोटात भयाण आग निर्माण झाली. ती आग शमावी म्हणून इंद्राने चंद्र, ब्रह्मदेवाने दोन मानसकन्या, भगवान् शंकराने आपले सर्प, श्रीविष्णूने कमळ, वरूणाने जल आदी उपहार श्रीगणेशास दिले परंतु श्रीगणरायाच्या पोटातील आग काही केल्या थांबेना तेव्हा 80,000 ऋषिंनी प्रत्येकी 21 दूर्वा श्रीगणेशाच्या मस्तकावर अर्पण केल्या. श्रीगणेशाच्या पोटातील आग थांबली तेव्हापासून श्रीगणेशास दूर्वा आवडू लागल्या. पोटात आग होत असेल तर दूर्वांचा काढा औषध म्हणून देण्याची पद्धत आहे. दूर्वांमध्ये अमृत आहे. देवासुरांनी केलेल्या समुद्रमंथनातून निघालेले अमृत जमिनीवर सांडले व त्यातून हरळ व कडूलिंब निर्माण झाले म्हणून हरळ अखंड वाढते. हरळीतून दूर्वा मिळतात व त्यामुळे दूर्वा व लिंबाची पाने औषधी आहेत. ‘दूर्वा’ या शब्दाचा अर्थ तंत्रशास्त्राप्रमाणे 48 होतो कारण संख्याशास्त्रात द आणि व या शब्दासाठी 8 ही संख्या मानली जाते. दू या शब्दाचे 8 + र्वा म्हणजे व या शब्दासाठी 4 हा अंक मानला जातो म्हणजे दू= 8 + र्वा= 4 संख्या. अंकानाम् वामतो गति: । या न्यायाने 84 संख्येचे 48 होतात म्हणजे दूर्वा या शब्दाची किंमत 48 होते तसेच जीव या शब्दाची, जी= 8 + व= 4 – 84 याचे उलट 48 म्हणजे दूर्वा व जीव या दोन्ही शब्दांची किंमत 48 होते म्हणजेच दूर्वाचा अर्थ जीव असा होतो. म्हणजे गणरायाला ‘जीव’ अर्पण करावा व अत्यंत आत्मियतेने श्रीगणेशाचे पूजन करावे. जीवनाचे सुख, दु:ख व प्रेम या तीन दलाची जीवनदूर्वा पुढील श्‍लोक म्हणून श्रीगणेशास अर्पण करावी. मंत्र- दूर्वे अमृत संपन्ने शतमुले शतांकुरे । शतं च हर मे पापं शतम् आयुष्य वर्धिनी ॥ 

5. श्रीगणेशास आवडता शमी | ganesh puja la shamichi pane ka vapartat ?

 हा वृक्ष श्रीगणेशास अत्यंत प्रिय आहे. शमीवृक्षाला वह्नी वृक्ष असेही म्हणतात. वह्नी या शब्दात ह्नी या शब्दासाठी तंत्रशास्त्रातील संख्याशास्त्रात ‘शून्य’ हा अंक मानला आहे व शून्य अंक हा ‘ब्रह्मरूप’ होण्याचे द्योतक आहे. ब्रह्मरूप होण्यासाठी ‘शमीपत्र’ अर्पण करावे.

6. श्रीगणेशास आवडता मंदारवृक्ष- 

मालवदेशातील औरव व सुमेधा या ब्राह्मणदांपत्यास ‘शमिका’ नावाची कन्या झाली. तिला ‘मंदार’ नावाच्या धौम्यपुत्रास दिले. एकदा ‘भ्रुशुंडीऋषी’ मंदाराच्या आश्रमात आले असता ते दोघे पती-पत्नी भ्रुशुंडीच्या विचित्र रूपाला पाहून हसले तेव्हा ‘तुम्ही दोघेही वृक्षयोनीत जन्म घ्याल’ असा शाप ‘भ्रुशुंडी’ ऋषिंनी त्या दोघांना दिला त्यामुळे शमीका ‘शमीवृक्ष’ व मंदार ‘मंदारवृक्ष’ झाले. हा वृत्तांत औरव व धौम्यास कळल्यावर त्या दोघींनी 12 वर्षांपर्यंत श्रीगणेश उपासना केली तेव्हा गणराय प्रसन्न होऊन म्हणाले,‘हे ऋषिंनो ! भ्रुशुंडीचा शाप खोटा होणार नाही परंतु मी तुम्हांस आशीर्वाद देतो ‘आजपासून मी मंदार वृक्षाखाली राहीन व शमीपत्राने संतुष्ट होईल. मंदारवृक्ष वा मुळाच्या काष्टात श्रीगणेशमूर्ती तयार होते. त्याला ‘मंदारगणेश’ असे म्हणतात. मंदारवृक्षाच्या काष्टात तयार झालेला नैसर्गिक श्रीगणेश सिद्धिगणेश मानला जातो.

भक्ती प्रवाह- | Ganapatya Sampradaya

गणेशभक्तांना ‘गाणपत्य’ या नावाने ओळखतात. त्यांच्यात 

  1. महागणपती 
  2. हरिद्रा गणपती 
  3. उच्चिष्ट गणपती 
  4. नवनीत
  5. स्वर्ण व 
  6. संतानसंप्रदाय असे सहा संप्रदाय आहेत.

श्रीगणेश आराधना | Shree Ganesh Aradhana

चतुर्थी, विनायकव्रत, स्तोत्रपठण, गणेशध्यान, गणेशगायत्री मंत्र, गणेशनामजप व गणेशयाग इ. मार्गांनी केली जाते. श्रीगणेशाच्या अभिषेकासाठी अथर्वशीर्ष व ऋग्वेदातील ब्रह्मणस्पतसूक्त म्हणण्याची पद्धत आहे.

  1. अथर्वशीर्ष-यांत अ + अथर्व + शीर्ष हे तीन शब्द येतात. अ= निषेध करणारा नाही. अथर्व= चंचल होणे. शीर्ष= अंत. या सर्व शब्दांचा अर्थ= ‘जे चंचल होऊ देत नाही व जे अंतिम साध्य आहे ते ‘अथर्वशीर्ष’ होय. ॐ गँ गणपतये नम: । हा बीजमंत्र यातआहे. (अथर्ववेद). ‘अथर्वण ऋषींना’ जो दिव्य अनुभव आला तो त्यांनी अथर्ववेद ऊर्फ ब्रह्मवेद यात सहज, सोप्या व मोजक्या शब्दांत मांडला आहे. ग्रहणकाळात श्रीगणेशमूर्तिच्या साक्षीने अथर्वशीर्षाचे पठण करून ते सिद्ध करता येते. या सूक्ताचे 21/108 वा 1000 (सहस्त्र आवर्तने) वेळा पठण केल्यास इच्छित फळप्राप्ती होते.

2. ब्रह्मणस्पतीसूक्त – ‘ब्रह्मणस्पती’ हे गणपतीचे दुसरे नाव आहे. ब्रह्मणस्पतसूक्त म्हणजेच श्रीगणेशाचे स्तवन होय. 11 अध्याय, 64 मंत्र असलेले हे ऋग्वेदातील सूक्त 11 ऋषिंनी निर्माण केले.

3. गायत्री मंत्र– ॐ भूर्भुव: स्व: । ॐ गँ गणपतये नम: । एकदंताय विद्महे। वक्रतुंडाय धीमहि । तन्नो दन्ति: प्रचोदयात्॥ हा श्रीगणेश गायत्री मंत्र सिद्ध करता येते

4. श्रीनारदांनी रचलेल्या संकटनिरसन स्तोत्राचे पठण करावे.

श्रीगणेशोत्सवातील उपासना | Ganesh Upasana

1.गणेशमूर्तीचे स्वागत- भाद्रपद शु.॥4॥ ते शु.॥14॥ (अनंत चतुर्दशी) असा दहा दिवस श्रीगणेशोत्सव असतो. चतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्ती आणण्यासाठी जाताना डोक्यावर टोपी, हातात देवाचे ताम्हण, अक्षता, हळदी-कुंकू, विड्याची दोन पाने, सुपारी व एक हातरूमाल घेऊन जावे. मूर्तिला अक्षता वाहून आवाहन करावे. मूर्ती ताम्हणात घेतल्यावर तिच्या जागेवर विडा ठेऊन मूर्तिवर रूमाल पांघरून घरी आणून प्राणप्रतिष्ठा करावी. पूजेची गणेशमूर्ती नऊ इंचापेक्षा मोठी नसावी. ती शक्यतो मातीची असावी. त्याला पार्थीव गणेश असे म्हणतात. दहा दिवस नित्य पूजा व आरती करावी. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला (श्रीगणेश चतुर्थी)

Ganpati puja

श्रीगणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा | Ganpati pran pratishtha

 प्रथम स्नान करून कपाळाला गंध लावून सोवळे नेसावे. गणेशमूर्तीचे तोंड पूर्वेस वा पश्‍चिमेस करावे नंतर आचमन, प्राणायाम करून

पुढीलप्रमाणे पूजा करावी | Ganesh Chaturthi puja vidhi and sankalpa

श्रीगणेशाय नम: ॥ श्री मन्महागणाधिपतये नम:॥ इष्टदेवताभ्यो नम:॥ कुलदेवताभ्यो नम:। ग्रामदेवताभ्यो नम:। स्थान देवताभ्यो नम:। वास्तुदेवताभ्यो नम:। आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नम:। एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नम:। सर्वेभ्यो देवेभ्यो नम:। सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नम:। सुमुखश्‍चैकदंतश्‍च कपिलो गजकर्णक:। लंबोदरश्‍च विकटो विघ्ननाशोगणाधिप:॥ धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजानन:। द्वादशैतानि नामानि य: पठेच्छृणुयादपि॥ विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा॥ संग्रामे संकटेऽचैव विघ्नस्तस्य न जायते॥ शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजम्॥ प्रसन्नवदनं ध्यायेत्सर्वविघ्नोपशांतये॥ सर्वमंगल मांगल्ये शिवेसर्वार्थसाधिके॥ शरण्ये त्र्यंबके गौरीनारायणि नमोस्तुते॥ सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाम्मंगलम्॥ येषां हृदिस्थो भगवान्मंगलायतनं हरि:॥ तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव॥ विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंध्रिऽयुगं स्मरामि॥ लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजय:॥ येषामिंदीवरश्यामो हृदयस्थो जनार्दन:॥ विनायकं गुरूं भानुं ब्रह्माविष्णुमहेश्‍वरान्॥ सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये॥ अभीप्सितार्थसिद्ध्यर्थ्यं पूजितो य: सुरासुरै:॥ सर्वविघ्नहरतस्मै गणाधिपतये नम:॥ सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्‍वरा:॥ देवा दिशंतु न: सिद्धिं ब्रह्मेशानजनार्दन:॥ श्रीमद्भगवतो महापुरूषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्याद्यब्रह्मणो द्वितीयो परार्धे विष्णुपदे श्रीश्र्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगचतुष्केकलियुगे तत्प्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडे जंबुद्वीपे दंडकारण्येदेशे गोदावर्या: दक्षिणे तीरे श्रीशालिवाहनशके बौद्ध्यावतारे रामक्षेत्रे आस्मिन्वर्तमाने (अमुक) नामसंवत्सरे॥ दक्षिणायने॥ वर्षाऋतौ॥ भाद्रपद मासे॥ शुक्ल पक्षे॥ चतुर्थ्यापुण्यतिथौ॥ (अमुक) वासरे॥ (अमुक दिवसे) नक्षत्रे॥ (अमुक) स्थिते वर्तमान चंद्रे॥ (अमुक) स्थिते वर्तमाने सूर्ये॥ (अमुक) राशीस्थिते गुरौ॥ (टीप- ज्या ज्या ठिकाणी ‘अमुक’ हा शब्द आला आहे त्या त्या ठिकाणी अनुक्रमे त्या दिवसाचे संवत्सर, वार, नक्षत्र, योग, करण, रास इत्यादी पंचागांत पाहून म्हणावीत.) शेषेषु ग्रहेषु यथायथंराशिस्थानस्थितेषु सत्सु शुभनामयोगे एवंगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ मम आत्मन: श्रुतिस्मृतिपुराणोक्त सकलशास्त्रोक्त फलप्राप्त्यर्थं अस्माकं सर्वेषां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्‍वर्य अभि वृद्ध्यर्थं द्विपदचतुष्पदसहितानां शांतर्थ्यं पुष्टर्थ्यं तुष्टर्थ्यं समस्त मंगलावाप्तर्थं प्रतिवार्षिकविहितं श्रीसिद्धिविनायकदेवता प्रीत्यर्थं यथा मीलितोपचारद्वव्यै: प्राणप्रतिष्ठापूर्वकं ध्यानावाहनादि विविधोपचारै: पार्थिव गणपतिपूजनमहं करिष्ये॥ तथाच कलशपूजनं, शंख घण्टा पूजनंच करिष्ये॥ आदौ निर्विघ्नता सिद्धर्थ्यं महागणपति स्मरणं च करिष्ये॥ असे म्हणून पळीभर पाणी ताम्हनात सोडावे. 

श्रीगणेश स्मरण:- 

श्रीगणेशापुढे हात जोडून पुढील श्‍लोक म्हणत त्याचे स्मरण भक्तिभावाने करावे- 

वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटीसमप्रभ निर्विघ्नं कुरूमे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

श्रीमहागणपतये नम:॥ (यानंतर कलश, शंख, घंटा व दीप यांची पूजा करून पुढील मंत्राने मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी.) 

अस्य श्रीप्राणप्रतिष्ठामंत्रस्य ब्रह्माविष्णुमहेश्‍वरा ऋषय:॥ ऋग्यजु: सामाथर्वाणिच्छंदांसि। पराप्राणशक्तिर्देवता। आं बीजम्॥ र्‍हीं शक्ति:॥ क्रों कीलकम्। अस्यां मृण्मयमूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोग:॥ (पुढील मंत्र म्हणताना मूर्तीच्या हृदयाला (छातीला) उजवा हात लावून ठेवावा.) 

ॐ आं र्‍हीं क्रों। अं यं रं लं वं शं षं सं हं ळं क्षं अ:॥ कों र्‍हीं आं हंस: सोऽहम्॥ अस्यां मूर्तौ प्राण इह प्राणा:॥ ॐ आं र्‍हीं कोम्॥ अं यं रं लं वं शं षं हं ळं क्षं अ:॥ क्रों र्‍हीं आम्॥ हंस: सोऽहम् अस्यां मूर्तौ जीव इहस्थित:॥ ॐ आं र्‍हीं क्रों। अं यं रं लं वं शं षं सं हं ळं क्षं अ:॥ क्रों र्‍हीं आं हंस: सोऽहम्॥ अस्यां मूर्तौ सर्वेन्द्रियाणि इहागत्यस्वस्तये सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा॥ अस्यदेवस्य गर्भाधानदिपंचदशसंस्कारसिद्ध्यर्थं पंचदशप्रणवावृत्ति: करिष्ये।

असा संकल्प सोडून 15 वेळा ॐ काराचा उच्चार करावा. यानंतर दोन दूर्वांच्या टोकांना तूप लावून ते मूर्तीच्या डोळ्यांना लावावे. त्यावेळी

‘ॐ नमो भगवते विश्‍वात्मे जगच्चक्षुषे सूर्यायनम:।’ असे म्हणावे. नंतर मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताचा अंगठा लावून ‘अस्यै प्राणा: प्रतिष्ठन्तु। अस्यै प्राणा: क्षरन्तु। अस्यै देवत्वमर्चायै सुप्रतिष्ठितमस्तु च।’ असे म्हणून त्या दोन दूर्वा वाहून पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी- 

प्रार्थना:-स्वागतं देवदेवेश मद्भाग्यात्वं इहागत:। प्राकृतं त्वमदृष्ट्वा मां बालवत्प्ररिपालय॥ मत्कृते भक्तिभोगार्थं सौभाग्ययच मे सदा। सान्निध्यं श्रीमयुरेशस्वमूर्ती परिकल्पय॥ अद्य भाद्रपद चतुर्थ्यां तु गणेशपार्थिवाचने॥ सान्निध्यमस्यां मूर्तौ त्वं यथायोग्यं तथा कुरु प्रभो॥ नंतर दोन दूर्वा वाहाव्यात व पंचोपचारपूजा करावी. बेल, केवडा, तुळस, मारवा, डोरली, रुई, अर्जुन, विष्णुक्रांता, कण्हेर, मधुमालती, बोर, शमी, धोत्रा, जाई, पिंपळ, आघाडा, दुर्वा, डाळिंब, माका, देवदार आणि अगस्ती या पत्री वाहणे. नंतर मूर्तीला अक्षता, दूर्वा, शमीपत्रे वाहून नैवेद्य दाखवून नमस्कार करावा व आवाहन करावे.- आगच्छ देवदेवेश तेजोराशे जगत्पते॥ क्रियमाणां मया पूजां गृहाण सुरसत्तम॥ श्रीसिद्धिविनायक देवताभ्यो नम:। आवाहनार्थे अक्षताम् समर्पयामि। नंतर आचमन करून गणेशमूर्तीवर दूर्वा किंवा फुलांनी थोडे पाणी शिंपडीवे. तसेच थोडे दूध शिंपडून पुन्हा स्वच्छ पाणी शिंपडावे. 

नंतर फूल वाहून निरांजन व उदबत्ती ओवाळावी व पाटावर पाण्याचे चौकोनी मण्डल काढून पात्राभोवती पाणी फिरवून डोळे मिटून ‘ॐ प्राणाय स्वाहा। अपानाय स्वाहा। व्यानाय स्वाहा। उदानाय स्वाहा। समानाय स्वाहा। ॐ ब्रह्मणे स्वाहा।’ असे म्हणून नैवेद्य दाखवावा. 

नंतर विड्याच्या पानावर दक्षिणा ठेवून त्यावर पाणी सोडावे व ‘श्रीसिद्धिविनायक देवताभ्यो नम:। मंत्रपुष्पं समर्पयामी।’ असे म्हणून फूल वाहून नमस्कार करावा. एवढे झाल्यावर अनेन पूर्वाराधनेन श्रीसिद्धिविनायक देवता प्रीयंताम् । असे म्हणून ताम्हनात पाणी सोडावे व मूर्तीवर वाहिलेली फुले काढून त्यांचा वास घेऊन ती उत्तर दिशेला टाकावीत. येथे पूर्वपूजा संपते. 

त्यानंतर अथर्वशीर्ष म्हणत मूर्तीवर अभिषेक करावा. त्यानंतर देवाला कुंकू लावून वस्त्र, यज्ञोपवीत (जानवे) समर्पण करून लाल गंध लावावे. अक्षता वाहून हळद, कुंकू, गुलाल, बुक्का इ. सौभाग्यद्रव्ये, फुले  व पत्री वाहावीत.‘दूर्वे अमृत संपन्ने दशमूले शतकरे। शतं च हरमे पापं शतमायुष्यवर्धिनी॥’ असे म्हणून मूर्तीला दूर्वा वाहाव्यात. पुन्हा धूप, दीप, नैवेद्य दाखवून निरांजनाने ओवाळावे. नंतर देवाला गंध लावून देवापुढे विडा, नारळ व दक्षिणा ठेवावी. 

यानंतर एकवीस ताज्या दूर्वा घ्याव्यात त्या वाहताना प्रत्येक वेळी दोन दूर्वा याप्रमाणे घेऊन त्यांना गंध-अक्षता लावून व त्यांच्याबरोबर एक फूल घेऊन त्या दूर्वा (तीन अग्रे आपल्याकडे येतील अशा प्रकारे) पुढील एकेक नाव घेत वाहाव्यात. 

गणधिपाय नम:। दूर्वायुग्मं समर्पयामि॥ उमापुत्राय नम:। दूर्वायुग्मं समर्पयामि॥ अघनाशाय नम:। दूर्वायुग्मं समर्पयामि॥ विनायकाय नम:। दूर्वायुग्मं समर्पयामि॥ ईशपुत्राय नम:। दूर्वायुग्मं समर्पयामि॥ सर्वसिद्धिविनायकाय नम:। दूर्वायुग्मं समर्पयामि॥ एकदंताय नम:। दूर्वायुग्मं समर्पयामि॥ इभवक्त्राय नम:। दूर्वायुग्मं समर्पयामि॥ आखुवाहनाय नम:। दूर्वायुग्मं समर्पयामि॥ कुमारगुरवे नम:। दूर्वायुग्मं समर्पयामि॥

याप्रमाणे प्रत्येक वेळी दोन दूर्वा अशा 10 वेळा अर्पण केल्यावर एक शिल्लक राहील. ती हातात घेऊन ‘गणाधिप नमस्तेऽस्तु उपपुत्राघनाशन। एकदन्तेभवक्त्रेति तथा मूषकवाहन॥ विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक। कुमारगुरवे नित्यं पूजनीया: प्रयत्नत:॥ श्रीसिद्धिविनायकाय नम:। दूर्वामेकां समर्पयामि॥’ असे म्हणून ती दूर्वा अर्पण करावी. नंतर आरती व मंत्रपुष्पांजली म्हणून फुले मूर्तीवर वाहावीत. शेवटी ‘अनेन यथा ज्ञानेन यथा मीलितोपचारद्रव्यै: विविधोपचार पूजनेन भगवान श्रीसिद्धिविनायक देवता प्रीयंताम्।’ असे म्हणून हात जोडावेत व नंतर ताम्हनात उदक सोडावे. हा उत्सव प्रथेनुसार दीड, दोन, पाच, सात वा 10 दिवसापर्यंत करतात.

‘”गणपती बाप्पा मोरया (मोरया- नमस्कार), पुढच्या वर्षी लवकर या”’या जयघोषात आरती केल्यानंतर गणपती विसर्जन करतात. मिरवणूकीत गुलालाऐवजी गुलाबाच्या पाकळ्या उधळाव्यात. ज्या ताम्हणात मूर्ती नेलेली असते त्यात नदीची वाळू आणावी व ती प्रसाद म्हणून घरात टाकावी.

लेखक – श्री. प्रकाश ग. रामदासी (काळे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *